गोल्डन आय न्युज नेटवर्क
जोडीदार पाठीशी उभा राहिला तर पत्नीही होते यशस्वी : सुकन्या कुलकर्णी-मोने !
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे सुकन्या मोने आणि संजय मोने यांचा यशवंत-वेणू पुरस्काराने गौरव !!
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा 24वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !
पुणे : प्रत्येक क्षेत्रात मदत करणारा, पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा जोडीदार मिळाल्यास पत्नीलाही तिच्या कार्यक्षेत्रात यश मिळू शकते हे संजय मोने यांनी सिद्ध केले आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक क्षेत्रातील आमची वाटचाल समांतर होत असताना प्रगतीही होत गेली, अशी प्रांजळ भावना प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी व्यक्त केली तर परिचयात सांगितलेले गुणांचे कोठार माझ्यात नाही, पण हे गुण भविष्यात माझ्यात नक्की येतील, अशी मिश्लिक टिप्पणी संजय मोने यांनी व्यक्त करत पत्नीमुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आयोजित यशवंत-वेणू पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) मदन गायधने, सत्यजित धांडेकर, सुकन्या मोने, संजय मोने, सुहास जोशी, सुनील महाजन, समीर हंपी, दीपक गुप्ते
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत-वेणू पुरस्काराने प्रसिद्ध अभिनेते संजय मोने आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांचा सोमवारी गौरव करण्यात आला. त्या वेळी सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा 24वा वर्धापन दिन यानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे 7वे वर्ष असून पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सत्यजित धांडेकर, समीर हंपी, उद्योजक अमित गोखले, दीपक गुप्ते, मदन गायधने मंचावर होते. मानपत्र, शाल आणि पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सुहास जोशी यांना विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
सुकन्या मोने म्हणाल्या, यशवंत-वेणू पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीची जाणीव झाली आहे तसेच नाट्य-कला क्षेत्रात, रंगमंचावर पुन्हा एकदा कार्यरत होण्याची उभारी निर्माण झाली आहे. माणूस म्हणून प्रिय असलेल्या लाडक्या सुहासताईंच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद आहे.
संजय मोने म्हणाले, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पण भावनिक नात्याने बांधल्या गेलेल्या दाम्पत्याचा यशवंत-वेणू पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे. पुरस्काराविषयी आभार व्यक्त करून नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
निदान रुमाल तरी द्या..
सुकन्या मोने यांचा सत्कार करताना पुणे या माहेरघरातून त्यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तर माझा सत्कार करताना शाल देण्यात आली. जी मुंबईत घालून फिरलो तर लोक मला डोक्यावर पडला आहेस का? असे विचारतील. त्यामुळे मला रुमाल तरी द्या, असे म्हटल्यानंतर सुकन्या मोने म्हणाल्या, पुणेकर रसिकांना माहित आहे की, मला मिळालेली साडी नेसून तू रंगमंचावर वावरू शकतोस. या शाब्दिक कोट्यांवर पुणेकर रसिकांनी टाळ्यांची दाद दिली.
पुण्याने मला जीवनात उभे केले : सुहास जोशी
पुणेकर प्रेक्षक मला मनापासून आवडतात असे आवर्जून सांगून सुहास जोशी म्हणाल्या, माझा जन्म पुण्यातील असल्यामुळे आणि माझी जडणघडण पुण्यात झाल्यामुळे मला पुण्याविषयी विशेष ममत्त्व आहे. पुण्यात येताना माझ्या जडणघडणीतील अनेक वास्तू पाहून मला जुने दिवस आठवले. पुण्याने मला खूप काही दिले आहे, जीवनात उभे केले आहे. पुण्याहून सुरू झालेला नाट्यक्षेत्रातील प्रवास दिल्ली मार्गे मुंबईत येऊन स्थिरावला. माझ्या यशात माझ्या पतीचा फार मोठा वाटा आहे. यामुळेच सांस्कृतिक क्षेत्रातील जोडप्याचा सत्कार यशवंत-वेणू पुरस्काराने होत आहे ही माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे. सुकन्या आणि संजय हे मला मुलांसारखे आहेत. त्यांना पुरस्कार देताना त्यांच्या बरोबर अभिनय केलेल्या नाटक-मालिकांमधील आठवणी जाग्या झाल्या.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेविषयी तर समीर हंपी यांनी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या उपक्रमांची सविस्तर माहिती सांगितली. मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, अमित गोखले, सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते यांनी केले. सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले तर आभार सत्यजित धांडेकर यांनी मानले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर ‘तो राजहंस एक’ या संगीतकार श्रीनिवास खळे संगीत रजनी कार्यक्रमात मंदार आपटे आणि मनिषा निश्चल यांनी गीते सादर केली. स्मिता गवाणकर यांनी निवेदन केले.