गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘वेदनेचा क्रूस’ : मनाचा शोध घेणारी कादंबरी – सुबोध भावे
लक्ष्मीकांत देशमुख लिखित कादंबरीचे अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते प्रकाशन
निकिता मोघे, डॉ. रणधीर शिंदे, सुबोध भावे, लक्ष्मीकांत देशमुख, संजय भास्कर जोशी आणि सुनील महाजन.
पुणे : आयुष्यात शोकांतिकांचा पट असूनही अनेक कलावंतांनी त्याचा स्वीकार केला. गुरुदत्त यांनी आत्महत्या का केली या ‘का’चे उत्तर मिळणे अवघड आहे. ‘वेदनेचा क्रूस’ ही कादंबरी म्हणजे एका कलावंताच्या मनाचा शोध घेणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले.
आत्महत्येचे कारण शोधणे अवघड असल्याने ही कादंबरी वाचकाला अस्वस्थ करेल, त्याच्या मनात कायम राहिल अशी टिप्पणीही त्यांनी केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख लिखित गुरुदत्त या मनस्वी कलावंताच्या आत्महत्येचा वेध घेणाऱ्या ‘वेदनेचा क्रूस’ या कादंबरीचे प्रकाशन आज (दि. 9) भावे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी होते तर साक्षेपी संपादक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे व्यासपीठावर होते. संवाद पुणे आणि मॅजेस्टिक प्रकाशन हाऊस, मुंबई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सुरुवातीस ‘वेदनेचा क्रूस’ या कादंबरीतील ‘गुरूचे पत्र’ या कथेचे वाचन करून सुबोध भावे म्हणाले, कलाकृती समजून घेऊन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे माझ्यासारख्या कलाकाराचे काम असते. एखाद्या गोष्टीचे गूढ उलगडत नाही तो पर्यंत त्या विषयावरील कथा-कादंबऱ्या येत राहतात. कथेच्या माध्यमातून देशमुख यांनी गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संजय भास्कर जोशी म्हणाले, विषयाची मांडणी करताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी सर्व अंगांचा विचार करून उत्तम दर्शन घडविले आहे. ही कादंबरी म्हणजे एक कहाणी नसून आत्मनाशाचा त्या वेळचा काळ उभा केला आहे.
एका प्रश्नाचा खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे गुरुदत्त यांचे आत्मचरित्र नसून एका प्रश्नाला लिखाणाच्या माध्यमातून कलात्मक रूप दिले आहे. सवंग लिखाण न करणारे देशमुख हे विलग्ध लेखक आहेत. अलिप्तपणे सर्व गोष्टींचा विचार करून एका प्रश्नाचे परिश्रमपूर्वक दर्शन त्यांनी घडविले आहे.
रणधीर शिंदे म्हणाले, आत्मनाशाच्या कहाणीत देशमुख यांनी कल्पकतेने रंग भरले आहेत. ‘प्रेरणा’ आणि ‘प्रतिभा’ यांच्या माध्यमातून त्यांनी लिखाणाद्वारे एक वेगळा प्रयोग मांडला आहे.
सुरुवातीस लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथेचे बीज कसे रुजले याविषयी विवेचन केले. मानवी नातेसंबंधांविषयी कुतुहल असल्याने लिखाण करायला घेतले. गुरुदत्त यांना यश मिळाले तरी त्यांचे मन अस्वस्थ का होते याचा शोध घेण्याचा या कादंबरीच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. आभार निकिता मोघे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी तिक्का यांनी केले.
जाहिरात
जाहिरात