गोल्डन आय न्युज नेटवर्क
श्रृंगाराचा आस्वाद घेत शांततेकडे जाता आले पाहिजे : डॉ. सदानंद मोरे
स्वत:ला मोक्ष मिळताना समाजालाही मोक्षाचे दान करता आले पाहिजे : हभप चैतन्य महाराज देगलुरकर
संत विचार प्रबोधिनीतर्फे डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराने प्रमोद महाराज जगताप आणि रघुवीर खेडकर यांचा सन्मान
पुणे : लावणी आणि कीर्तनाच्या परंपरांनाही मर्यादा आहेत. त्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी उत्तम आहेत. गेल्या काही वर्षांत कीर्तनकारांनी जनसामान्यांची रसिकता हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. संसार म्हणजे मिथ्या आहे, श्रृंगार हा विषय त्याज्य आहे असा प्रचार केला. परंतु श्रृंगाराचाही आस्वाद घेत शांततेकडे जाता आले पाहिजे. श्रृंगार नाकारणे, लावणीकडे तुच्छतेने पाहणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
वै. डॉ. रामचंद्र देखणे यांचे साहित्य, लोककला, वारकरी संप्रदाय या क्षेत्रांमधील योगदान लक्षात घेऊन तसेच त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून संत विचार प्रबोधिनीतर्फे ‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारांचे वितरण आज (दि. 12) करण्यात आले त्या प्रसंगी डॉ. मोरे बोलत होते.
संत विचार प्रबोधिनी आयोजित ‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023′ वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) भाऊसाहेब भोईर, अंजली रामचंद्र देखणे, डॉ. भावार्थ देखणे, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप चैतन्यमहाराज देगलूरकर, डॉ. सदानंद मोरे, रघुवीर खेडकर, डॉ. पी. डी. पाटील, सचिन ईटकर.
‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023, कीर्तनकार’ हा पुरस्कार सुप्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह. भ. प. प्रमोद महाराज जगताप यांना तर ‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कर 2023, लोककला’ हा पुरस्कार प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना वै. धुंडामहाराज देगलूरकर यांचे नातू, प्रसिद्ध प्रवचनकार, कीर्तनकार ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सन्मान पत्राचे वाचन डॉ. पूजा देखणे यांनी केले.
गरवारे कॉलेजमधील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह भाऊसाहेब भोईर, सचिन ईटकर, डॉ. भावार्थ देखणे व्यासपीठावर होते.
कीर्तनकार आणि तमासगीर यांच्यातील वादाविषयी बोलताना डॉ. मोरे म्हणाले, इंदुरीकर महाराज आणि गौतमी पाटील यांच्यावर त्यांच्या-त्यांच्या प्रांतातील लोक टीका करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आत्मपरिक्षण करावे. पूर्वीच्या काळी लावणीकडे संकुचित वृत्तीने पाहिले जात नव्हते. शाहिरांनी संतांवर, पंढरीवरही लावण्या केल्या आहेत. लावणीकलेने अध्यात्म स्वीकारले होते. तमासगीरांचा अभंग, ओव्यांवर अभ्यास होता. त्यांनी अनेक विरहिणी रचल्या आहेत.
डॉ. रामचंद्र देखणे यांच्याविषयीचे ऋणानुबंध विशद करून चैतन्यमहाराज देगलुरकर म्हणाले, देखणेसरांना कोणताही विषय त्याज्य नव्हता. हाती घेतलेले काम ते तडीस न्यायचे. आपल्याला मोक्ष मिळावा म्हणजे अध्यात्म असा मर्यादित अर्थ असल्यास संतांना आध्यात्मिक म्हणणे धाडसाचे ठरेल. संत वाङ्मयामध्ये आपल्याला काय मिळेल याला अध्यात्म म्हटलेले नाही तर जे मिळते ते इतरांनाही देता येते की नाही याला अध्यात्म म्हटले आहे. स्वत:ला मोक्ष मिळताना समाजालाही मोक्षाचे दान करता आले पाहिजे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, पुरस्कारार्थींची निवड योग्य आहे. देखणे यांच्या घरावर उत्तम संस्कार आहेत. भावार्थ देखणे यांनी वडिलांच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळून देखणे यांच्या कार्याची उंची वाढविली आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रमोद महाराज जगताप म्हणाले, कीर्तनातील टाळ आणि लावणीतील चाळ यांना एकाच व्यासपीठावर आणून सन्मानित करतात त्यांना देखणे म्हणतात. देखणेसरांनी बहुरुपी नुसताच मांडला नाही तर तो जगला. व्यासपीठावर मान्यवरांच्या मांदिआळीकडे बघून या पुरस्कारांना संतांची, गुरूंची आणि विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने हा पुरस्कार सरस्वती पुत्रांचा मानून स्वीकारतो.
रघुवीर खेडकर म्हणाले, या पुरस्काराने लावणी अभंगापुढे नतमस्तक झाली आहे. कीर्तन आणि तमाशा ही नदीची दोन टोके आहेत यांना एकत्र आणण्याचे काम देखणे महाराजांनी केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यामागील भूमिका डॉ. भावार्थ देखणे यांनी विशद केली. डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानची घोषणा डॉ. पूजा देखणे यांनी केल्यानंतर प्रतिष्ठानचे विधीवत उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रतिष्ठानअंतर्गत बाल भारूडकारांसाठी डॉ. रामचंद्र देखणे भारूडकार स्पर्धा हा पहिला उपक्रम घेण्यात येणार असल्याचे पूजा देखणे यांनी सांगितले.
पुरस्काररूपी मिळालेली रक्कम प्रमोद महाराज जगताप यांनी धुंडीराज उपसाना केंद्राला समर्पित केली तर रघुवीर खेडकर यांनी डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठनला देऊ केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पांडुरंगाच्या मूर्तीचे आणि डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीस अवधूत गांधी यांनी पंचपदी सादर केली.
मान्यवरांचे स्वागत भाऊसाहेब भोईर, रवी घाटे, शुभम नवले, संदीप नवले, अप्पा नवले, मकरंद टिल्लू, देविदास जाधव, सचिन ईटकर, सुचेता रत्ने, अंजली देखणे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले तर आभार डॉ. पद्मश्री जोशी यांनी मानले.
फोटो ओळ : संत विचार प्रबोधिनी आयोजित ‘वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार 2023′ वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) भाऊसाहेब भोईर, अंजली रामचंद्र देखणे, डॉ. भावार्थ देखणे, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप चैतन्यमहाराज देगलूरकर, डॉ. सदानंद मोरे, रघुवीर खेडकर, डॉ. पी. डी. पाटील, सचिन ईटकर.
जाहिरात