महंमद रफी हे महान गायक तसेच उत्तम व्यक्तीही : मोहन जोशी
सुभाषचंद्र जाधव लिखित ‘स्वरसम्राट महंमद रफी’ ग्रंथाचे प्रकाशन !
पुणे : महंमद रफी हे केवळ महान गायकच नव्हे तर उत्तम व्यक्तीही होते. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही; परंतु त्यांच्यावर प्रचंड प्रेम असल्याने त्यांच्या आवाजातील गाणी ऐकल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही, अशा भावना ज्येष्ठ चित्रपट अभिनेते आणि महंमद रफी यांचे चाहते मोहन जोशी यांनी व्यक्त केल्या.
महान गायक महंमद रफी यांची जन्मशताब्दी आणि त्यांच्या ४५व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला संवाद, पुणे आणि प्रतीक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सिनेपत्रकार, लेखक सुभाषचंद्र जाधव लिखित ‘स्वरसम्राट महंमद रफी’ या ग्रंथाचे प्रकाशन आज (दि. ३०) मोहन जोशी यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाटा मोटर्सचे प्लांट हेड (निवृत्त) व्ही. गांधी यांची विशेष उपस्थिती होती. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, प्रकाशक प्रवीण जोशी मंचावर होते.
स्वरसम्राट महंमद रफी’ ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) प्रवीण जोशी, सुभाषचंद्र जाधव, व्ही. गांधी, मोहन जोशी, सुनील महाजन, निकिता मोघे.
मोहन जोशी पुढे म्हणाले, ‘स्वरसम्राट महंमद रफी’ या ग्रंथात महंमद रफी यांच्या कारकिर्दीविषयी सखोल व अभ्यासपूर्ण माहिती असल्याने प्रत्येक रफीप्रेमीने हे पुस्तक जरूर वाचावे. महंमद रफी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे भाग्य लाभले याचा आनंद आहे. संवाद, पुणेच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
लेखनाविषयी बोलताना सुभाषचंद्र जाधव म्हणाले, वाचकांच्या प्रोत्साहनामुळे आज माझे २५वे पुस्तक प्रकाशित होत याचा विशेष आनंद आहे. महंमद रफी यांच्यावर प्रेम करणारे प्रकाशक मला भेटले हे माझे भाग्य आहे. महंमद रफी यांनी आपल्या गोड गळ्याच्या माध्यमातून प्रत्येक रसिकाला झपाटून टाकले आहे.
माझ्या आयुष्यात अनेकदा आलेले नैराश्य रफीसाहेबांच्या आवाजातील गाणी ऐकल्यामुळे दूर झाले आणि माझ्या जीवनात सकारात्मकता पसरली. रफीसाहेब आजही रसिकांच्या हृदयात अमरच आहेत.व्ही. गांधी यांनी महंमद रफी यांच्या गीतांविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रकाशक प्रवीण जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीस सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले तर आभार निकिता मोघे यांनी मानले. सूत्रसंचालन चिन्मयी चिटणीस यांनी केले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त गफार मोमीन, प्रज्ञा गौरकर यांचा महंमद रफी यांच्या गाजलेल्या गाण्यांवर आधारित सिनेसंगीताचा ‘सदाबहार रफी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो.