गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘बखर ललितादित्याची’मुळे काश्मीरचा दडलेला इतिहास जगासमोर येईल : संजय सोनवणी !!
डॉ. लिली जोशी लिखित काश्मीर नरेश ललितादित्य मुक्तापीड यांच्या जीवनावर आधारित कादंबरीचे प्रकाशन !!
पुणे : दंतकथांनाच इतिहास समजण्याची सवय लागली असल्यामुळे खऱ्या इतिहासाला जाणून घेण्याचा, पाहण्याचा दृष्टीकोनच समाजाकडे नाही. त्यामुळे खरा इतिहास समाजासमोर येत नाही. ‘बखर ललितादित्याची’ या कादंबरीच्या माध्यमातून काश्मीरच्या दडलेल्या इतिहासाला समाजासमोर आणण्याचे कार्य घडत आहे. इतिहासाचे भान ठेवून डॉ. लिली जोशी यांनी तथ्यात्मकता राखत कल्पनाशक्तीला ठराविक प्रमाणातच संधी देत, चिकित्सक वृत्तीने इतिहासाकडे पाहिले आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक, लेखक संजय सोनवणी यांनी केले.
काश्मीर नरेश ललितादित्य मुक्तापीड यांच्या जीवनावर आधारित ‘बखर ललितादित्याची’ या डॉ. लिली जोशी लिखित ऐतिहासिक कादंबरीचे प्रकाशन रविवारी (दि. 15) ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी संजय सोनवणी बोलत होते.
बखर ललितादित्याची’ कादंबरीचे प्रकाशन करताना (डावीकडून) संदीप तापकीर, डॉ. लिली जोशी, मंगला गोडबोले, संजय सोनवणी आणि विशाल सोनी.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वकर्मा प्रकाशनचे सीईओ विशाल सोनी, संदीप तापकीर मंचावर होते.
पुस्तक लेखनामागील भूमिका मांडताना डॉ. लिली जोशी म्हणाल्या, काश्मीर नरेश ललितादित्य हा अज्ञाताच्या पडद्याआड गेलेला महान नायक आहे. या राजाविषयी फारशी कुणाला माहिती नाही. समाकालीन राजांच्या मांदियाळीत ललितादित्य हा स्वयंप्रकाशित राजा होता.
तो फक्त रणवीरच नव्हे तर अत्यंत मुत्सद्दी होता. त्याला हिंदवी स्वराज्याची, लोककल्याणाची ओढ होती. हिमालयात वारंवार गेल्याने कादंबरी वर्णनात्मक लिहिण्यासाठी त्याचा उपयोग झाला. घटनाक्रम आणि कल्पनाशक्ती या दोन्हीची सांगड घालत, साधलेले ललित लेखन इतिहासातील सोनेरी पान ठरावे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मंगला गोडबोले म्हणाल्या, डॉ. जोशी यांनी कादंबरीची मांडणी करताना खूप तपशीलाने विचारपूर्वक चतुराईने लेखन करत आठवे शतक आणि एकविसावे शतक यातील नाते जोडले आहे.
रुळलेली वाट सोडून त्यांनी केलेल्या लेखनातून प्राचीन भारताचा उज्ज्वल इतिहास समाजासमोर येत आहे. दोन शतकांची सांगड घालताना लेखिकेने योगे ते दुवे साधत लेखनाचा तोल यशस्वीरित्या सांभाळला आहे. डॉ. जोशी यांनी मानवी संबंधांचे ताण-तणाव विवेकाने सांभाळले असून शब्दसंपदेचा उत्तम रितीने वापर करत भाषेचे तारतम्यही राखले आहे.
संजय सोनवणी पुढे म्हणाले, काश्मीर नरेश ललितादित्य हा अत्यंत पराक्रमी व मुत्सद्दी राजा होता. त्याने आठव्या शतकात अनेक व्यापारी मार्ग मुक्त केले, भारताच्या सीमांचे रक्षण केले अशा सम्राटाची महती या कादंबरीतून कळणार आहे.
भारताचा इतिहास वाचकांसमोर यावा यासाठी ऐतिहासिक पुस्तकांची निर्मिती करत असल्याचे विशाल सोनी यांनी सांगितले. तर पुस्तकाच्या निर्मितीविषयी संदीप तापकीर यांनी माहिती दिली. डॉ. नरेंद्र जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संगीता पुराणिक यांनी केले. मान्यवरांचा सत्कार डॉ. लिली जोशी यांनी केला.