स्त्री,साडी आणि फॅशन
वय वर्षे अठरा ते एकोणीस नंतर ..
कमरे चा प्रवास कमरा असा झाला तरी .. चवळीच्या शेंगेचा भोपळा झाला तरी, बिना alteration, अगदी खुलून दिसणारा आणि रूप खुलवणारा कपडा म्हणजे साडी .
कुठल्याही इतर पेहरावापेक्षा साडीमध्ये स्त्री जास्त सुंदर दिसते,हे तर सगळ्यांनाच माहितीये पण साडीमध्ये स्त्री जास्त शालीन,प्रेमळ,कुटुंबवत्सल आणि घरंदाज दिसते,साडीचा ग्लो फक्त तिच्या चेहऱ्यावरचं नाही तर तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर दिसून येतो…
साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही कारण मुळातच ही फॅशन नसून आपली संस्कृती आहे,साडीचा ड्रेस शिवून घालणे ही एकवेळ फॅशन असू शकते,पण साडीतलं सौदर्य आणि साडीमुळे खुलून दिसणारं स्त्रीचं रूप ह्याची सर साडीच्या शिवलेल्या ड्रेसला कधीच येऊ शकत नाही… मग ती साडी कुठल्याही प्रकारची असो…
नऊवारी, सहावारी, गुजराती, बंगाली अनेक प्रकारे साडी नेसली जाते… अगदी कॉटनची असो किंवा सिल्क ची साडी नेसलेली स्त्री ही घरंदाजच दिसते… साडीबरोबर मॅचिंग ज्वेलरी घातली की साडीला एक वेगळाच फॅशनेबल लुक येतो, काठपदर आणि प्युअर सिल्क साडी हे प्रकार अजूनही लग्नसमारंभ आणि आपल्या पारंपरिक सणांमध्ये स्वताचे मानाचे स्थान अजून टिकवून आहेत आणि त्याची जागा कुठलाही अन्य पेहराव घेऊ शकत नाही, काही वर्षांपूर्वी आलेली नेटच्या साडीची फॅशन काही काळापूर्तीच लग्न समारंभात दिसून आली पण ती कितीही नेटाने नेसली तरी काठपदर आणि प्युअर सिल्कच्या साडीची जागा घेऊ शकली नाही… आजही नारायण पेठ, गौरी सिल्क, पैठणी, कांजीवरम , बनारसी, जिजामाता सिल्क आशा अनेक प्रकारच्या पारंपारिक साड्यांनाच जास्त पसंती दिली जाते… अशा साड्यांवर डिझायनर ब्लाउज घालून थोडा मॉडर्न टच दिला की त्या साड्या आणखीन खुलून दिसतात.
महाराष्ट्रात समस्त महिलावर्गाच्या साडीचा आवडता प्रकार म्हणजे पैठणी ह्यामध्ये डिजायनर पैठणी,गंधर्व पैठणी असे अनेक प्रकार पाहायला मिळतात…पैठणी घालायची परवानगी पूर्वी फक्त पेशवे घराण्यातील स्त्रियांनाच होती, फक्त त्यांच्या साठीच त्या विणल्या जात म्हणुन त्याला राजवस्त्र असं म्हटल जाई….
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा दारुण पराभव झाला… संपूर्ण स्वराज्यावर शोककळा पसरली होती,घरटी एक माणूस रणांगणावर धारातीर्थी पडला होता… तो दिवस होता संक्रांत… त्या दिवशी सर्वांनी काळे कपडे घालून शोक व्यक्त केला,म्हणून संक्रातीला काळे कपडे घालायची प्रथा पडली,पण अत्ता ह्या प्रथेचा आदर करत आपण ही परंपरा सकारात्मकपणे पुढे चालू ठेवली आहे,आणि बायका उत्साहाने काळ्या रंगाच्या साड्या परिधान करून हा सण उत्साहाने साजरा करतात…हा झाला साडीचा इतिहास…
परंतु साडीची जागा अन्य कुठलाही पेहराव घेऊ शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे.
प्रीती जोशी
Mob no 8208389941
A1/12 krushnaleela terrace
Kothrud
जाहिरात