बाबा रामदेव यांच्यासह पुणेकरांनी साधला ‘योग’
जितो स्पोर्टस्च्या माध्यमातून पुणे जितो चॅप्टरतर्फे आयोजन : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि योगदिनाचे औचित्य
योगसाधना जीवनाचा आधार : योगगुरू बाबा रामदेव
पुणे : योगसाधना जीवनाचा आधार आहे. दीर्घायुष्यासाठी नियमित योगसाधना करताना संतुलित आहारात भरड धान्याचा समावेश असावा. आरोग्य शिक्षणाबरोबरच आहाराविषयीची जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले.
आयुष्य-वयोमानाची गणना केवळ दिवसांमध्ये नव्हे तर शारीरिक स्वास्थ आणि तंदुरुस्तीद्वारे करायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जितो स्पोर्टस्च्या सहकार्याने जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत आज (दि. 4) योगसाधना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पहाटे 5 वाजता सहकार नगर येथील सदू शिंदे मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन पुणे जीतो चॅप्टरने जितो स्पोर्टस्च्या माध्यमातून केले होते. आपले स्वास्थ उत्तम व आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगसाधनेचे महत्त्व या विषयावर योगगुरू बाबा रामदेव यांनी जितो सदस्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन केले.
बाबा रामदेव यांच्यासमवेत योगसाधना-प्राणायाम करण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळाली. जितो स्पोर्टस् ॲपेक्सचे अध्यक्ष विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला यांनी बाबा रामदेव यांच्यासह योगसाधना केली.
आरोग्यासाठी योगसाधनेची उपयुक्तता विशद करताना बाबा रामदेव म्हणाले, नागरिकांनी व्यसन, दुर्गुणांच्या आहारी न जाता रोग-व्याधीमुक्त जीवनाला प्राधान्य दिले पाहिजे. आयुष्याचा आनंद विवेकपूर्णतेने घेणे आवश्यक आहे. आहारात मीठ, साखर, तळकट, तुपकट अन्नाचा अतिरेक न करता भाज्या, फळांचे रस, भरड धान्याचा उपयोग केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
योगसाधनेची सुरुवात योगिक जॉगिंगने केल्यानंतर सूर्यनमस्कारासह विविध आसनांची, प्राणायामाची माहिती देत त्याची उपयुक्तता बाबा रामदेव यांनी पटवून दिली. ताडासन, वृक्षासन, गरुडासन, भुजंगासन, शलभासन, धनुरासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, अर्ध हलासन, मकरासन, अर्ध पवन मुक्तासन, मर्कटासन, उष्ट्रासन, गोमुखासन अशा विविध आसनांसह प्राणायामातील भस्त्रिका, कपालभाती, अनुलोमविलोमचे प्रात्यक्षिक दाखवित उपस्थितांकडून ते करवून घेतले. दिवसातून कमीतकमी एक तास तरी व्यायाम-योगसाधना करा असा सल्लाही त्यांनी दिला.
=-=-
योगाची अवहेलना करू नका
योग हे महत्त्वाचे तत्त्व आहे. त्याची अवहेलना करू नका. योगसाधनेने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक अशा सर्व प्रकारचे स्वास्थ्य तसेच सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते. सकाळी योगसाधना करा, नंतर दिवसभर कर्मयोग, सहयोग करून कर्मयोगी, सहयोगी, उपयोगी, उद्योगी, उद्यमशील बना.
– बाबा रामदेव, योगगुरू
=-=-
मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करून जितो पुणे चॅप्टरचे अध्यक्ष राजेश सांकला म्हणाले, बाबा रामदेव यांनी संपूर्ण विश्वाला योगसाधनेचे महत्त्व पटवून तर दिले आहेच त्याचबरोबरीने योग साधना करण्यास प्रवृत्तही केले आहे.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचे स्वागत करून उपाध्यक्ष विजय भंडारी म्हणाले, जितोच्या स्पोर्टस् विभागात योगाचा समावेश करणे ही अभिनंदनीय बाब आहे.
जितो ॲपेक्सचे अध्यक्ष अभय श्रीश्रीमाळ म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त जितोतर्फे या वर्षात 75 हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्याच प्रमाणे देशात विविध उर्जादायी उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
सुरुवातीस णमोकार मंत्र आणि गुरुवंदना सादर करण्यात आली. बाबा रामदेव यांचे स्वागत विशाल चोरडिया, राजेश सांकला, अभय श्रीश्रीमाळ, कांतिलाल ओसवाल, संजय लोढा, नरेंद्र छाजेड, मनोज छाजेड, विकी ओसवाल, अजित सेठ, एस. के. जैन, इंद्रजित जैन, अचल जैन, धीरज छाजेड, दिलीप जैन, कुणाल ओस्तवाल, अमोल कुचेरिया, संगीता ललवाणी, हितेश शहा, लकिशा मलरेचा आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश ओसवाल यांनी केले.
जितो स्पोर्टस् ॲपेक्सचे चेअरमन विशाल चोरडिया, जितो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो पुणे चॅप्टरचे चिफ सेक्रेटरी चेतन भंडारी, सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सह सेक्रेटरी संजय डागा, खजिनदार किशोर ओसवाल, डायरेक्टर इन्चार्ज दिलीप जैन, कॉन्व्हेनर कुणाल ओस्तवाल, को कॉन्व्हेनर अमोल कुचेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात