गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पर्यावरण दिनाचे औचित्य साधत
जवानांच्या कुटुंबियांनी घेतला गायन-नृत्याविष्काराचा आनंद
पुणे : स्त्री आणि निसर्गातील नवनिर्मिती करण्याच्या सामर्थ्याला सलाम करणारा गायन-नृत्यावर आधारित सांगीतिक कार्यक्रम पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांसाठी हा कार्यक्रम विशेषत्वाने घेण्यात आला.
माणिक मंत्री-आजगावकर यांच्या ‘एकतारी’ या संस्थेतर्फे ‘नाद-रंग’ या गायन-नृत्याच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम सदन कमांडमधील चरक सभागृहात झाला. कलाकरांनी सादर केलेल्या गीतांना आणि नृत्याला महिलांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात ‘ॐ जय जगदीश हरे’ या भजनाने झाली. त्यांनतर ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘ये हँसी वादियाँ’, ‘छू कर मेरे मनको किया तुने क्या इशारा’, ‘मेघा छाए सारी रात’ ही सुप्रसिद्ध चित्रपट गीते उपस्थितांना सूरांच्या अनोख्या विश्वात घेऊन गेली. उमरावजान चित्रपटातील ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए’ या व्हायोलिनवरील सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सांगता ‘वो भारत देश है मेरा’, ‘भारत हमको जान से प्यारा है’, ‘ए वतन ए वतन मेरे आबाद रहे तु’ अशा विविध देशभक्तीपर गीतांनी करण्यात आली, त्यावेळी श्रोते भावनाप्रधान झाले. अंजली शिंगडे-राव यांचे सोलो व्हायोलिन वादनही झाले.
पंडित शरद सुतवणे यांचे पुत्र मनोज सुतवणे (गायन-हार्मोनियम), वर्षा जोशी (गायन), अनिरुद्ध देवकर (गायन) तर साथसंगत शिवानी देशपांडे (तबला), अभय इंगळे (ऑक्टोपॅड, बासरी), अमन सय्यद (की-बोर्ड) यांची होती. नीरजा आपटे यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस आणि सहकलाकारांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर कथक नृत्यशैलीतील नृत प्रकारातील 12 मात्रांचा चौताल सादर करण्यात आला. ‘शिवस्तुती’ आणि राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा गतभावाद्वारे सादर करून नृत्यांगनांनी रसिकांना प्रभावित केले.
पुढे जमेनीस आणि सहकलाकारंनी हिंदी चित्रपटातील ‘मोहे पनघट पे नंदलाल’, ‘मोसे छल किए जाए’, ‘बडा नटखट है रे’, ‘राधा कैसे ना जले’, ‘काहे छेड छेडे मोहे गरवा’ आणि ‘गोपाल राधे शाम गोविंद हरी’ अशा विविध गीतांवर कथक नृत्य सादर केली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जमेनीस आणि सहकलाकरांनी अतिशय बहारदारपणे पदन्यास दाखवित, रसिकांना टाळ्यांद्वारे पदन्यासातील बोलांमध्ये सहभागी करून घेत कार्यक्रमात अनोखी रंगत आणली.
‘नाद-रंग’ कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना माणिक मंत्री-आजगावकर यांची होती. अभिजात संगीत कार्यक्रमांचे सादरीकरण आणि युवा पिढतील कलाकरांना मंच मिळवून देण्याचा संस्थेतर्फे प्रयत्न केला जातो, असे माणिक मंत्री-आजगावकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनात सोनिया राव यांचे सहकार्य लाभले.
—————————————–
जाहिरात
जाहिरात
जाहिरात