गोल्डन आय न्युज नेटवर्क
पुणे : त्या आल्या, त्या गायल्या आणि तरुणाई थिरकली.. वितस्था महोत्सवात. महोत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात हिंदी, मराठी, काश्मिरी-डोगरी गाणी सादर करून प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांनी पुणेकरांवर सुरांची मोहिनी घातली.
आझादी का अमृत महोत्सवांतर्गत केंद्र सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित वितस्था (काश्मीर) महोत्सव एमआयटी पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड परिसरात सुरू आहे.
उषा उत्थुप यांनी ‘जाने जा’, ‘दम मारो दम’, ‘नाटू नाटू’ या गाण्यांबरोबरच ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकिन है’ असे सांगत तरुणाईला आपलेसे केले. डॉन म्हणजे आपला भारत देश आहे असे सांगून रसिकांची मने जिंकली. दुनिया मे लोगों को, मोनिका, आ देखे जरा, जिते है शानसे, रंभा हो, हरी ओम हरी या प्रसिद्ध गाण्यांसह काश्मिरी, डोगरी गीते सादर करत पूर्ण मैफलीचा माहोल बदलून टाकला.
पुणेकरांच्या आग्रहास्तव ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या मराठी गाण्याने दादा कोंडकेच्या आठवणी जागविल्या. नाटू नाटू गाण्याने युवा पिढीने स्टेजवर एकच दंगा केला. ‘डार्लिंग’ गाण्याने मैफलीचा समारोप केला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुण्यातील ‘आकार’ संस्थेच्या बालचमूने सादर केलेल्या राष्ट्रभक्तीपर हिंदी गीतांनी झाला. नवयुग की नवगती नवलय हम, तुम समय की रेत पर (संगीत दिग्दर्शन चित्रा देशपांडे), हम करे राष्ट्र आराधन, सुनो गौरसे दुनियावालो, कंधोंसे मिलते है कंधे, माँ तुझे सलाम या गीतांचा समावेश होता. यासह काश्मिरच्या पारंपरिक लोकगीतांचे सूर ‘वितस्था’ आसमंतात निनादले.
वितस्था नदीच्या प्रवाहाचा स्त्रोत आपली संस्कृती, परंपरा घेऊन या महोत्सवानिमित्तानं महाराष्ट्रात दाखल झाली आहे. विविध प्रकारचे लोकसंगीत, लोकनृत्य, लोकनाट्य या कलाप्रकारांसह चित्रकलेचा देखील यात समावेश आहे. वाद्य वादनात संतूर, रबाब, सारंगी, तुंबक नारी, सुरनाई (शहनाई), वसूला (ढोल), तबला, नोट (मटका) या पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण काश्मिरी कलाकारांनी केले.
संस्कृती प्रवाह !
‘वितस्था’ नदीचा प्रवाह केवळ भौगोलिकच नव्हे तर मानवी जीवनाशी निगडित कित्येक प्रकारातून प्रवाहित होतो. तेच प्रतिबिंब कागद, कापड, काष्ठ आदींच्या माध्यमातून उमटविण्याचा प्रयत्न चित्रकला दालनात केला आहे. आठ काश्मिरी कलाकारांसह पुण्यातील चार कलाकारांच्या चित्रकृतींचा यात समावेश आहे.
महोत्सवात रविवारी (दि. 2 एप्रिल 2023)
1) काश्मिरी लोकनृत्य
2) काश्मिरी कलाकारांचा वाद्यवृंद, पारंपरिक वाद्ये
3) काश्मिरी लोकनाट्य
4) महाराष्ट्रातील गोदावरी आणि काश्मीरमधील वितस्था या नद्यामधील संबंध दर्शविणारे कथक नृत्य. सहभाग – सुप्रसिद्ध कथक नृत्यगुरू शमा भाटे आणि सहकारी
5) आभा हंजुरा आणि सुफी वाद्यवृंदाचे सादरीकरण
जाहिरात
जाहिरात