2022 च्या गणेशोत्सवात पुण्याच्या नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचा अनोखा देखावा !
शालेय वस्तूंपासून श्रींची प्रतिकृती पर्यावरण पूरक गणेश मूर्ती अर्थात “शालेय गणेश”
ह्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे म्हणाले की परमेश्वर हा चराचरात व्याप्त आहे या विश्वरूपी भावनेने गेल्या अनेक वर्ष आमचे मंडळ गणेशोत्सवात विविध वस्तूंपासून श्री गणेशाची प्रतिकृती सादर करत आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे लहान मुलांचे शालेय जीवन विस्कळीत झाले. पालकांचे छत्र हरपल्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली. शिक्षणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने मंडळाने शालेय वस्तू वापरून श्री गणेश प्रतिकृती सादर केली आहे.
शालेय गणेश या देखाव्याच्या माध्यमातून गणपती बाप्पा हेच सांगत आहेत की शिक्षण हाच समृद्धीचा पाया आहे.
या देखाव्यामध्ये शाळेतील घंटा, मधल्या सुट्टीतील डबा, वॉटर बॅग, पेन स्टॅन्ड, जागतिक नकाशा म्हणजेच ग्लोब, रंगकामाचे साहित्य, वह्या, पुस्तके, पेन्सिल्स, खोड रबर, टिफिन बॅग, फेविकॉल, कंपास पेटी, पाटी, खड, शाळेची बॅग, डायरी इत्यादी ३५ पेक्षा जास्त वस्तू वापरून शालेय गणेश ही प्रतिकृती साकारली आहे.
पर्यावरणपूरक असलेल्या मंडळाच्या देखाव्याच्या परंपरेनुसार गणेशोत्सवानंतर सामजिक बांधिलकी जपत या सर्व वस्तू गरीब गरजू विद्यार्थ्यांना भेट देण्यात येणार आहेत.
देखाव्याची संकल्पना व सजावट प्रशांत साळुंके, हेमंत धिडे, रणजीत हिंगमिरे, गिरीश पवार, सचिन डिंगरे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते.
मंडळाचे हे ४४ वे वर्ष असून वर्षभर विविध सेवा कार्य केली जातात. यामध्ये वृद्धाश्रम, अनाथालय, देवदासी, गरीब विद्यार्थी, गरीब रुग्ण, कातकरी समाज, कचरा वेचक मुले, अंध अपंग केंद्र येथे नियमितपणे औषध वाटप, रक्तदान, पुस्तके वाटप, धान्य वाटप, कपडे वाटप, बुट चप्पल, सायकल वाटप केले जाते.
सीमेवरील जवानांना तिळगुळ आणि राख्या देखील मंडळातर्फे पाठवले जातात. नारायण पेठ पोलीस चौकी येथे मंडळातर्फे वॉटर पुरिफायर व सॅनिटायझर स्टॅन्ड देखील बसवण्यात आला आहे.
यंदा मंडळातर्फे नगर सेवक राजेश दादा येनपुरे यांच्या सहकार्याने पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेश मूर्ती नागरिकांना अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली.
मागील वर्षी मंडळाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सर्वांगीण कार्य विभागात प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोबत मंडळाला आतापर्यंत विविध संस्थांची शेकडो पारितोषिके मिळाली आहेत.
२१ व्या शतकात लोकमान्यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य मंडळ करत आहे असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
मंडळाचे अध्यक्ष अजित परांजपे, उपाध्यक्ष गणेश पवार, सचिन डींगरे, खजिनदार गुरुदत्त डींगरे, सचिव अनिल मोहिते, सामजिक उपक्रम प्रमुख अमोल भालेराव, कार्याध्यक्ष सुनील महांकाळे, उत्सव प्रमुख कुणाल आहेर, दीपक उभे, विकास वाघमारे, निखिल हजारे , वर्गणी प्रमुख प्रतीक मोहिते आहेत.