गोल्डन आय न्यूज नेटवर्क
काश्मिरी साहित्यिक प्राण किशोर कौल यांचा साहित्य अकादमीतर्फे सर्वोच्च फेलोशिपने पुण्यात गौरव !!
हा गौरव फक्त माझा नाही तर काश्मिरी भाषा, संस्कृती आणि लोकांचा : प्राण किशोर कौल !
पुणे : वयाच्या 99व्या वर्षी साहित्य अकादमीने सर्वोच्च फेलोशिप प्रदान करून केलेला हा गौरव फक्त माझा एकट्याचा नसून काश्मिरी जनता, काश्मिरमधील साहित्यिक आणि काश्मिरी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, अशा भावना काश्मिरी लेखक, दिग्दर्शक, नाटककार आणि चित्रकार प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केल्या.
दिल्लीस्थित साहित्य अकादमीतर्फे प्राण किशोर कौल यांचा नुकताच पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशातील निवडक साहित्यिकांना या पूर्वी ही फेलोशिप देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळविणारे कौल हे दुसरे काश्मिरी साहित्यिक आहेत. पहिला पुरस्कार प्रो. रहमान राही यांना मिळाला होता.
साहित्य अकादमीतर्फे प्राण किशोर कौल यांचा पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी नुकताच देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला. या वेळी उपस्थित (डावीकडून) सरहदचे संजय नहार, साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक, प्राण किशोर कौल आणि साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव.
कुटुबियांच्या उपस्थितीत प्राण किशोर कौल यांचा शाल आणि ताम्रपट देऊन साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक आणि सचिस डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरहदचे अध्यक्ष संजय नहार, लेशपाल जवळगे उपस्थित होते.
प्राण किशोर कौल म्हणाले, आयुष्यात साहित्य अकादमी फेलोशिप मिळण्याचा क्षण येईल अशी मी कल्पनाही केली नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रादेशिक भाषांचा विस्तार साहित्य अकादमीच्या प्रयत्नांमुळे होऊ शकला.
1998 साली माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही मी विपुल लेखन करीत असताना साहित्य अकादमीशी जोडलेला होतो. माझ्या कारकिर्दीवर चित्रपट बनविला गेला हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. ज्या सुमारास माझा जन्म झाला त्या काळात काश्मीर पूर्णत: अंधारात होते.
वीज, पिण्याच्या पाण्याचीही सोय नव्हती. त्या काळातही काश्मिरी जनतेचे एकमेकांशी प्रेमपूर्ण संबंध होते. काश्मीरला ऋषीमुनी, संतांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार-प्रसारही साहित्य अकादमीच्या प्रयत्नाने झाला. जो पर्यंत या देशात सांस्कृतिक एकात्मता, अनुबंध निर्माण होत नाहीत तो पर्यंत देशपातळीवर एकात्मता साधली जाणार नाही.
विविध भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांना एका धाग्यात बांधण्याचे काम साहित्य अकादमी करीत आहे. यातूनच भाषेच्या सीमा ओलांडणाऱ्या साहित्यिकांचा गौरव या अकादमीतर्फे करण्यात येतो, हे कार्य मोलाचे आहे.
प्राण किशोर कौल यांच्या कार्याचा गौरव करून साहित्यिक डॉ. माधव कौशिक म्हणाले, प्राण किशोर कौल यांनी विविध माध्यमांमधून आपली अभिव्यक्ती प्रदर्शित केली.
साहित्यकृती साकारताना चित्रपट निर्मिती, चित्रकृतींच्या माध्यमातूनही ते व्यक्त झाले आहेत. प्राण किशोर कौल हे काश्मिरी संस्कृतीचे प्राणतत्त्वच सिद्ध झाले आहेत. प्राण किशोर कौल यांच्या साहित्यकृती हिमालयासारख्या उंच तर आहेतच त्याच वेळेला त्या नदीच्या खळखळाटासारख्याही भासतात. पद्यरूपी गद्याची लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
सुरुवातीस डॉ. के. श्रीनिवास राव यांनी प्राण किशोर कौल यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती दिली.