गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील प्रयोगशील युवा व्यावसायिक मोहनीश जाजू यांनी ब्य्रू अँड बझ ग्लोबलतर्फे येत्या बुधवारी ‘बहार’ या अनोख्या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे.
या मैफलीद्वारे रसिकांना वसंत ऋतुच्या विविध छटा ठुमरी-दादरा, छोटा ख्याल आणि चित्रपट गीतांच्या माध्यमातून अनुभवायला मिळणार आहे.
जाजू हे युवा व्यावसायिक असून उत्तम तबलावादक आहेत. अध्यात्माचे अधिष्ठान असलेले अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकणारा उत्तम श्रोतृवर्ग निर्माण व्हावा, कलाकाराची कला रसिक श्रोत्यांनी आपल्या तनामनात उतरवून त्यात संपूर्ण तल्लीन होऊन एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी यासाठी ‘बहार’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मैफल बुधवार, दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता कॅफे हाऊस रीका, पौड रोड येथे आयोजित केली आहे.
सांगीतिक पार्श्वभूमी असलेले डॉ. कौस्तुभ गांगुली यांचे या मैफलीत गायन होणार असून ते पंडित अजय चक्रवर्ती यांचे शिष्य यांचे आहेत. डॉ. गांगुली हे संगीत शास्त्राचे अभ्यासक आहेत. पटियाला घराण्याची तालिम घेतलेले डॉ. गांगुले हे शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन प्रभावीपणे सादर करतात. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) आणि पांडुरंग पवार (तबला) साथ करणार आहेत.
पुणेकर रसिकांसाठी ‘बहार’ ही मैफल आनंद पर्वणी ठरणार असून मैफल सर्वांसाठी खुली आहे.
जाहिरात – Click on Image for more details