गोल्डन आय न्यूज नेटवर्क
🌺🌻🌺🌻🌺🌻
गीत, संगीत, काव्य, नाट्य अशा साहित्य जगतावर, तत्कालीन समाजमनाचे पडसाद उमटणे हे कालातीत वास्तव आहे. सुमारे तीस वर्षापूर्वीची नाट्यनिर्मिती असलेले *आई रिटायर होतेय* ! हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात पहाताना, खूप काही आठवले, तेच शब्दातून मांडण्याचा हा प्रयत्न !
सुसंस्कृत मध्यमवर्गीय घरात घडणारे,गृहिणीच्या मध्यवर्ती भूमिकेवर केंद्रित असलेले हे कथानक !
दोन पिढ्यांमधील विसंवादातून अपरिहार्यता दर्शवणारे, संघर्षाची सौम्यता सांभाळून, अपरिहार्यतेतील कटूता सांगणारे, रूळ बदलताना होणा-या प्रवासातील खडखडाट जाणवणारे ,असे हे नाट्य, प्रेक्षकांना खिळवून ठेवते, तेच या नाटकाचे वैशिष्ट्य आहे.
अशोक पाटोळे यांचे सहज सुंदर संवाद असलेल्या या नव्या संचातील नाटकाची निर्मिती, “कलाकार पुणे” यांची असून 300 व्या प्रयोगाकडे आता वाटचाल आहे.
नाटकातील पात्रे ही प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटतात. कुठेही अभिनिवेश, आक्रस्ताळेपणा नाही, विसंवादातील सहजता सुद्धा स्वाभाविक वाटते. आईची निवृत्ती, अलिप्तता सुद्धा, कुटुंबाच्या भल्यासाठीच असल्याचा विश्वास, हे नाटक अधोरेखित करते.
नाटकातील सर्व पात्रे ही सहजसुंदर सादर होतात,रंगभूषा, वेशभूषेचे स्थान अत्यल्प आहे. आईच्या मध्यवर्ती भूमिकेतील *वीणा फडके* यांनी सर्व नाट्य भारून टाकले आहे. वडीलांच्या भूमिकेतील उपेंद्र दाते हे सुद्धा अनुभवी रंगकर्मी आहेत.
नाटकातील तत्कालीन परिस्थिती, आता नव्या युगाकडे वाटचाल करत असली तरीही कालबाह्य मुळीच वाटत नाही.
प्रेक्षागृहातील ज्येष्ठ आणि युवावर्गाची उपस्थिती, ही सकारात्मकतेचे द्योतक वाटली.
भक्ती बर्वे यांचा प्रथम प्रयोगा पासून प्रभाव असलेले हे नाटक, काही प्रयोग स्मीता जयकर यांनी सुद्धा केले.
नव्या संचामधे सहकलाकारांना सामावून घेत, वीणाताईंनी तीनशेहून अधिक प्रयोग केल्याची माहिती मिळाली.
कुटुंबातील प्रत्येकाला, त्याचे स्थान (space) अबाधित हवे असते, ती त्याची कालातीत गरज विचारात घेता , कालबाह्यतेच्या कसोटीवर , नाट्यसंहिता टिकून राहिल , असाच विश्वास, सर्व कलाकारांनी व्यक्त केला.
रसीकांच्या वतीने अनौपचारिक शुभेच्छा व्यक्त करताना, मी सुद्धा या कुटुंबाचाच घटक झाल्याचा प्रत्यय अनुभवला. आपलेपणाने तुम्ही सुद्धा ही अनुभूती घ्यावी असे मनापासून वाटते !
🌺🌻🌺🌻🌺🌻
आनंद सराफ
नमस्कार मी विणा फडके आई रिटायर होतेय या सामाजिक आशय आसलेल्या नाटकात मध्यवर्ती भुमिकेत काम करते.
मी आमच्या नाटकातील सर्व कलाकारांचे वतीने निवेदन करते की श्री वृंदावन शैक्षणिक व सामाजिक संस्थे मार्फत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी प्री स्कुल आणि दिव्यांग सेंटर चालविले जाते.
या संस्थेच्या मदतनिधी साठी शनिवार दि. १५ एप्रिल सायंकाळी ५ वा. बालगंधर्व रंगमंदिर येथे आई रिटायर होतेय या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त रसिकांनी तिकीटे विकत घेऊन शाळेला जास्तीत जास्त मदत करावी ही नम्र विनंती.
————————————————
जाहिरात –