गोल्डन आय न्यूज नेटवर्क
.. तुम्ही भारताचे सांस्कृतिक राजदूत
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे :
आयसीसीआर अंतर्गत पुण्यात शिक्षण घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना निरोप
पुणे : पुण्यातील शिक्षण संपवून तुम्ही तुमच्या देशात परत जात असताना भारतीय संस्कृती तुमच्या देशात घेऊन जात आहात; त्यामुळे भारताची परंपरा, संस्कृती तुमच्या देशातील लोकांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही उत्तम माध्यम बनला आहात.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रा. डॉ. सुरेश गोसावी.
एकप्रकारे तुम्ही भारताचे सांस्कृतिक राजदूत बनून तुमच्या देशात भारताची परंपरा, संस्कृती यांची माहिती पोहोचवाल, असा विश्वास आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाअंर्तगत (आयसीसीआर) विविध महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या परदेशातील 141 विद्यार्थ्यांना आज (दि. 8) निरोप देण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात डॉ. सहस्त्रबुद्धे बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सहस्त्रबुद्धे आणि डॉ. गोसावी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आयसीसीआरचे विभागीय निदेशक राज कुमार, कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी उपस्थित होते.
डॉ. सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले, भारतीय वसुधैव कुटुंबकम् या संस्कृती, परंपरेनुसार दूरदेशी जाणाऱ्या कुटुंबातील सभासदाला त्याला उपयुक्त वस्तू दिल्या जातात या भावनेतूनच आम्ही तुम्हाला तुमच्या देशाला भारताशी जोडत व्यवसायाच्या संधी, कल्पना या विषयी माहिती देऊन पुन्हा तुमच्या देशाशी जोडले जाऊ अशी खात्री आहे.
केंद्र सरकारअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या एमटीडीसी, आयटीडीसी, आयुष मंत्रालय तसेच खादी व ग्रामोद्योग या क्षेत्राअंतर्गत उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधींविषयी चंद्रशेखर जैस्वाल, ब्रह्मानंद रेड्डी, डॉ. रसिका कोल्हे आणि बसवराज यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, तुम्ही आता जीवनात आव्हाने पेलण्यास सक्षम होत आहात. तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाच्या विविध संधी तुमच्या देशासह भारतातही उपलब्ध होऊ शकतील.
ख्रिस्टीबेन मुथुकुमार (श्रीलंका), बिकी राज पांडे (नेपाळ), राबेया अख्तर बिथी (बांगलादेश), बाबूकर सेका (गांबिया), अब्दुल मोमोनी जेलानी (अफगाणीस्तान) या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत आणि आयसीसीआर विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय संस्कृतीच्या आठवणी परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहाव्या यासाठी संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्यविधातर्फे ‘लोक मे शक्ती आराधना’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
आयसीसीआरच्या स्थापनेची आणि उपक्रमांची माहिती देऊन राज कुमार यांनी मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.
जाहिरात