Marathi FM Radio
Friday, November 21, 2025

संसारी शहाणपण, ‘संस्कृतिनिष्ठ नायिका’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘समर्पण’ पुस्तकांचे प्रकाशन !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

ललिता सबनीस यांच्या साहित्यकृतीतून मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन : प्रा. मिलिंद जोशी !!

‘संसारी शहाणपण, ‘संस्कृतिनिष्ठ नायिका’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘समर्पण’ पुस्तकांचे प्रकाशन !!

पुणे : खरा लेखक सर्जनाच्या सर्व शक्यता तपासून पाहतो. बंदिस्त चौकटीत न अडकता विविध विषय हाताळत, सर्वसमावेशक सूत्रे आपल्या साहित्यकृतीतून मांडतो. हे सूत्र स्वीकारत ललिता सबनीस यांनी जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता दर्शवत मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचे दर्शन आपल्या साहित्यकृतींमधून घडविले आहे, असे गौरवोद्‌गार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले.

Advertisement

महाराष्ट्र साहित्य परिषद येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात (डावीकडून) अंजली कुलकर्णी, सुनिताराजे पवार, कृष्णकुमार गोयल, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, वि. दा. पिंगळे.

Advertisement

सस्कृती प्रकाशनतर्फे ललिता श्रीपाल सबनीस लिखित ‘संसारी शहाणपण, ‘संस्कृतिनिष्ठ नायिका’, ‘लहानपण देगा देवा’ आणि ‘समर्पण’ चार पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी (दि. १९) झाले. त्या वेळी प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षपदारून बोलत होते.

Advertisement

प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, कवयित्री अंजली कुलकर्णी, साहित्यिक वि. दा. पिंगळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, विविध वाङ्‌मय प्रकारात लेखनप्रयोग करताना ललिता सबनीस यांनी रूढी, परंपरा यांच्यावर पुनर्विचार करणाऱ्या नायिका, स्त्रीवादाची मूल्ये दर्शविणारे संसारी शहाणपण तसेच लैंगिकता आणि नैतिकता या विषयावर थेट भिडण्याचे सामर्थ्य दाखविले आहे.


उत्तम संवेदनशील नागरिक घडावेत या दृष्टीने केलेले प्रयत्न त्यांच्या साहित्यकृतीतून जाणवतात. यातूनच त्यांनी जबाबदार बालसाहित्यकाराची भूमिका उत्तमपणे निभावली आहे. त्यांचे वाङ्‌मयीन विचार सुशिक्षितांना संस्कारित होण्यासाठी मार्गदर्शक आहेत. रंजक तरीही प्रबोधनात्मक आणि मूल्य जपणारे साहित्य माणुसकीचा आवाज बुलंद करणारे आहे.

हा प्रकाशन सोहळा म्हणजे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांचा आनंद मेळावा आहे, असे सांसून कृष्णकुमार गोयल म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या साक्षीने ललिता सबनीस यांनी मराठी साहित्याला नवी दिशा, उर्जा देणाऱ्या साहित्यकृती निर्माण केल्या आहेत. या साहित्यकृती समाजभान जागवतील असा विश्वास आहे.

 

लेखन प्रवासाविषयी बोलताना ललिता सबनीस म्हणाल्या, साक्षरता पालकत्व, कुटुंब प्रबोधन, नातेसंबंध, महान स्त्रीयांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा या साहित्यकृतींमधून घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आनंदाने हसत खेळत, चैतन्याची बाग फुलवत होणारे बालकांचे प्रबोधन यांसह समर्पण आणि त्यागाची भूमिका मांडत विचार करायला लावणारी शोकांतिका या साहित्यकृती वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ठरतील.

‘समर्पण’ या कादंबरीविषयी बोलतानात अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ललिता सबनीस यांनी सामाजिक मूल्यव्यवस्था, नैतिकता व अनैतिकतेतील द्‌वंद्व, त्याग, समर्पणाची भावना या विषयी वास्तवपूर्ण मांडणी करत उत्तम संवादात्मकतेतून प्रसंग उभे करत वाचनियता जपणारी साहित्यकृती निर्माण केली आहे. तर ‘लहानपण देगा देवा’ या कवितासंग्रहातून मुलांच्या भावविश्र्वाशी तन्मयता साधत सभोवताल, निसर्गविभ्रम, नातेसंबंध यांच्याविषयी प्रसन्न, मोहक तसेच साध्या व सोप्या शब्दात मांडणी केली आहे.

वि. दा. पिंगळे म्हणाले, ‘संसारी शहाणपण’ या साहित्यकृतीतून ललिता सबनीस यांनी सुखी संसाराची गुरुकिल्लीच वाचकांच्या हाती दिली आहे. आजच्या काळातील मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था पुन्हा एकदा एकसंध व्हावी याकरिता हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. देशाच्या मातीत जन्मलेल्या स्त्री रत्नांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख ‘संस्कृतीनिष्ठ नायिका’ या पुस्तकातून वाचकांसमोर येत आहे.

डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मनोगत व्यक्त केले तर सुनीताराजे पवार यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिनेश फडतरे यांनी केले.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular