गोल्डन आय न्यूज नेटवर्क
व्याकरण मोडून केलेले लिखाण हा काव्याचा अपमान : डॉ. सुधीर रसाळ
सामाजिक विषयांवर लिखाण करणे हे विचारवंतांचे काम ; कवींचे नव्हे विश्वास वसेकर यांच्या ‘मूल्यत्रयीची कविता’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
पुणे : कविता ही मूलगामी गोष्ट असून पूर्णार्थाने वाङ्मय या प्रकारात मोडते. गद्य ओळींमधील शब्दांचा अनुक्रम बदलून केलेले लिखाण म्हणजे कविता असा काही कवींचा समज झालेला दिसतो. व्याकरण मोडून शब्द एकामागे एक लिहून केलेले लिखाण म्हणजे काव्याचा अपमान आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी केली. व्यापक, वैश्विक दृष्टीकोन प्राप्त होण्यासाठी थोर कवींच्या कविता अभ्यासाव्यात अशा सल्लाही त्यांनी कवींना दिला.
आडकर फौंडेशन आणि संस्कृती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखक, कवी प्रा. विश्वास वसेकर लिखित ‘मूल्यत्रयीची कविता’ या कविता संग्रहाचे प्रकाशन आज (दि. 10) डॉ. रसाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोलत होते.
पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. प्रमुख वक्ते ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव यांच्यासह आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार व्यासपीठावर होते.
सामाजिक विषयांवरील कविता लिहिताना सामाजिक भान ठेवणे आजचे कवी विसरले आहेत, असे स्पष्ट करून डॉ. रसाळ म्हणाले, सामाजिक विषयावर लिखाण करणे हे विचारवंतांचे काम आहे, कवींचे नाही. ते पुढे म्हणाले, समग्र मानवी जीवनापलिकडील जीवन कवीला जाणवावे लागते तरच तो थोर कवी होऊ शकतो. कवितेला लय असते, ती बोलायची-ऐकायची असते, पण सामान्य दर्जाची दुर्दैवी कविता आजकाल लिहिली जात आहे. मुक्तछंद काव्यात कवितेची ओळ हा सजीव घटक आहे. ज्या ओळीने कवितेचा शेवट होतो त्या ओळीतून अर्थ उलगडत जाणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
डॉ. रसाळ यांनी परखडपणे मांडलेल्या भूमिकेचा संदर्भ घेऊन डॉ. सदानंद मोरे म्हणाले, कवीचे कान समीक्षकानेच टोचायचे असतात. कवीने समीक्षकांच्या विचारांचा आदर करणे अपेक्षित आहे. कवीता हा गंभीर, जबाबदारीचा, जोखमीचा, अवघड असा वाङ्मय प्रकार आहे. परंतु कविता सोपी आहे, असे अनेकांना वाटते. मनुष्य हा अत्यंत बेभरवशाचा प्राणी आहे तर कवी हा मनुष्य नावाचे कोडे सोडवायला बसलेला आणि त्या कोड्यात अडकलेला प्राणी आहे. ते पुढे म्हणाले, मानवी जीवनातील मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात कशी उतरतील आणि जेथे ती नाहीत तेथे टीका करणे अशा स्वरूपाची वसेकर यांच्या कवितांची मांडणी आहे. या कवितासंग्रहाची दखल मराठीतील समीक्षक नक्कीच घेतील.
वसेकर यांच्या काव्यातील वैशिष्ट्ये उलगडून डॉ. मनोहर जाधव म्हणाले, वसेकर यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी माणूस आहे, या कविता माणसांसाठीच्या आहेत. कवीच्या लिखाणातून कवीचे भवतालाकडे पाहणे जाणवते तसेच लक्षवेधी घटनांचे निरीक्षण केले असल्याचेही दिसून येते. जीवनातील कोणताही विषय कवीसाठी अस्पर्श नसतो, असेही त्यांनी सूचित केले.
‘मूल्यत्रयीची कविता’ या कविता संग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, विश्वास वसेकर, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. सदानंद मोरे, डॉ. मनोहर जाधव आणि सुनिताराजे पवार.
मराठी काव्यप्रांतात डॉ. रसाळ यांचे कार्य मोलाचे आहे त्यांचा परिसस्पर्श माझ्या लिखाणाला व्हावा, अशी अपेक्षा विश्वास वसेकर यांनी व्यक्त केली.
सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. आभार ॲड. प्रमोद आडकर यांनी मानले. स्वागत पवार आणि ॲड. आडकर यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
जाहिरात
जाहिरात