गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती संगीत समारोह रविवारी
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन : यंदाची संकल्पना ‘भैरव ते भैरवी’ !!
सलग 14 तास 11 कलाकारांचे होणार सादरीकरण : गायन, वादन आणि नृत्याची पर्वणी
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात येत असलेला यंदाचा रौप्य महोत्सवी (25वा) वि. वि. द. स्मृती संगीत समारोह येत्या रविवारी (दि. 8 डिसेंबर) आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी नव-नव्या संकल्पनेवर आधारित समारोहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाची संकल्पना ‘भैरव ते भैरवी’ अशी आहे.
गायन, वादन, नृत्याचा समावेश असलेला यंदाचा समारोह सकाळी 8 ते रात्री 10 असा 14 तास चालणार असून यात 30 ते 40 वयोगटातील 11 कलाकारांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे आणि उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. वि. वि. द. स्मृती संगीत समारोह गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे.
समारोह सर्वांसाठी खुला आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दि. 5 मे 1901 रोजी गांधर्व महाविद्यालयाची लाहोर येथे स्थापना केली. त्यानंतर या संकल्पनेचा प्रसार संपूर्ण भारतात झाला आणि देशाच्या विविध भागात गांधर्व महाविद्यालयांना सुरुवात झाली. पंडित पलुस्कर यांचे पट्टशिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी दि. 8 मे 1932 रोजी गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना केली.
पलुस्कर यांचे चिरंजीव पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांचे सांगीतिक शिक्षण याच संस्थेत झाले. गांधर्व महाविद्यालयाचे तीन महान कलाकार पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या 24 वर्षांपासून म्हणजे 1999 सालापासून वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे आयोजन केले जात आहे.
या तीनही महान कलाकारांच्या कार्याचे स्मरण कलाकार आणि रसिकांना असावे या प्रामाणिक हेतूने समारोहाचे आयोजन केले जाते. या समारोहात सहभागी होणारे कलाकार श्रद्धायुक्त भक्तीभावाने आपली कला सादर करत असतात.
यंदाच्या समारोहाची सुरुवात नम्रता गायकवाड यांच्या शहनाई वादनाने होणार आहे. त्यानंतर गायत्री जोशी (गायन), अभिषेक शिनकर (स्वतंत्र संवादिनी वादन), आदित्य मोडक (गायन), जयंत केजकर (गायन), ओजस अढीया (तबला), अभिषेक बोरकर (सरोद), अनन्या गोवित्रीकर (कथक), रमाकांत गायकवाड (गायन), शाकीर खान (सतार), आदित्य खांडवे (गायन) हे आपली कला सादर करणार आहेत.
कलाकारांना किशोर कोरडे, आशय कुलकर्णी, अभिजित बारटक्के, रोहित मुजुमदार, प्रणव गुरव तबला साथ करणार असून अमेय बिच्चू, अभिनव रवंदे, अभिषेक शिनकर संवादिनीची साथ करणार आहेत. वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे उद्घाटन सीजीएसटीचे आयुक्त डॉ. रवींद्र डांगे यांच्या हस्ते होणार आहे.
गेल्या 24 वर्षात वि. वि. द. स्मृती संगीत समारोहात पंडित संजीव अभ्यंकर, विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित विश्वमोहन भट्ट, पंडित उदय भवाळकर, पंडित भवानीशंकर, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे, पंडित विजय घाटे, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित उल्हास कशाळकर, पंडित राजन-साजन मिश्रा, पंडित मधुप मुद्गल, विदुषी एन. राजम, पंडित निलाद्रीकुमार, विदुषी मालिनी राजूरकर, विदुषी वीणा सहस्रबुद्धे, उस्ताद सुजात खान, पंडित सुरेश तळवलकर, विदुषी पद्मा तळवलकर, पंडित व्यंकटेशकुमार आदी सुप्रसिद्ध कलाकारांनी आपली सेवा रुजू केली आहे.