गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित सी. आर. व्यास जन्मशताब्दीनिमित्त विशेष संगीत सभा !!
‘तज रे अभिमान, जान गुणीयन सों, गुन की सेवा ना मानो अब मान’ !!
पुणे : गुरुकृपेने पावन झालेला शिष्य, त्याच्या भावपूर्ण शब्दांतून प्रकट झालेल्या बंदिशी, त्यांचे अर्थपूर्ण गायन याचा आकृतीबंध दर्शविणाऱ्या विशेष संगीत सभेतून पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेल्या बंदिशींचे सादरीकरण हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने अर्पण केलेली आदरांजली ठरली. निमित्त होते आकाशवाणी, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित गायन मैफलीचे.
मैफलीची सुरुवात पंडित शौनक अभिषेकी यांनी नटभैरव रागातील विलंबितमध्ये ‘गूँज रही कीरत तुम्हरी, चहूँ ओर संगीत जगत मे’ आणि मध्य लय एकतालातील ‘सूरज चंदा जबतक फिरे’ या बंदिशी सादर करून पंडित सी. आर. व्यास यांची गुरुप्रती असलेली निष्ठा, समर्पणभाव, अद्वैत, तादाम्यता दर्शविली. त्यानंतर देसी रागातील ‘आई रे आई तोहे मिलनको’, ‘शबरी भई थी राम औतार’ आणि ‘सुनरी एरी आज… शुभ दिन शुभ सगुन’ या पूरिया रागातील बंदिशी तसेच बागेश्री रागात बांधलेल्या ‘ना डारो रंग मोपे, तंग बसन अंग अंग प्रगट होत’ आणि ‘कैसी नाही तोहे लाज आवे’ या बंदिशीतून पंडित सी. आर. व्यास यांच्या शब्दसामर्थ्याचे दर्शन घडविले.
पंडित सी. आर. व्यास यांनी रचलेली ‘तोहे रे गाऊँ मै आज, गुनिदास बलम मोरे’ आणि ‘चतराई कीन्हीं मोंसे, सपना मोहे दरस देके’ या स्वानंदी रागातील बंदिशीतून गुरुभक्तीचे उत्कट दर्शन घडविले. गुरुभेटीच्या आतुरतेतून निर्माण झालेली कैशिकरंजनी रागातील ‘ए मितवा कित जाय रहे भीरीमें हाथनमें लेत फूलनके हरवा’, ‘दिन मंगल आज आये गुन सागर घर आये’ या बंदिशी पंडित अभिषेकी यांनी अतिशय भावपूर्णतेने सादर केली.
उत्तरार्धात पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले. त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या बंदिश रचनेमागील भावपूर्ण आठवणी सांगितल्या. पंडित सी. आर. व्यास आणि पंडित जिंतेंद्र अभिषेकी यांच्यातील भावाबंधही उलगडले. सादरीकरणाची सुरुवात धनकोनी कल्याण रागातील ‘सरस सूर गाऊँ मन रिझाऊँ’, ‘बीते जीवन कछु काम ना आवे’ ही बंदिशी विलंबित लयीत तर दृतमध्ये ‘देख चंदा नभ निकस आयों’ने केली. शिव अभोगीमधील ‘सौ सौ बार गाऊँ तोहे’, ‘नित रहे मगन तोमें, मन चाहत गुन गाऊँ’, ‘तूही ग्यान तूही ध्यान चरआचरमें तूही’ या बंदिशी सादर केल्या.
‘बलम जा जा जारे काहे मनावन आया’, ‘जबहि घर आवे बतिया बनावे’ ही एका विरहिणीची लाडीक तक्रार सुधरंजनी रागात रचलेल्या बंदिशीच्या सादरीकरणातून दर्शविली. त्यानंतर ललत रागात ‘सुरनमें रस तुम हो, तालनमें लय गुनिदास’ ही भावपूर्ण बंदिश सादर केली. आत्मोपदेश स्वरूपात रचलेली गुजरीतोडी रागातील ‘बीत गयो सब जीवन तेरो, करत बखान अपनो ही अपनी’, ‘जानगुनी समझ न तोहे, भरम जाल कर दूर’ या बंदिशीनंतर दुगम हिंडोल रागातील ‘कैसे रिझाऊँ मन उन्हींके जब पिया मोरी बात न माने’, ‘मीठी बतियाँ करत नित मोंसे’ ही लाडीक तक्रार करणाऱ्या प्रियेची भावावस्था दर्शविणारी बंदिश सादर केली.
जीवनाचे मर्म सांगणारी राग बिलासखानी तोडीमधील अतिशय सुमधुर बंदिश ‘तज रे अभिमान, जान गुणीयन सों, गुन की सेवा ना मानो अब मान’ आणि ‘कौन जाने, कब मिटे जाय साँस तन की..’ ही बंदिश रसिकांना विशेष भावली.
कलाकारांना सुभाष कामत (तबला), प्रमोद मराठे (संवादिनी), अभेद अभिषेकी, राज शहा, केदार केळकर, निरज गोडसे (तानपुरा) यांनी साथ केली.
बंदिश ही चिरकाल टिकणारी गोष्ट असून युवा पिढीतील कलाकारांनी बंदिश गाताना त्यातील मर्म, गुढार्थ समजून-उमजून सादर करावी. बंदिशीच्या शब्दांमागील विचार, ती रचताना सर्व बाजूंनी केलेला अभ्यास त्यासाठी आवश्यक अशी आध्यात्मिक बैठक आणि गुरुकृपा यातूनच हृदयाला भिडणारी कलाकृती निर्माण होते, असे पंडित सुहास व्यास यांनी आवर्जून सांगितले.
आपले वडील पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी. आर. व्यास यांचे नाते शब्दांपलिकडचे होते असे सांगून पंडित शौनक अभिषेकी यांनी या दोन महान कलाकरांच्या भावनिक नात्याची वीण उलगडून दाखविली. युवा पिढीने अभ्यासपूर्ण नजरेने या बंदिशींकडे पाहावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे समर्पक, अभ्यासपूर्ण निवेदन मंगेश वाघमारे यांनी केले. आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी इंद्रजित बादल उपस्थित होते.
__________________________________________
जाहिरात