लेख – अजूनही मी लहान आहे
संध्याकाळ होत होती, सूर्य देखील विश्रामासाठी आपल्या घराकडे कधीच निघाला होता. सर्व कार्यालयातील कर्मचारी देखील आपआपली दैनंदिन कामकाज आटोपून घराकडे जाण्याची तयारी करत होती. आज कदाचित थोडी लवकरच करत होती कारण, आकाशात सर्व ढगांनी आपला कापसा सारखा रंग बदलून, काळ्या चादरीमध्ये स्वतःला पांघरून घेतले होते. कदाचित आज वरुण राजा वसूधेला भेटण्यासाठी येणार असावा.
इतरांना पाहून माझीही लगबग वाढली होती. मी ही कसाबसा आपलं सर्व आटोपून, कार्यालयातून धूम ठोकण्याचा प्रयत्न करत होतो, इतक्यात आकाशात एक मोठा आवाज झाला. एखादा राजा महालात येत असल्यास जसा द्वारपाल आवाज देऊन सर्वांना सावध करतो, तसाच वरूण राजा च्या आगमनापूर्वी मेघ नावाच्या द्वारपालाने केले असावे असा भास झाला. मी सरसर पाय-या उतरून माझ्या गाडीकडे जाण्यासाठी निघालो असता अचानक काही थेंब माझ्या डोक्या-खांद्यावर अलगद उतरले. मी माझ्या पायांचा वेग वाढवलाच होता आणि अगदी काहीच पावले दुर जाताच पावसाचा जोर वाढला. जवळपास अर्धा भिजतच मी जवळच्या आडोशाला उभा राहिलो. अंगावरील पाणी झटकण्याचा माझा प्रयत्न चालू होता. पाऊस पडण्याचा आवाज आणि ढगातून येणारे आवाज या व्यतिरिक्त मला आसपास कोणताच आवाज येत नव्हता. पावसाच्या पडणा-या थेंबांकडे बघता बघता मी यात काही क्षण हरवून गेलो होतो.
काही वेळातच अचानक काही भुरभुरण्याचा आवाज झाला, मी दचकून खिशाला हात लावला, आणि जाणवले की माझ्या मोबाईल वरती कोणाचा तरी फोन आला होता. हात ओले असल्याने मी मोबाईल बाहेर न काढता च ब्लुटुथ ने फोन रिसिव्ह केला. पलिकडुन काही अस्पष्ट आवाज येत होता, “हॅलो, कुठे आहेस बाळा? ” मला पहिल्या वेळी व्यवस्थित ऐकू न आल्याने मी परत प्रश्न केला, ‘हॅलो, कोण?’.पलिकडून परत आवाज आला, “अरे मी आई बोलतेय, कुठे आहेस बाळा? “. मी म्हटलं, ऑफिस जवळच आहे. आई म्हणाली, ” ऑफिस मध्ये च थांब, बाहेर येऊ नको, पाऊस जोरात आहे, आम्ही घरीच आहोत, काळजी करू नको, पाऊस बंद झाल्याशिवाय निघू नको, फटफटी वर तर येऊच नकोस, घसरतात चाक त्याची.” अशी एकसारखे बोलत होती. मी फक्त ऐकत होतो आणि खाली पडणा-या पावसाच्या प्रत्येक थेंबाकडे बघत परत हरवून गेलो होतो. काही वेळेनंतर पलीकडून परत आवाज आला, “हॅलो, ऐकतोस ना रे?”. मी होकारार्थी ‘हो हो’ म्हटले आणि फोन कट केला.
मी विचार करत होतो, की मला अचानक या सर्वांची काळजी का वाटली नाही? त्यांनाच मला कॉल करून का सांगावे वाटले ? का मला त्यांना फोन करून विचारावे वाटले नाही?. मी स्वतः माझी काळजी करू शकत नाही का?, मी स्वतः ला मोठा झाल्याचे समजतो खरे पण अजून मी मोठा झालेलो नाही का?. असे अनेक प्रश्नांनी मला क्षणार्धात वेढा दिला होता…
पण माझं मन मला सांगून गेलं. तु वयाने कितीही मोठा हो, एका व्यक्ती साठी तू कायमचा लहानच राहशील. आणि ती व्यक्ति म्हणजे “आई”.
पावसाच्या सरी ओसरल्यावर, गाडीवर बसून जाताना मी या सर्व घटनेचा विचार करत होतो.
खरचं आपण कितीही मोठे व्होवोत, तिच्या साठी आपण लहान च राहू.. आणि मला असा लहानपण उपभोगायला कायम आवडेल. घरी आल्यानंतर आईला एक कडकडीत मिठी मारली आणि फक्त एक शब्द उच्चारले….थँक्यू….
लेखक :- अमरजित विलासराव कुलकर्णी (मुरूमकर)
सेनापती बापट रोड, पुणे-४११०१६
मो- ९८३४०१३६६३.
जाहिरात