Marathi FM Radio
Thursday, November 13, 2025

भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे आनंदमठ चित्रपटाचे सूत्र : सुलभा तेरणीकर !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे आनंदमठ चित्रपटाचे सूत्र : सुलभा तेरणीकर !!

पुणे : आनंदमठ या कादंबरीचा विषय हा राष्ट्रप्रेमाच्या उद्‌गाराचा असून भक्ती आणि शक्तीचा अनोखा वापर हे या चित्रपटाचे सूत्र आहे. ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित असून चित्रपटाची निर्मिती करताना निर्मात्याने सांस्कृतिक स्वातंत्र्याचा वापर न करता मूळ कादंबरीला, पात्रांना धक्का लावलेला नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर यांनी केले.

Advertisement

आनंदमठ या हिंदी चित्रपटाला ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटातील वंदे मातरम्‌ या लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीतामुळे हा चित्रपट आजही रसिकांच्या आठवणीत आहे. वंदे मातरम्‌ जयंती दिनाचे औचित्य साधून आनंदमठ या चित्रपटावर चर्चात्मक कार्यक्रम आज (दि. ६) आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

वन्दे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समिती, जन्मदा प्रतिष्ठान व महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटर येथे आयोजित चर्चासत्रात सुलभा तेरणीकर यांच्यासह चित्रपट संगीत अभ्यासक धनंजय सप्रे यांचा सहभाग होता. त्या वेळी तेरणीकर बोलत होत्या.

Advertisement

चित्रपटातून इतिहासाचे दर्शन …
सुलभा तेरणीकर पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्वीचा काळ कादंबरीतून मांडताना इतिहासाकडे जागरुकतेने पाहता येते हे जाणवते. हाच धागा पुढे नेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काही कालावधीसाठी सचिव म्हणून कार्यरत राहिलेले हेमेन गुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. ही निर्मिती म्हणजे जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असून यातील पात्रयोजना करताना सखोल अभ्यास केल्याचे लक्षात येते.

Advertisement

धनंजय सप्रे यांचे स्वागत करताना प्रसाद भडसावळे. समवेत सुलभा तेरणीकर

विरोधाभासी दृश्यात संगीताचा स्वतंत्र बाज..

धनंजय सप्रे म्हणाले, ऋषी बंकिमचंद्र यांनी अध्यात्मवाद आणि राष्ट्रवादाची उत्तम सांगड घालणारी आनंदमठ ही कादंबरी लिहिली. ज्याला उदात्त भावना व तत्त्वज्ञानाची जोड होती. या कादंबरीने तसेच यातील वंदे मातरम्‌ या गीताने न भुतो न भविष्यती अशी ख्याती प्राप्त केली.

याच कादंबरीवर आधारित आनंदमठ हा हिंदी चित्रपट १९५२ साली प्रदर्शित झाला. यातील कथानकाला पुढे नेत जाणारी एकूण सात गीते चित्रपटात आहेत. हेमंत कुमार यांनी संगीत दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी चित्रपट होता. चित्रपटातील विरोधाभासी दृश्ये साकारताना संगीताचा स्वतंत्र बाज अवलंबला आहे.

वीररस, भक्तीरस, शांतिरस, व्याकुळ मनोवस्था, सामाजिक-मानसिक परिवर्तने दर्शविताना हेमंत कुमार यांनी विविध वाद्यांच्या वापरातून संगीताच्या माध्यमातून दृश्यात्मकता प्रभावीपणे मांडली आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले वंदे मातरम्‌ हे गीत स्फुरण, त्वेष, जोश उत्पन्न करणारे असून चित्रपटाचे संगीत आक्रमकता आणि कारूण्य यांचा अपूर्व संयोग साधते.

कार्यक्रमाविषयी संयोजक, वंदे मातरम्‌चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत प्रसाद भडसावळे, सुधीर जोगळेकर यांनी केले.

 

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular