गोल्डन आय न्यूज नेटवर्क
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित मैफलीत
युवा कलाकारांचा स्वराविष्कार !!
पुणे : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित मैफलीत श्रुती बुजरबरुआ (ठाणे) आणि शुभम खंडाळकर (पुणे) या युवा कलाकारांनी सादर केलेल्या होरी, भजन, नाट्यगीत तसेच पारंपरिक रचनांद्वारे साकारलेला स्वराविष्कार रसिकांनी अनुभवला.
तर विदुषी सानिया पाटणकर आणि शिष्यांनी प्रथमच सादर केलेला ‘अष्टरंग’ हा गायन प्रकार कार्यक्रमाचे वेगळेपण ठरला.युवा पिढीतील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन कार्यरत आहे. याच उद्देशाने ज्योत्स्ना भोळे सभागृहात युवा कलाकारांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित मैफलीत अष्टरंग सादर करताना सानिया पाटणकर आणि सहकलाकार.
श्रुती बुजरबरुआ यांनी राग पटदीपने गायनाची सुरुवात केली. त्यात मध्यलय एक तालातील ‘दीप जले घर आएना शाम’ ही बंदिश सादर करून द्रुत तीन तालातील रचना सादर केली, ‘रंग डारुंगी नंद के लालन पें’ ही होरी रसिकांना विशेष भावली. ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या रचनांनंतर ‘झाले युवती मना’ हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर करून मैफलीची सांगता केली.
त्या नंतर शुभम खंडाळकर यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग यमन कल्याणमधील तराणा सादर करून द्रुत लयीत बंदिश सादर केली. ‘बाली उमरिया सजनिया, ‘याद पिया की आए’ या सुप्रसिद्ध रचना तयारीने ऐकवून ‘भेटी लागी पंढरीनाथा’ हे भजन मोठ्या भक्तीभावाने सादर केले. ‘शब्दांवाचून कळले शब्दांपलिकडचे’ या अभिषेकी बुवांच्या रचनेनंतर ‘बाजे रे मुरलिया बाजे’ ही रचना सादर करून रसिकांची मने जिंकत मैफलीची सांगता केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी सानिया पाटणकर आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेला अष्टरंग हा गायन प्रकार रसिकांना विशेष भावला. अष्टरंग गायन म्हणजे संगीताचे आठ प्रकार. यात चार विविध राग आणि चार विविध तालांसह संगीताचे चार प्रकार या अष्टरंगामध्ये सादर करण्यात आले. याच शास्त्रीय संगीताचे अभ्यासक चैतन्य कुंटे यांच्या रचना सादर करण्यात आल्या.
कलाकारांना यशवंत थिटे (संवादिनी), ताराशिष बक्षी (तबला), महेंद्र शेडगे (तालवाद्य), मनिषा पिंपळगावकर, ज्ञानेश्र्वरी ठाकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. चंद्रशेखर शेठ, विवेक सुरा यांनी कलाकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन महाबळेश्र्वरकर यांनी केले.











