गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांचा उलगडला सांगीतिक जीवनप्रवास
गानवर्धनतर्फे अनोखी मैफल : मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांचे सादरीकरण
पुणे : स्वत:चे गायन निर्णायक पद्धतीने गाजविण्याचा प्रासादिक गुणधर्म गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्यात होता. ते सिद्ध गायक होते. सांगीतिक क्षेत्रात त्यांचे नाव अतिशय आदराने व अभिमानाने घेतले जाते. अनवट-अप्रसिद्ध रागांमध्ये चाली बांधणे ही वझेबुवांची खासियत होती. त्यांच्याकडे अनवट रागांचा खजिनाच होता. त्यांच्या गायनातून उद्बोधन व मनोरंजन यांचा ताळ-मेळ साधला जात असे, अशा शब्दांत विदुषी मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांनी वझेबुवांचा सांगीतिक जीवनप्रवास उलगडून दाखवितानाच त्यांच्या गायन शैलीची झलक उपस्थितांना दाखवून अचंबित केले.
सांगीतिक मैफलीत मंजिरी कर्वे-आलेगावकर यांच्यासह अजित किंबहुने, डॉ. मृणाल वर्णेकर, प्राची गोडबोले, कीर्ती कुमठेकर, स्वराली आलेगांवकर, सौरव दांडेकर.
गानवर्धन संस्थेतर्फे गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या गायकीवर आधारित अनोख्या मैफलीचे शनिवारी एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यात आलेगांवकर यांनी वझेबुवा यांच्या गायकीचे वैविध्यपूर्ण पैलू उलगडून दाखविले. त्यांना सौरव दांडेकर (संवादिनी), अजित किंबहुने (तबला), स्वराली आलेगांवकर, कीर्ती कुमठेकर, प्राची गोडबोले, डॉ. मृणाल वर्णेकर यांनी साथसंगत केली. या प्रसंगी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री व ज्येष्ठ गायिका निर्मलताई गोगटे यांची विशेष उपस्थिती होती.
मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांचे वडिल मोहन कर्वे यांना गायनाचार्य वझेबुवा यांचा सहवास लाभला होता. त्यातूनच वझेबुवांच्या सांगीतिक जीवनप्रवासाची कर्वे यांना ओळख झाली. वडिलांकडून वझेबुवांविषयी, त्यांच्या गायन शैलीविषयी मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांना अनेक गोष्टी ज्ञात झाल्या.
वझेबुवांचे गायन वैशिष्ट्य उलगडून दाखविताना मंजिरी कर्वे-आलेगांवकर यांनी तिलक कामोद रागातील ‘तिरथ को सब करे’ ही बंदिश सादर केली. वझेबुवांना सादिक अली खाँ यांच्याकडून मिळालेली ‘आवता घर आए बालम’ ही द्रुत तालातील बंदिश त्यांनी रसिकांना ऐकविली. आपले वडिल तबला शिकत असल्यामुळे त्यांना त्या काळातील अनेक बुजुर्ग गायकांच्या रियाजाच्या आंतरदालनात सहजतेने प्रवेश मिळाल्याचे सांगून वझेबुवांसह वडिलांनी अनेक मैफलींना हजेरी लावल्याची आठवण त्यांनी सांगितली. वयाच्या 12व्या वर्षी संगीत शिक्षणाच्या ओढीने सावंतवाडी येथून अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या वझेबुवांनी अनेक हालअपेष्टा, अपमान सहन करत भारतभर प्रवास करून विविध घराण्यातील गायकांकडून संगीताची तालीम मिळविली. त्या काळात वझेबुवांची स्वामी विवेकानंद यांच्याशी भेट झाली होती. स्वामीजींनी वझेबुवांना काही दोहे शिकविले त्यातील ‘परम पुरुख नारायण भज मन’ हा दोहा ऐकवून आलेगांवकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
संगीत नाटकाच्या क्षेत्रातही वझेबुवांचे कार्य मोठे आहे. त्यांनी संगीत नाटकातील अनेक पदांना अनवट परंतु आकर्षक चाली लावल्या. यातील ‘नसे सुखाला स्थल..’, ‘मर्म बंधातील ठेवही’, ‘शतजन्म शोधिताना’, ‘परवशता पाश दैवे..’ ही नाट्यपदे सहकलाकारांनी सादर करून वझेबुवांची नाट्यसंगीतावरील हुकमत उपस्थितांना दर्शविली.
वझेबुवांनी मैफलींसह ज्ञानदानाचे कार्य निरपेक्ष भूमिकेतून केले. तसेच बलपेचयुक्त सौंदर्यपूर्ण गायकी ग्वाल्हेर घराण्यात निर्माण केली, अशी महती वर्णन करून आलेगांवकर यांनी ‘मो मनको बसिया कन्हैया’ या भैरवीने मैफलीची सांगता केली.
निर्मला गोगटे यांचा सत्कार गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि डॉ. निलिमा राडकर यांनी तर मंजिरी आलेगांवकर यांचा सत्कार निर्मला गोगटे यांनी केला. प्रास्ताविक दयानंद घोटकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजश्री महाजनी यांनी केले. आभार सचिव रवींद्र दुर्वे यांनी मानले.
–
19व्या शतकाच्या उत्तरार्धात बाळकृष्णबुवा, भास्करबुवा बखले आणि रामकृष्णबुवा वझे या तीन थोर व्यक्तींनी उत्तरेकडे जाऊन शास्त्रीय संगीत शिकून ते महाराष्ट्रात आणले. यातील रामकृष्णबुवा वझे यांनी अन्न-वस्त्र-निवारा यातील कोणतीही अनुकुलता नसताना क्षणोक्षणी, कणाकणाने, वणवण करत नेटाने, शोध-वेध घेऊन, त्रास सहन करून संगीतविद्या संपादन केली. शास्त्रीय संगीत प्रवाही रहावे यासाठी त्यांनी बहुमोल योगदान दिले. क्षणाक्षणाला बदलणारे सांगीतिक विश्व, बदलत्या अभिरुची या क्षेत्रात वझेबुवा हे अमरत्व प्राप्त केलेले गायक होत.
– निर्मला गोगटे, ज्येष्ठ गायिका
———————————————–
जाहिरात
जाहिरात