गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रोटरी क्लब लोकमान्यनगर तर्फे स्वामी विवेकानंद विद्यालयाला 20 लाखांचे शैक्षणिक साहित्य भेट
नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजी सेंटरतर्फे सीएसआर फंडातून उभा केला मदतनिधी : डॉ. मधुरा विप्र
पुणे : रोटरी क्लब लोकमान्यनगरतर्फे आसदे (ता. मुळशी) गावातील स्वामी विवेकानंद विद्यालयाला नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजी सेंटरच्या सीएसआर फंडाद्वारे सुमारे 20 लाख रुपयांचे साहित्य व सुविधा ज्यात कॉम्प्युटर लॅब उभारणीसाठी लागणारे साहित्य, इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, ॲग्रिकल्चर आणि होम सायन्सविषयी तसेच प्रयोग शाळेसाठी लागणारे साहित्य, ग्रंथालयासाठी पुस्तके, कपाटे, विविध वाद्ये, खेळाची साधने व टॉयलेट ब्लॉक्ससह इतर गरजेच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्षा डॉ. मधुरा विप्र यांनी दिली.
स्वामी विवेकानंद विद्यालयातील फलक अनावरण करताना अनिल व्यास, मिलन मोहंती, श्रीकांत डोळे, डॉ. मधुरा विप्र, सतीश शिंदे आदी.
रोटरी क्लब लोकमान्यनगरतर्फे सुमारे एक लाख नागरिकांना विविध योजनांद्वारे मदतीचा हात देण्यात आला आहे.
विवेकानंद माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य व सुविधा समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आल्या. त्या वेळी डॉ. मधुरा विप्र बोलत होत्या. नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजी सेंटरचे वित्त विभाग प्रमुख मिलन मोहंती, श्रीकांत डोळे, भावी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर रो. संतोष मराठे, शाळेचे विश्वस्त अनिल व्यास, रवींद्र विप्र, शाळेचे मुख्याध्यापक सतिश शिंदे मंचावर होते.
स्वामी विवेकानंद विद्यालयातील प्रयोग शाळेतील साधनांची पाहणी करताना मिलन मोहंती, डॉ. मधुरा विप्र, अनिल व्यास.
अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कालावधीत राबविलेल्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देताना डॉ. मधुरा विप्र म्हणाल्या, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने स्वामी विवेकानंद विद्यालयास आवश्यक ती मदत उपलब्ध करून देताना मला विशेष आनंद होत आहे.
मेहनतीशिवाय यश साध्य होत नाही त्यामुळे मेहनत सोडू नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. डॉ. मधुरा विप्र यांनी रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कालावधीत पुण्यातील बालकल्याण केंद्राला सुमारे 24 लाख रुपयांचे बस उपलब्ध करून दिली आहे. वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांसाठी जवळपास दिड कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. विवेकानंद विद्यालय सर्व बाजूने परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देता आल्यामुळे समाधानी आहे, अशा भावना डॉ. विप्र यांनी व्यक्त केल्या.
रोटरी क्लब सेवाभावनेतून अनेक उपक्रम राबवित असतात. गेल्या वर्षभरात लाखो नागरिकांनी त्याचा लाभ घेतला असल्याचे भावी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर रो. संतोष मराठे यांनी सांगितले.
मिलन मोहंती म्हणाले, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून शाळेला उपयोगी साहित्य व सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे मदत नसून समाजाचे देणे समाजाला परत करणे आहे. गुरू-शिष्याचे पवित्र नाते जपत आयुष्यात पुढे जा असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
अनिल व्यास म्हणाले, 1995 साली शाळेची सुरुवात झाली. त्या आधी परिसरातील सहा गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी नदी ओलांडून जात असत. परंतु स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
या प्रकल्पाचे समन्वयक रवींद्र विप्र यांनी मनोगत व्यक्त करताना; मिळालेल्या साधनांचा वापर योग्य पद्धतीने करावा तसेच मिळालेल्या साहित्याचा योग्य वापर करून यशस्वी व्हा, असा सल्लाही दिला.
आरसीपीएल क्लबचे चेतन सूचक यांचे निधी मिळविण्यासाठी महत्वाचे योगदान लाभले आहे. क्लबच्या माजी अध्यक्ष टीना रात्रा यांनी या प्रसंगी शाळेला बारा हजारांचा निधी जिम उपकरणांसाठी भेट म्हणून दिला.
स्वामी विवेकानंद विद्यालयात रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली आहे. क्लबच्या अध्यक्षपदी संग्राम भरम आणि सचिवपदी रुद्राक्ष ठोंबरे या विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सदस्य म्हणून 10 विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. पदाची सूत्रे संतोष मराठे आणि डॉ. मधुरा विप्र यांनी विद्यार्थ्यांकडे सोपविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सोवनी यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे आणि रो. मनोज अगरवाल यांनी मानले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ. मधुरा विप्र, संतोष मराठे, सतीश शिंदे यांनी केला. सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी संस्थेचे ध्येयगीत सादर केले. कार्यक्रमास क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात