गिरीश बापट या मित्राच्या आठवणी….
“ए सुचित्रा … कुठे चाललीस एवढ्या सकाळी?”
मुंबई पुणे महामार्गावर फुडस्टाॅल वरील सकाळचे आठ वाजलेले…
श्री दत्त उपहारगृहच्या गर्दीत असं खणखणीत आवाजात कोण विचारत आहे म्हणून माझी पत्नी सुचित्राने आश्चर्याने मागे वळून पाहिले तर मा.पालकमंत्री गिरीशभाऊ बापट आपल्या सहकाऱ्यांसह उभे होते. सुचित्राच्या मानेवरील नसलेली काॅलर ताठ झाली.
इतक्या आदराने आणि हक्काने हाक मारणारे आणि ओळख देणारे श्री. गिरीश बापट हेच होत.
गिरीश बापट… एक सर्वसामान्य महाराष्ट्रीयन ब्राम्हण घराण्यातील मुलगा. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेतील १९६८ च्या बॅचचे विद्यार्थी !
गिरीश, रवी देशपांडे, अरविंद उर्फ नंदू भागवत, जयंत देसाई आणि मी असे काही शालेय मित्र काही ना काही कारणांनी पन्नास पंच्चावन्न वर्षांची मैत्री सांभाळत होतो. यात पुढे शेखर महाजन, प्रमोद देशपांडे, दीपक कुन्नूर, राजा जोशी वगैरे मित्र जमा होत रोज संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिरातील कॅफे टेरियाच्या कट्ट्यावर भेटत असू. तो काळ होता १९७५ ते १९८०च्या दरम्यानचा, सगळ्यांचीच लग्न व्हायची होती….
गिरीश बऱ्याच वेळा टेल्कोच्या बसमधून उतरुन डायरेक्ट यायचा. सर्वांच्या लग्नानंतर भिशी…एखादी ट्रीप असे उपक्रम चालू असायचे वगैरे. गिरिजा वहिनी आणि सुचित्राची मैत्री छान चालू आहे तर गौरव माझी मुलगी केतकी बरोबरचा. काॅलेजला पण गौरव गिरीशच्या बी.एम.सी.सी. मध्ये! थोडक्यात काही ना काही कारणाने राजकारणा पलिकडची आमची मैत्री ….
गिरीशचे ‘भाऊ’ झाल्यावरही त्याच नात्याने सुरु होती.
एक शालेय मित्र…त्याची मैत्री तो स्वत: नगरसेवक, आमदार, खासदार झाल्यानंतरही सांभाळत होता हे आमचे जीवनाचे भांडवल होते.
पालकमंत्री असताना माझ्या घरी यायचे कबूल केले होते. कामाच्या व्यापात जमत नव्हते, एक दोनदा ठरलेले कार्यक्रम पुढे ढकलले, मी ही विसरून गेलो होतो तोच अचानक फोन आला.. उद्या येतो. खरोखरच गिरीश आणि गिरिजा वहिनी घरी येऊन आम्हा सर्व मित्रांना त्याने तीन तास दिले होते. त्या दिवशी आम्ही कृष्ण सुदामा भेट समजलो.
कुठेही मंत्रीपदाचा गर्व नाही… मोठे पणा नाही. अनौपचारिक चेष्टामस्करीकरीत, फिरक्या घेत तीन तास कधी गेले हे कळलेही नाही. घराखाली त्यांची गाडी, पोलीस पाहून लोकांत चर्चा सुरु झाली की बापट साहेब आले आहेत आणि इतका वेळ कसे थांबले आहेत?
आपण मैत्रीचा ‘धागा’ आहे म्हणतो पण तो ‘दोरखंडा’ पेक्षा मजबूत असतो हे कधीकधी जाणवतो. निरपेक्ष मैत्रीतला प्रामाणिकपणा ‘हि-या’ सारखा मौल्यवान असतो हे प्रिय गिरीश यांनी आम्हांस दाखवून दिले.
आणीबाणीत गिरीशने बाजीराव रस्त्यावरील मेहुणपूरा काॅर्नरवर सत्याग्रह केला होता. मग गिरीशला नासिक रोडवरील जेल मध्ये ठेवले होते. १९७७ला गिरीश जेल मधून आल्यावर त्याच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली.
रवी देशपांडे तर गिरीशची सावलीच! आम्ही आपापल्या नोकरी व्यवसायात असल्याने आमचे काही राजकीय काम नसले तरी आम्ही मधून मधून भेटत असू. टेल्को मधून घरी आले की गिरीश महानगरपालिकेत जावयाचे. कोणाची काही कामे असली की त्यांना मार्गदर्शन करीत.
