गोल्डन आय न्युज नेटवर्क
तालयोगी आश्रमाचा तपपूर्ती सोहळा आणि पंडित सुरेश तळवलकर यांना अमृत महोत्सवानिमित्त शंकराचार्यांकडून शुभाशीर्वाद
पुणे : कला उपजत असते तशीच ती प्राप्तही करता येते, परंतु उपजत कला असलेला कलाकारच पूर्णत्वास पोहोचतो. हे पूर्णत्व पंडित सुरेश तळवलकर यांनी गाठले आहे. कलाप्रांतात हातचे काहीही न ठेवता कलाकार घडवून पंडितजींनी गुरुऋण जसे फेडले आहे त्याच प्रमाणे मुलांनाही विद्या प्रदान करून पितृऋणही फेडले आहे त्यामुळे ते ऋणमुक्त झाले आहेत, अशा भावना श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी व्यक्त केल्या.
पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या तालयोगी आश्रमाची तपपूर्ती आणि तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 4) बालगंधर्व रंगमंदिरात सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्या प्रसंगी अमृत महोत्सवानिमित्त पंडित सुरेश तळवलकर यांना श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांनी शुभाशीर्वाद दिले. त्या प्रसंगी ते बोलत होते. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, विदुषी पद्माताई तळवलकर मंचावर होते.
पंडितजींनी गुरू-शिष्याच्या रूपाने शिष्यच नव्हे तर गुरू निर्माण केले आहेत असे कौतुकाने सांगून श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती म्हणाले, आनंद वाटला तर तो कमी-जास्त होत नाही, परंतु कला प्रदान केली तर पूर्णत्व प्राप्त होते.
पंडितजींनी शिष्यांना एका तालाच्या रूपात आणले आहे, ही एक प्रकारची साधनाच आहे. तालयोगी आश्रमरूपी लावलेले झाड पंडितजींनी खतपाणी घालून उत्तम रित्या वाढविले आहे.
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, हा सोहळा अमृतयोग आहे. यात शंकराचार्यांची उपस्थिती म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. शास्त्र आणि विद्या हे बुद्धिनिष्ठ असते. तंत्र ही शरीर साधना असते. भारताने जगाला ज्या श्रेष्ठ देणग्या दिल्या त्यातील एक म्हणजे अध्यात्मशास्त्र आणि दुसरे म्हणजे अभिजात संगीत शास्त्र. शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला ही चार प्रधानतत्त्वे पंडितजी मानतात आणि हे शतश: खरे आहे. शास्त्र आणि विद्या बुद्धिनिष्ठ आहे तर तंत्र हे शरीर साधना असल्याचे ते म्हणाले.
व्यासपीठावर पंडित सुरेश तळवलकर यांच्या गुरूजनांची छायाचित्रे लावण्यात आली होती त्याचा उल्लेख करून अभ्यंकर म्हणाले, यात पंडितजींच्या आई-वडिलांची छायाचित्रे लावली असती तर श्रद्धाअष्टक पूर्ण झाले असते.
संगीत ही अध्यात्माच्या जवळ जाणारी विद्या आहे, अशी धारणा असल्याचे सांगून पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, वयाला 75 वर्षे कशी झाले हे कळलेही नाही. आई-वडिल आणि गुरुजन यांनी मला अखंडित प्रेरणा दिली आहे. गुरूंकडून मिळालेली प्रेरणा कधीही विसरू शकत नाही. तालयोगी आश्रमाला 12 वर्षे पूर्ण झाल्यामुळे माझी बारा वर्षांची साधना झाली आहे. गुरूंप्रती मी सदैव ऋणी आहे. शिष्यांनी केलेल्या प्रगतीमुळे त्या ऋणातून मुक्त झाल्याचे समाधानही आहे. डॉ. श्रीनिवास राव आणि मुक्ती राव यांनी आश्रमासाठी वास्तू उपलब्ध करून दिल्यामुळे आश्रम उभा राहू शकल्याचे त्यांनी गौरवाने सांगितले.
तालयोगी आश्रमाला एक तप पूर्ण झाले. याप्रसंगी आयुष्यभर ही वास्तू तालयोगी आश्रमाचीच असेल असे डॉ. श्रीनिवास राव यांनी सांगितले. कागदोपत्री ही वास्तू आमच्या नावे असली तरी विद्यार्थ्यांसाठी हे मंदिर तर त्यांच्या पालकांसाठी हे आशेचे प्रतिक आहे. गुरू-शिष्य परंपरेतून शिष्य घडत गेले तर हजारो वर्षे भारतीय संगीत टिकून राहिल, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन झाले. त्यांना तन्मय देवचके यांनी संवादिनी साथ केली.
तीनतालाने वादनाची सुरुवात करून अनेक कायदे आणि रेले सफाईदारपणे सादर केले. सत्कार सोहळ्यानंतर पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय झाले. त्यांना तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी तबला तर मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनी साथ केली.
तालयोगी आश्रमाची तपपूर्ती आणि तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. 4) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात पंडित सुरेश तळवलकर यांना शुभाशीर्वाद देताना श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती. समवेत विदुषी पद्माताई तळवलकर आणि विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर.
पंडित कशाळकर यांना पंडित तळवलकर गेल्या 45 वर्षांहून अधिक काळापासून तबलासाथ करीत आहेत.
सुरुवातीस सोनिया परचुरे, मुक्ती राव, सायली तळवलकर, सावनी तळवलकर, आयुषी माजगावर यांनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. परमपूज्य विष्णू महाराज पारनेकर यांचे नातू भाग्येश पारनेकर यांनी पूर्णवाद परिवारातर्फे मान्यवरांचा सन्मान केला. तालयोगी आश्रमाच्या वेबसाईटचे उद्घाटन श्री स्वामी सद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते झाले. विजय व्हटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला नाविन्यपूर्ण तबला पंडित तळवलकर यांना भेट दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी स्वकुळ यांनी केले.
सोहळ्यास संगीत क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते.
तालयोगी आश्रमाला अनेकांनी या प्रसंगी देणगी जाहीर केली.