व्हायोलिनवरील ‘सूर निरागस हो’ ने अचंबित झाले सुहृद
आडकर फौंडेशनतर्फे डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्काराने संजय उपाध्ये यांचा गौरव
कमतरतांवर मात करून संजय उपाध्ये यांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श : डॉ. संदानंद मोरे
पुणे : डॉ. हेलन केलर यांच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली आहे. त्यांच्या नावे आडकर फौंडेशनने दृष्टीहिन संगीत शिक्षक संयज उपाध्ये या योग्य व्यक्तीची निवड करून त्यांना सन्मानित केले आहे, ही गौरवाची बाब आहे. आपल्यातील कमतरतांचा बाऊ न करता त्यांच्यावर मात करून सर्वसामान्य व्यक्तिलाही जे जमणार नाही ते उपाध्ये यांनी करून दाखविले असून त्यांच्या माध्यमातून समाजासमोर एक आदर्श निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
आडकर फौंडेशनतर्फे दृष्टीहिन, मूकबधीर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार नेत्रहिन संगीत शिक्षक, व्हायोलिन वादक संजय उपाध्ये यांना आज (दि. 27) डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ‘आपलं घर’चे संस्थापक विजय फळणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, सुवर्णा उपाध्ये व्यासपीठावर होते. शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सामाजिक दृष्टी गमाविलेला समाज आज दिसत असून अशाही परिस्थितीत आडकर फौंडेशनने डॉ. हेलन केलर यांच्यासारख्या समाजभान असलेल्या विदुषीच्या नावे सामाजिक काम करणाऱ्या खऱ्या अर्थाने डोळस असलेल्या संजय उपाध्ये यांनापुरस्कार देऊन सामाजिक डोळसपणा दाखविला आहे, असे मत विजय फळणीकर यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. शारीरिक कमतरता असतानाही अनंत अडचणींवर मात करून जिद्दीने उपाध्ये यांनी समाजाला वेगळा दृष्टीकोन दिला आहे त्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने यथोचित गौरव करण्यात येत असल्याचे ॲड. अडकर यांनी सांगितले.
डॉ. हेलन केलर यांच्या नावे दिला जाणारा महाराष्ट्रातील हा एकमेव पुरस्कार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मानपत्राचे लेखन आणि वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.
.. ही गौरवाची बाब : संजय उपाध्ये
सत्काराला उत्तर देताना संजय उपाध्ये म्हणाले, पुरस्काराने आत्यंतिक हर्षित झालो आहे, सन्मानाचे शब्दात वर्णन करता येत नाहीये. हा पुरस्कार वडिलांना समर्पित करीत आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्या भावना शब्दात मांडता येत नाहीत त्या भावना मला सुरांच्या माध्यमातून मांडण्याची संधी दिली ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. या वेळी त्यांनी व्हायोलिनवर ‘सूर निरागस हो’, ‘मन मंदिरा’, ‘एक प्यारका नगमा है’ अशी विविध गाणी सादर करून उपस्थितांना अचंबित केले.
जाहिरात