गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आंबेडकर यांच्या साहित्यातील विचार अंगीकारण्याची गरज : राज अहेरराव !!
ॲड. डी. बी. सोनवणे हे आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार : राज अहेरराव !
ॲड. डी. बी. सोनवणे लिखित चार पुस्तकांचे प्रकाशन !
पुणे : संत, महापुरुषांची आज समाजा-समाजात वाटणी झाली आहे. समाज शिक्षित, संघटीत झाला पाहिजे, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अपेक्षा होती. पण तसे होताना आजही दिसत नाही.
डॉ. आंबेडकर यांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या साहित्यातील विचार अंगीकारले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी व्यक्त केली. महापुरुषांच्या अंत:करणातील भाव ॲड. डी. बी. सोनवणे यांनी आपल्या लेखनातून उतरविले असून ते खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकर यांचा वारसा चालवीत आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
पुस्तक प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) सीमा गांधी, ॲड. डी. बी. सोनवणे, राज अहेरराव, प्रा. नीलिमा फाटक, मोहन वाडेकर.
ज्येष्ठ लेखक ॲड. डी. बी. सोनवणे लिखित ‘सम्राट अशोक : परिवर्तनाचा पुरस्कर्ता’, ‘वाळवंटातील वृक्ष’, ‘संघर्षातून उमललेलं असित्व’ आणि ‘स्त्री’ या पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी राज अहेरराव यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी ते बोलत होते. प्रा. नीलिमा फाटक, मोहन वाडेकर, डॉ. सुहासिनी धिवार, ॲड. केशव गाडे मंचावर होते. एस. एम. जोशी कॉन्फरन्स हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोहिणी पब्लिकेशनतर्फे पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
अंत:करणातील भाव शब्दातून उमटवितो तो खरा लेखक असे सांगून राज अहेरराव म्हणाले, संत, महापुरुषांच्या विचारांचा बोलण्यापूर्वी अभ्यास होताना दिसत नाही. संत, महापुरुषांच्या विचारातून समाज घडवत नाही तोपर्यंत समाज मोठा होत नाही.

प्रा. नीलिमा फाटक म्हणाल्या, समाजातील प्रत्येक स्त्री वंदनीय आहे हे ॲड. सोनवणे यांच्या लिखाणातून प्रकर्षाने जाणवते आहे. ‘स्त्री’ या पुस्तकातील विचार प्रत्येकाने अंगीकारल्यास समाजाचा सर्वांगिण विकास होईल.
मोहन वाडेकर म्हणाले, ॲड. डी. बी. सोनवणे यांच्या लिखाणावर शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. वडिलांनी केलेल्या कष्टातून प्रेरणा घेऊन त्यांनी लिखाण केले आहे.

डॉ. सुहासिनी धिवार यांनी कौटुंबिक आठवणींना उजाळा देत ॲड. सोनवणे यांनी ऐतिहासिक आणि सामाजिक विषय कौशल्याने हाताळले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले.











