गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लोणावळा येथे लोणावळा-खंडाळा निवासी संगीत संमेलन !!
पुणे : अभिजात म्युझिक फोरमतर्फे दि. 8 ते 10 ऑगस्ट 2025 या कालावधीत लोणावळा येथे लोणावळा-खंडाळा निवासी संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गायन, वादन आणि नृत्याप्रती समर्पित असलेल्या या संमेलनातील सात सत्रांमध्ये सुमारे 25 ते 30 प्रथितयश कलाकारांचा सहभाग असणार आहे.
संमेलन लोणावळा येथील मन:शांती केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची संकल्पना अशी आहे की, सर्व कलाकार आणि संगीतप्रेमी श्रोते तीन दिवसीय महोत्सवादरम्यान एकाच ठिकाणी एकत्र राहतात. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना रसिकांना संगीताचा अखंड आनंद घेता येतो, अशी माहिती संमेलनाचे संयोजक मुकुंद आठवले यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
दि. 8 रोजी सायंकाळी 5 वाजता संगीत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर अंकिता जोशी, पंडित सुरेश बापट (गायन), अयान सेनगुप्ता (सतार), निशाद बाकरे (गायन) यांचे सादरीकरण होणार आहे.
दि. 9 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळात श्रुती सडोलिकर (गायन), 9 ते 12:30 या वेळात स्वराली पणशीकर (गायन), राधिका जोशी (गायन), पंडित विजय घाटे (एकल तबलावादन), सायंकाळी 4 ते 8 या वेळात मानस विश्वरूप (गायन), शशांक मक्तेदार (गायन), पंडित व्यंकटेशकुमार (गायन), 9 ते 12 या वेळात अरका आणि शौनक रॉय (सरोद वादन), मंजिरी असनारे-केळकर (गायन) यांचे गायन व वादन ऐकायला मिळणार आहे.
दि. 10 रोजी सकाळी 8:30 ते 12:30 या वेळात गीतिका उमडेकर-मसुरकर (गायन), मिलिंद रायकर (व्हायोलिन), डॉ. अरुण द्रविड (संवादात्मक कार्यक्रम), अवनी गद्रे (कथक) यांचे सादरीकरण होणार आहे.
कलाकारांना चारुदत्त फडके, अमेय बिच्चू, भरत कामत, रामदास पळसुले, अनंत जोशी, सुयोग कुंडलकर, अभिषेक शिनकर साथसंगत करणार आहेत.
या संमेलनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे श्रोते आणि कलाकार तीन दिवस एकाच ठिकाणी राहतात, संगीताचा आनंद तसेच निवास आणि भोजन एकत्र घेतात. संमेलनासाठी येणाऱ्या रसिकांची फक्त भोजन आणि निवास व्यवस्था सशुल्क असते. संमेलन मात्र सर्वांसाठी खुले असते. अधिक माहितीसाठी 9892246917 या क्रमांकावर संपर्क साधावा.