गोल्डन आय न्युज नेटवर्क
पुणे – फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे राष्ट्रपिता ज्योतिराव गोंविंदराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पहिल्या सिम्बॉल ऑफ नॉलेज पुरस्काराने ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांना आज (दि. 11) गौरविण्यात आले.
ज्यांच्या जाणिवा जागृत असतात ते कवी होतात, जे विचार करतात ते विचारवंत होतात. ज्यांच्या जाणिवा जागृत असतात आणि जे विचारही करतात ते तत्त्वज्ञानी होतात. मात्र जे विचारही करीत नाहीत आणि ज्यांच्या जाणिवाही जागृत नाहीत ते म्हणजे राजकारणी असतात, असे स्पष्ट मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.
सध्याच्या राजकारण्यांविषयी समाजाचे हेच मत असून काही राजकारणी याला अपवाद आहेत. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधी विचारवंत, जाणिवांनी जागृत आणि तत्त्वज्ञानी होते नंतर राजकारणी होते असेही ते म्हणाले.
फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे राष्ट्रपिता ज्योतिराव गोंविंदराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पहिल्या सिम्बॉल ऑफ नॉलेज पुरस्काराने ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. सुधाकर आव्हाड यांना आज (दि. 11) गौरविण्यात आले.
सिम्बॉल ऑफ नॉलेज पुरस्कार पुरस्कार वितरणप्रसंगी (डावीकडून) ॲड. केतन कोठावळे, ॲड. प्रमोद आडकर, डॉ. ॲड. सुधाकर आव्हाड, डॉ. न. म. जोशी, प्रेरणा गायकवाड, विठ्ठल गायकवाड.
पुरस्कार वितरण डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. जोशी बोलत होते. पत्रकार संघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, संविधान प्रत आणि पंचशील शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर होते. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. केतन कोठावळे, संयोजक विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेविका लता राजगुरू, पुणे शहर एनएसयूआयच्या सरचिटणीस प्रेरणा गायकवाड व्यासपीठावर होते.
पुरस्काराचे नाव उत्तम असल्याचे सांगून डॉ. जोशी म्हणाले, ज्ञान कधीही लुप्त होत नाही. ॲड. आव्हाड यांचा सन्मान करून त्यांच्यातील ज्ञानाला केलेले पर्यायाने बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या ज्ञानव्रतींना केलेले हे वंदन आहे. ते पुढे म्हणाले, बाबासाहेब द्रष्टे विद्रोही होते तर महात्मा फुले विद्येचे उपासक होते.
आजच्या काळातील समाजाला या दोन्ही महामानवांच्या कार्याची ओळख होणे अपेक्षित आहे. राजकारण्यांमधील जाणिवा जागृत करण्यासाठी त्यांचे प्रबोधनवर्ग घेतले जावेत, तसा कायदा व्हावा, आजचे राजकारणी फुले-आंबेडकर यांचे ज्ञानव्रत चालविणारे असावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना ॲड. सुधाकर आव्हाड म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हे केवळ महामानव नव्हे तर आधुनिक काळातील राष्ट्रसंत होते. आधुनिक भारतात जेव्हा समाजसुधारणा होणे आवश्यक होते तेव्हा शाहु-फुले-आंबेडकर यांनी शिक्षणाचा समान धागा पकडून समाजसुधारणा केली. माझ्यातील शिक्षकाची भूमिका पाहून हा पुरस्कार मला दिला असावा, असे वाटते.
नूतन भारतातील समाजसुधारणेचा ग्रंथ म्हणजे देशाची राज्यघटना आहे त्यामुळे त्याला ‘होली बुक ऑफ इंडिया’ असेही संबोधले जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
ॲड. केतन कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आणि पुरस्कार वितरणामागील भूमिका ॲड. प्रमोद आडकर यांनी विशद केली. स्वागत विठ्ठल गायकवाड यांनी केले. आभार लता राजगुरू यांनी मानले.
————————————————-
जाहिरात – Click on Image
जाहिरात – Click on Image