गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वैदिक संस्कृतीवर दाही दिशांनी आक्रमणे; जपणुकीची जबाबदारी प्रत्येकाची !
डॉ. शंकर अभ्यंकर : वैदिक संमेलनात ब्रह्मवृंदांचा विशेष सन्मान
विश्वरूप घराचे देवघर म्हणजे भारतवर्ष : डॉ. शंकर अभ्यंकर !
पुणे : वसुधैव कुटुंबकम्ची विचारधारा आपल्या राष्ट्रात नांदते आहे. भारतीय सनातन परंपरा,धर्म अलौकिक व सर्वसमावेशक आहे. विश्वरूपी घराचे देवघर म्हणजे आपले भारतवर्ष आहे. यात अनेक ऋषी, महात्मे, आचार्य, संत यांचे स्थान मोलाचे आहे.
आज वैदिक संस्कृतीवर दाही दिशांनी आक्रमणे होत आहेत. त्यामुळे तिचा संकोच झाला आहे. अशावेळी धर्म व संस्कृतीची जपणूक, रक्षण करण्याचे कार्य प्रत्येकाकडून घडावे, अशी अपेक्षा विद्यावाचस्पती प्रा. डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली.
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैदिक संमेलनात सत्कारमूर्ती ब्रह्मवृंदांसमवेत मान्यवर.
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम्, दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्, शृंगेरी आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वैदिक संमेलनात आज (दि. 2) ब्रह्मवृंदांचा सन्मान श्रीशारदापिठम् शृंगेरीचे महाप्रबंधक पी. ए. मुरली यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी प्रा. डॉ. शंकर अभ्यंकर बोलत होते.
संमेलन शिवशंकर सभागृह, महर्षिनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. वे. मू. भानुदास नरसिंह जोशी (ऋग्वेद घनपाठी), वे.मू. मंदार नारायण शहरकर (शुक्ल यजु. माध्यं. घनपाठी), वे. मू. राजेश गोविंद जहागिरदार (शुक्ल यजु. काण्व घनपाठी), वे. मू. किरण अरुण गोसावी (अथर्व वेद), वे. शा. सं. विश्वासशास्त्री देशमुख (घोडजकर), विद्यावाचस्पती प्रा. शंकर अभ्यंकर आणि गोसेवक गजानन अवचट यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
श्री शृंगेरी शारदा पीठाचे महाराष्ट्र प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कार्याध्यक्ष भगवंत ठिपसे, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेचे कोषाध्यक्ष श्रीकांत फडके मंचावर होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, महावस्त्र, मानधन देऊन ब्रह्मवृंदांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पुढील पिढीला धर्मसंस्कृतीचे ज्ञान करून देण्याचे उत्तरदायित्व घनपाठींचे आहे, असे सांगून डॉ. शंकर अभ्यंकर पुढे म्हणाले, हिंदू धर्म विरोधात षडयंत्र रचले जात असताना ब्रह्मवृंदांकडून लोकपालन व्हावे.
यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जागरण होण्याची आवश्यकता आहे. आज हिंदू धर्माचा, वैदिक संस्कृतीचा प्रभाव वाढविण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होऊन राष्ट्र उद्धाराचे काम करत देशाला पुन्हा विश्वगुरू रूप प्राप्त करून द्यावे.
पी. ए. मुरली म्हणाले, अनेक वेदमूर्तींनी आपले संपूर्ण जीवन वेदशास्त्राच्या अभ्यासासाठी व प्रचार आणि प्रसारासाठी समर्पित केले आहे. दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्, शृंगेरीचा मुख्य उद्देश सनातन धर्माचे पालन, संवर्धन तसेच प्रचार व प्रसार करणे हा आहे.
शृंगेरी मठाची जगत्गुरूंची परंपरा महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे, असे सांगून पी. ए. मुरली यांनी महाराष्ट्र आणि दक्षिणाम्नाय श्रीशारदापीठम्, शृंगेरी यांचा अनुबंध उलगडला.
सत्कारमूर्तींच्या संस्कृत भाषेतील मानपत्राचे लिखाण श्रद्धा परांजपे यांनी केले होते तर वाचन मुक्ता गोखले, प्रथमेश बिवलकर, डॉ. ज्योत्स्ना खरे, अमृता करंबेळकर, श्रद्धा परांजपे, उन्मेष जोशी यांनी केले. प्रास्ताविक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी केले.
संमेलनानिमित्त आज (दि. 2) सकाळपासून मंत्रजागर, धर्मशास्त्रीय शंकासमाधान, परिसंवाद, प्रवचन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.