गोल्डन आय न्युज नेटवर्क , रिपोर्टर – प्रसन्न पाध्ये
पुणे : सूर-ताल-नृत्याच्या सान्निध्यात ‘चैत्रपालवी’ फुलल्याचा अनुभव आज पुणेकर रसिकांना आला. निमित्त होते ते केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि भारतीय विद्या भवन तसेच इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चैत्रपालवी’ या विशेष कार्यक्रमाचे.
गुढीपाडव्याचे निमित्त साधून सरदार नातू सभागृहात आज (दि. 22) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायिका विदुषी मंजिरी आलेगावकर यांचे गायन आणि ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पंडिता मनिषा साठे आणि सहकाऱ्यांची नृत्यप्रस्तुती झाली.
विदुषी मंजिरी आलेगावकर यांनी श्री रागातील झपतालात ‘गरिब नवाझ तुम हो मेरे साईयाँ’ ही पारंपरिक बंदिश सादर करून मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर अतिशय सुरेल आवाज आणि सुरावटीतील वैविध्य दाखवत अंतू गुरव जोशी यांनी रचलेली ‘अर्धांगी गिरीजा गौरी’ ही बंदीश सादर केली. ही बंदिशी मंजिरी आलेगावकर यांना त्यांचे गुरू अप्पा कानेटकर यांनी शिकवली असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
यानंतर मंजिरी आलेगावकर यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या गायनाची आठवण करून देणारा बहारदार तराणा सादर केला. मैफलीची सांगता संत कबीर यांच्या मानवी मनाला मार्गदर्शन करणाऱ्या ‘हीरना समझ-बुझ बन चरना’ या निर्गुणी भजनाने केली. या रचनेला पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरसाज चढविलेला आहे. आलेगावकर यांना अजित किंबहुने (तबला), प्रविण कासलेकर (हार्मोनियम), कीर्ती कुमठेकर, स्वराली आलेगावकर आणि डॉ. मृणाल वर्णेकर यांनी स्वरसाथ केली.
कथक नृत्याविष्कारात पंडिता मनिषा साठे यांनी प्रथम राम स्तुती सादर केली. त्यानंतर साठे यांनी त्यांच्या ज्येष्ठ शिष्यांसह तालप्रस्तुती सादर केली. या तालप्रस्तुतीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कृष्णाच्या रासनृत्यावर आधारित रासरचे हे सादरीकरण मन लुभावणारे ठरले. यानंतर मनिषा ताईंच्या नाती सर्वेश्वरी साठे आणि आलापी जोग यांनी शिवाचे वर्णन करणारी ‘शिव चतरंग’ ही नृत्यप्रस्तुती प्रभावीपणे सादर केली. सतारीच्या बोलांवर आधारित जया जोग यांनी रचलेल्या बहारदार तांत्रिक कथक रचनेत नृत्यांगनांच्या पदलालित्याचे उत्तम दर्शन घडले.
कार्यक्रमाची सांगता मनिषा साठे यांनी पंडित बिंदादिन महाराज यांच्या रचनेने केली. या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही रचना सांगीतिकदृष्ट्या ठुमरी असली तरी मनिषाताईंनी ही रचना भजनाच्या अंगाने पेश केली. नृत्यगुरू मनिषा साठे यांच्यासह वल्लरी आपटे, मधुरा आफळे, वैष्णिवी निंबाळकर, कीर्ती कुरंडे, चैत्राली उत्तुरकर, मैथिली पुंडलिक, सहिष्णुता राजाध्यक्ष यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे निवेदन रेवती देशपांडे यांनी केले.
कलाकारांचे स्वागत आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला, भारतीय विद्याभवनचे संचालक नंदकुमार कार्किडे आणि भारती विद्यापीठच्या ललित कला केंद्राचे संचालक डॉ. शारंगधर साठे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता लेले यांनी केले.
जाहिरात