१९८३च्या सुमारास त्यांनी पोट निवडणुकीत ॲडव्होकेट शांताराम जावडेकर यांचा पराभव करून महानगरपालिकेत “नगरसेवक” म्हणून पाऊल ठेवले. …. आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि आता खासदार!
खासदार झाल्यानंतर आम्ही मित्र मंडळीसह मनापासून मोकळ्या वातावरणात भेटायला महाशिवरात्रीला ॐकारेश्वर मंदिरात जात असू. आमचा रवी देशपांडे ही भेट घडवायचा. त्यावेळी मी सहज म्हंटले की, ” गिरीश, तूझ्या नेतृत्वाखाली सर्व पुण्यातील सर्व आमदार भाजपने तर जिंकलेच पण तुझ्या राजकीय कारकिर्दीतला शिरपेच हा पुणे महानगरपालिकेसह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आणने हा होय”. एकदम बरोबर म्हणत त्यांनी हात मिळविला होता.
१९८७च्या सुमारास आमचे चिरंजीव व कन्या प्री प्रायमरी … नवीन मराठीत होते. त्यावेळी त्यांच्या वयाच्या मुलांना गोळा करून आम्ही फर्ग्युसन काॅलेजवर पु.ल.देशपांडे यांच्या देणगीतून उभ्या राहिलेल्या किमया या खुल्या रंगमंदिरात “गंमत-जमंत मेळावा भरवित असू. सहा ते दहा वयोगटातील सुमारे २०० मुलांचे हे स्नेहसंमेलन असे.
एकदा गिरीशभाऊ उद्घाटनाला आले आणि वर्षभर हा उपक्रम राबविण्यासाठी घोले रोड वरील म. फुले म्युझियमचे ग्राऊंड उपलब्ध करून दिले. तेथे सुचित्राने गंमत जंमत बालभवन सुरू केले होते. त्यावेळी फनफेअर,
बाहुला-बाहुलीचे लग्न असे अनेक कार्यक्रम केले होते. त्यावेळी फक्त बालभवन च्या मुलांसाठी दोन तास कोथरूड गार्डन, पेशवे पार्क मिळवून दिले होते.
कुठलीही अपेक्षा न करता ते सर्वांची कामे करीत. व्यापारी असोसिएशनचा मी अध्यक्ष असताना तुळशीबागेत मिटींगला येत तर बाबरी आंदोलनातील कार सेवकांचा सत्कार करताना घरी येत होते. बिल्डर व भाडेकरूंचे वाद असो, गिरीश नेहमी सामंजस्याची भुमिका घेत असत. त्यांचा प्रामाणिक चेहरा व स्पष्ट वक्तेपणा सर्वत्र एकच होता आणि हाच त्यांच्या लोकप्रियतेचा कणा होता.
प्रत्येक निवडणूक नंतर गिरीशतर्फे श्रुती मंगल कार्यालयात जेवण असे. निवडणूकीत पक्षविरहीत जे मित्र म्हणून मदत करीत अशा सुमारे २५० – ३०० जण तेथे असत. यावेळी प्रत्येकाची ओळख गिरीश नाव, व्यवसाय, कुठली ओळख हे स्वतः सांगत असत. त्यांची स्मरणशक्ती अफाट होती.
शेवटच्या आजारपणात चिरंजीव गौरव व स्वरदा यांनी गिरीशला गोड नातीची भेट देत आजोबा केले ही एक आनंदाची बाब होय.
कै. गिरीश यांच्या जाण्याने आम्ही जवळचा मित्र तर गमवलाच पण पुणेकरांच्या भूमिकेतून एक स्वकर्तृत्वातून विकसित झालेले लोकमान्य नेतृत्व आज लोप पावले हे खरे. हे न विसरता येणारे दु:ख गिरिजावहिनी,गौरव, स्वरदा यांना सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावे आणि प्रिय गिरीशच्या आत्म्यास सद् गती देवो हीच परमेश्वरास प्रार्थना !
भगवद् गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनास मार्गदर्शन करतानाच सामान्य जनतेस उपदेश करतात –
जातस्य हि ध्रुवो मृत्यूध्रुवं जन्म मृतस्य च
तस्माद परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि
जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो मृत्यू पावला आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे. आपल्या हाती नसलेल्या गोष्टींवर तू शोक करु नको.
दिलीप कुंभोजकर
▪︎▪︎▪︎
जाहिरात – Pl click on Image