जीएंचा स्पर्श झालेले साहित्य विचारांचे काहूर माजविते : मृणाल कुलकर्णी
जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘वंश’ कथेवर आधारित लघुपटाचे स्क्रिनिंग
पुणे : जीएंच्या कथा-कादंबऱ्यांचा अर्थ, भावार्थ, गूढार्थ शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक वाचक करीत असतो. जीएंचा स्पर्श लाभलेले कोणतेही साहित्य, कलाकृती सतत आपल्या मनामध्ये आवर्त, विचारांचे काहूर माजवते.
‘वंश’ लघुपटाच्या स्क्रिनिंगवेळी उपस्थित ऋषी मनोहर, नंदा पैठणकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. वरदा जाधव, निर्माते गणेश जाधव, गौरव बर्वे.
‘वंश’ कथा सुरेख तर आहेच आणि ती नेमकेपणाने पडद्यावर आली आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी काढले.
प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या ‘वंश’ कथेवर आधारित लघुपटाची निर्मिती सावी आर्टस् आणि वाईड विंग्ज मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.
या लघुपटाचे प्रथम स्क्रिनिंग रविवारी नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया येथे करण्यात आले. त्या वेळी कुलकर्णी बोलत होत्या.
जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, वाईड विंग्ज मीडियाचे राजेंद्र मनोहर, पौर्णिमा मनोहर, अभिनेत्री डॉ. वरदा जाधव, निर्माते गणेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी चित्रपट, नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित होते.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या, जी अनोखी, उत्तम कलाकृती असते तिच्या विषयी नेहमीच असे बोलले जाते की, ती अनेक प्रसवा असते, म्हणजेच जितक्या वेळा ती वाचली जाईल तितक्या वेळेला तिच्यातून अर्थ, अन्वयार्थ वेगळ्या पद्धतीने दिसतात. ‘वंश’ ही जीएंची फार सुरेख अशी कथा आहे. या कथेवर लघुपट करण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे.
लघुपटाच्या स्क्रिनिंगनंतर लघुपटावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अभिनेत्री डॉ. वरदा जाधव, दिग्दर्शक ऋषी मनोहर, पटकथा, संवाद लेखक गौरव बर्वे, निर्माते गणेश जाधव यांचा सहभाग होता. त्यांच्याशी गौरी देशपांडे यांनी संवाद साधला.
लघुपटासाठी ‘वंश’ कथेची निवड का केली याविषयी गणेश जाधव यांनी माहिती दिली. कथेचा गाभा न हरविता लघुपटाची निर्मिती केली असल्याचे गौरव बर्वे म्हणाला. ऋषी मनोहर म्हणाला, ही कथा स्त्री पात्राभोवती फिरते आहे. कागदावरील पात्र पडद्यावर उभे करण्यात वेगळा आनंद मिळाला आहे. भूमिका साकारताना पात्राचा विचार कशा पद्धतीने केला गेला याविषयीचा प्रवास डॉ. वरदा जाधव यांनी उलगडला.
या लघुपटात प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांचीही भूमिका आहे. पुष्कर झोटिंग सिनेमॅटोग्राफर असून कुशल खोत प्रोडक्शन मॅनेजर आहेत.
मृणाल कुलकर्णी यांचा सत्कार नंदा पैठणकर यांनी केला तर लघुपटातील कलाकारांचा सत्कार मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन गौरी देशपांडे यांनी केले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात