Marathi FM Radio
Thursday, December 12, 2024

आबासाहेब अत्रे, इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कारांचे वितरण !

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचा वापर केवळ राजकारणासाठी : डॉ. राजाराम दांडेकर

आबासाहेब अत्रे, इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कारांचे वितरण

पुणे : स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, विनोबा भावे अशा महनीय व्यक्तींचे शिक्षणाविषयी विचार समाजापुढे यावेत, अशी अपेक्षा आहे. मात्र महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचारांचा वापर केवळ राजनितीसाठी केला जातो आहे, अशी खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजाराम दांडेकर यांनी व्यक्त केली.

Advertisement

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‌‘आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’

Advertisement

बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिलेल्या मराठी लेखिका तसेच पुण्यातील गरवारे बालभवनच्या माजी संचालिका कै. शोभा अनिल भागवत यांना तर ‌‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार‌’ पिरंगुट जवळील संस्कार प्रतिष्ठान संचालित मतिमंद मुलांची निवासी शाळा व प्रौढ मतिमंदांसाठी निवासी शेती प्रकल्प राबविणारे उल्हास केंजळे व प्रतिभा केंजळे या दाम्पत्यास शनिवारी (दि. 30) प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण डॉ. राजाराम दांडेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Advertisement

गुरुवर्य आबासाहेब अत्रे आणि ‌‘इंदिरा अत्रे पुरस्कार‌’ पुरस्कार वितरण प्रसंगी (डावीकडून) संजीव महाजन, प्रतिभा केंजळे, उल्हास केंजळे, डॉ. राजाराम दांडेकर, आभा भागवत, डॉ. रघुवीर कुलकर्णी, नीलेश येवलेकर.

Advertisement

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष नीलेश येवलेकर मंचावर होते. पुरस्काराचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आवारातील खुल्या मंचावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

कै. शोभा भागवत यांना मरणोत्तर देण्यात आलेला पुरस्कार त्यांच्या कन्या आभा भागवत यांनी स्वीकारला. कै. शोभा भागवत यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह असे तर केंजळे दाम्पत्यास दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे.

रेणूताई दांडेकर, दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रफुल्ल निकम, भारत वेदपाठक, वीणा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. डॉ. भारती एम. डी. आणि प्रसाद भडसावळे यांनी संयोजन केले.

देश-विदेशातील शिक्षण व्यवस्थांविषयी अनुभव कथन करून डॉ. दांडेकर म्हणाले, आयुष्यातील प्रश्नांचा बाऊ न करता पर्यायांचा विचार केला गेला पाहिजे, कारण त्यातच समस्येचे उत्तर सापडते. हाताने केलेल्या कृती, गोष्टी कायम लक्षात राहतात यातून संवेदना नव्याने जागृत होतात, बुद्धिला चालना मिळते.

अशा पद्धतीच्या शिक्षणातून मनोविकलांग मुलांमध्येही बदल होऊन त्यांचा विकास होतो. प्रत्येक मुलातील सद्गुण शोधून त्याची पारख होऊन योग, ध्यान, संगीत, शेती आणि लघुउद्योगांद्वारे शिक्षण दिल्यास मनोविकलांग मुले देखील स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात.

ते पुढे म्हणाले, शोभा भागवत यांनी लहान मुले व पालकांसाठी केलेले सामाजिक कार्य अद्भुत आहे. सहजीवन कसे असावे याचा परिपाठ भागवत दाम्पत्याने समाजापुढे ठेवला आहे. विस्कटलेली माणसे व संसार पुन्हा जुळून मार्गी लागावीत यासाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे.

पालकांचा विश्वास हा महत्त्वाचा घटक : केंजळे
सत्काराला उत्तर देताना आमच्या कार्यात संपूर्ण समाजाचे योगदान असून या सर्वांमार्फत आम्ही या पुरस्काराचा स्वीकार करत आहोत, अशा भावना प्रतिभा केंजळे व उल्हास केंजळे यांनी व्यक्त केल्या. विकलांग मुलांच्या संगोपनात पालकांची मानसिक ताकद महत्त्वाची असते.

आमच्या शाळेच्या माध्यमातून सर्व वयोगटातील मतिमंद मुलांचा सांभाळ करताना पालकांचा आमच्यावरील विश्वास हा घटक महत्त्वाचा ठरला आहे. समाजाच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे विकलांग मुलांविषयी आस्था जागृत झाल्यास आमचे कार्य सोपे होईल, असे त्यांनी नमूद केले.

शोभाताई मैत्रिणीच्या भूमिकेत असत
शोभा भागवत यांच्या कार्याला उजाळा देताना त्यांच्या कन्या आभा भागवत म्हणाल्या, मुले शिकत असताना त्यांना आवश्यक असणारा निवांतपणा, मोकळेपणा, आपले ऐकून घ्यायला कुणाची तरी असल्याची भावना शोभाताई यांनी दिल्यामुळे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत त्या मैत्रिणीच्या भूमिकेतच असत. मुलांविषयी असलेला प्रेमाचा झरा त्यांनी कधीही कमी होऊ दिला नाही.

मुलांची शारीरिक, मानसिक गरज ओळखून त्याविषयी पालकांना जागृत करून मुलांच्या संगोपनातील पालकांचा सहभाग वाढवत शोभाताईंनी त्यांना सहज पालकत्व शिकविले. कोवळ्या वयाच्या मुलांच्या मनातील आत्मविश्वास कमी करू नये कारण ही मुलेच उद्याचा समाज घडविणार आहेत, या मतावर त्या ठाम होत्या.

मान्यवरांचे स्वागत डॉ. रघुवीर कुलकर्णी, संजीव महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तर परिचय ज्येष्ठ शिक्षिका विनया भंडारी, समीर शिपूरकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कल्पना गुजर यांनी केले.

 

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org