गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कार गुरुतत्त्वाचा कृपाशीर्वाद : अतुल खांडेकर
कलानिधी संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन !
पुणे : समाजाची अभिरूची बदलत असणाऱ्या काळात परंपरा आणि नाविन्य यांचा उत्तम समतोल साधण्याचे कार्य कलानिधी संस्था करत आहे. कलानिधी संस्थेतर्फे गुरू डॉ. वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्या नावे मिळालेला पुरस्कार गुरूंचा अनमोल प्रसाद म्हणून स्वीकारत आहे. पुरस्कार म्हणजे गुरूंनी सर्व शिष्यांना दिलेला गुरुतत्त्वाचा कृपाशीर्वाद आहे, अशा भावना प्रसिद्ध युवा गायक आणि संगीतकार अतुल खांडेकर यांनी व्यक्त केल्या.
कलानिधी आयोजित विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) मिलिंद गुरव, डॉ. हरी सहस्त्रबुद्धे, पंडित प्रमोद मराठे, पंडित विकास कशाळकर, अतुल खांडेकर, अपर्णा गुरव.
कलानिधी संस्थेतर्फे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे स्मृती पुरस्कराने या वर्षी अतुल खांडेकर यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर खांडेकर यांनी गुरूंविषयी आदर व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. सन्मानपत्र आणि अकरा हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध गायक पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते झाले. गांधर्व महाविद्यालाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलानिधी संस्थेचे संस्थापक, प्रसिद्ध तबलावादक मिलिंद गुरव, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अपर्णा गुरव, डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांचे पती डॉ. हरी सहस्त्रबुद्धे, गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या 75व्या जन्मदिनाचे औचित्य साधून नाद-निनाद या कार्यक्रमाअंतर्गत अतुल खांडेकर आणि पंडित विकास कशाळकर यांच्या गायन मैफलीचे या प्रसंगी आयोजन करण्यात आले होते.
खांडेकर म्हणाले, रागसंगीत टिकवून ठेवून त्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या संस्थांपैकी कलानिधी एक आहे.
या संस्थेला स्वरलयीचे वलय आणि भक्कम अधिष्ठान लाभलेले आहे, जे स्वरलयीच्या निष्ठेवरचे आणि गुरूकृपेचे आहे. पंडित विकास कशाळकर यांच्या सारख्या थोर गायकाच्या हातून हा प्रसाद मिळणे हेही मोठे भाग्याचे लक्षण आहे.
पंडित विकास कशाळकर म्हणाले, डॉ. वीणाताई अतिशय जिद्दी, मेहनती, अभ्यासू आणि बुद्धिमान गायिका होत्या. तसेच त्या निगर्वीही होत्या. त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने पुढच्या पिढीतील कलाकारांना निश्चितच योग्य मार्ग दाखविला जाईल.
डॉ. हरी सहस्त्रबुद्धे म्हणाले, ज्या कलाकाराला कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घ्यायची आहे अशा युवा पिढीतील योग्य कलाकाराची पुरस्कारासाठी निवड करणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
अपर्णा गुरव म्हणाल्या, गुरू डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या स्मृतींचे जतन करून शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात वीणाताईंच्या नावाची ज्योत पुरस्कार रूपाने जनमानसात तेवत राहावी व त्यांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा पुरस्कार दिला जात आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात अतुल खांडेकर यांनी गायनाची सुरुवात भीमपलास रागातील तीन पारंपरिक रचना सादर करून केली. विलंबित एकताल, मध्यलयीत अद्धा तीनताल आणि द्रुत लयीत तीन तालातील पारंपरिक तराणा सादर केला. सांगता ‘ॐकार अवधो सिद्ध भजो’ या भजनाने केली. खांडेकर यांच्या मैफलीतून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती आली.
उत्तरार्धात डॉ. विकास कशाळकर यांनी राग मालगुंजीतील ‘बन मे चरावत गैंया’ या बंदिशीने मैफलीची सुरुवात केली. द्रुत तीन तालामध्ये ‘रैन कारी डरावन लागी रे’ ही रचना सादर करून त्यानंतर रायसा कानडामधील तीन तालातील ‘एरी तुम सब’ आणि द्रुत तीन तालातील ‘मन मोह लियो’ या बंदिशी ऐकवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. राग प्रदीपमधील रचना सादर करून कार्यक्रमाची सांगता भैरवीमधील ‘करन मोरी लागी रे’ या रचनेसह एक तराना ऐकविला. कलाकारांना भक्ती खांडेकर, प्रणव केसकर, सुधीर भोरकर, परिमल कोल्हटकर यांनी तानपुऱ्यावर तर प्रणव गुरव (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) साथसंगत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा गोखले यांनी केले. कलाकारांचा सन्मान ज्येष्ठ तबलावादक ओंकार गुलवाडी आणि अपर्णा गुरव यांनी केला.
जाहिरात