रिपोर्टर – प्रसन्न पाध्ये
जगप्रसिद्ध सतार वादक उस्ताद उस्मान खान यांच्या वादनाने रसिक रंगले नादब्रह्मात
पुणे : जगप्रसिद्ध सतार वादक उस्ताद उस्मान खान यांच्या वादनातील सुरावटीत तल्लीन होत रसिक नादब्रह्मात रंगले.
निमित्त होते पुण्यात आयोजित केलेल्या पहिल्या समर फेस्टिव्हलचे. मरुमा फाउंडेशनतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ऋतू उत्सवाअंतर्गत 2023 मधील पहिल्या समर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रसिकांनी उस्ताद उस्मान खान यांच्या सतार वादनाचा अविस्मरणीय आनंद घेत वादनाला उत्स्फूर्त दाद दिली.
उस्ताद उस्मान खान यांचे जावई डॉ. महेश देशमुख, कन्या रुकिया खान-देशमुख आणि मध्यमी देशमुख यांनी 2013 मध्ये मरुमा फाउंडेशनची स्थापना केली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून संगीत, कला, हस्तकला आणि संस्कृतीची ओळख होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीसहून अधिक वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात मुख्यत्वेकरून सतार वादनात उस्ताद उस्मान खान यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांच्या वादनात भावना, मोहकता तसेच कठीण रचना सहजतेने मांडण्याची खुबी आढळते. उस्तादजींचे वादन नवोदित तसेच अभ्यासकांना मार्गदर्शक असते. रसिकांशी सांगीतिक नाते जोडण्याची कला उस्ताद उस्मान खान यांना अवगत आहे. उस्तादजींनी देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक महोत्सवांमध्ये सतार वादन केले आहे. धारवाडचे सताररत्न उस्ताद रहमत खान यांचे उस्मान खान हे नातू आहेत. त्यांनी सतार वादनाची दीक्षा त्यांचे वडिल उस्ताद अब्दुल करीम खान यांच्याकडून घेतली आहे.
समर फेस्टिव्हलच्या शुभारंभाच्या मैफलीत उस्ताद उस्मान खान यांनी राग मारवाने वादनास सुरुवात केली. राग मारवामधील मधुरस्वरांनी रसिकांना भुरळ पाडली. त्यानंतर शांत रसप्रधान भूपेश्री रागातील रूपकमध्ये एक रचना सादर करून आपल्या वादनातील महारथ रसिकांना दाखविली. मैफलीची सांगता मनातील भावभावना जागृत करणाऱ्या राग चारुकेशीने केली. त्यांना उस्ताद अक्रम खान यांनी समर्पक तबला साथ केली.
सतार वादन बैठकीचा शुभारंभ उस्ताद उस्मान खान आणि उस्ताद अक्रम खान यांनी दीपप्रज्वलन करून केला. कलाकारांचा सत्कार मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या समर फेस्टिव्हलला पुण्यातील साहित्य, संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.
जाहिरात