गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शहनाई वादन-गायन जुगलबंदी तसेच ताल गजरात रसिक मंत्रमुग्ध !
स्वर-मिलाप संगीत महोत्सवात मान्यवर कलाकारांसह विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण !
पुणे : शहनाईचे सूर आणि गायन यांच्या जुगलबंदीतून साकारलेला राग मारू बिहाग तसेच तबला, पखवाज, शहनाई आणि बासरी यांच्या सूर-तालातून साकारलेला ताल गजर याने रसिकांना अद्भुत कलाविष्काराचा आनंद मिळाला.
अनुपम जोशी यांचा स्वर-मिलाप संगीतरत्न पुरस्काराने गौरव करताना मान्यवर.
निमित्त होते स्वर-मिलाप संगीत महोत्सवाचे. उमेश-महेश साळुंके व वृंदावनी संगीत विद्यालय हडपसर यांच्यावतीने हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमवंदन नाट्य संस्था, हडपसरच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस सुप्रसिद्ध गायक सुरेश पत्की, जयंत केजकर, किरण भट्ट, सरोद वादक अनुपम जोशी, संतोष कुंभार, तबलावादक महेशराज साळुंके, बापूसाहेब औताडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.
या प्रसंगी सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांना सुप्रसिद्ध शहनाई वादक पंडित डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते स्वर-मिलाप संगीतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पंडित डॉ. प्रमोद गायकवाड (शहनाई) आणि किरण भट्ट (गायन) यांच्या जुगलबंदीची सुरुवात मारू बिहाग रागातील ‘नैना लगाई मैने’ या बंदिशीने झाली. नोम-तोम, आलाप यांच्या वादन गायनातून रंगलेल्या जुगलबंदीत डॉ. गायकवाड यांनी मध्यलय त्रितालात शहनाई वादनातील गत ऐकविली. यानंतर गायन-वादनातून ‘पायोजी मैने राम रतन’ ही रामधून सादर केली.
रसिकांना हा अनोखा स्वराविष्कार भावला.
महोत्सवात शेवटी ताल गजर सादर करण्यात आला. महेशराज साळुंके (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), उमेशराज साळुंके (गायन), अनिकेत साळुंके (शहनाई), श्रीकांत गव्हाणे (बासरी) यांच्या सादरीकरणातून तबला-पखवाज वादनातील प्रमुख ठेके, वारकरी संप्रदायातील ‘रामकृष्ण हरी’चा गजर तसेच शास्त्रीय संगीतातील काही रचनांवर सादरीकरण झाले.
51 वादक एकाच मंचावर उपस्थित होते हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. तबलावादक महेशराज साळुंके आणि पखवाज वादक दीपक दसवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या संगीताविष्काराला रसिकांनी उभे राहून मानवंदना दिली. ताल गजर ही प्रस्तुती महेशराज साळुंके यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित केली.
या प्रसंगी स्वरूपा झांबरे या विद्यार्थिनीला आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिनल साळुंके यांनी केले तर आभार कमलेश खळदकर यांनी मानले.