गोल्डन आय न्यूज नेटवर्क
तांत्रिकदृष्ट्या अद्यायावत रहा; कामाप्रती समर्पण भावना ठेवा !!
प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर धनंजय कुलकर्णी यांनी साधला विद्यार्थ्यांशी करिअरविषयी संवाद !
पुणे : सिनेमॅटोग्राफी हे आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रात पदार्पण करताना विचारांवर ठाम असले पाहिजे. या क्षेत्रातील तंत्रज्ञान सतत अद्ययावत होत असल्याने तांत्रिकदृष्ट्या स्वत:ला अद्ययावत ठेवणे ही काळाची गरज आहे. सिनेमॅटोग्राफरने सतत उघड्या डोळ्यांनी घटना व दृश्यांकडे पाहणे आवश्यक असते ज्यातून नवनिर्मिती घडू शकते.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तविद्या विभागातर्फे ‘अंडरस्टॅडिंग सिनेमॅटोग्राफी ॲज अ करिअर’ या विषयावर बोलताना धनंजय कुलकर्णी.
आपल्याला हवे ते लक्ष्य गाठण्यासाठी कामाप्रती समर्पण भावना आवश्यक असते, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर धनंजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिला.पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तविद्या विभागातर्फे कुलकर्णी यांचे ‘अंडरस्टॅडिंग सिनेमॅटोग्राफी ॲज अ करिअर’ या विषयावर रानडे इन्स्टिट्यूटमधील वृत्तविद्या विभागात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रसाद मिरासदार, वृत्तविद्या विभागाचे विभागप्रमुख संजय तांबट, सुप्रसिद्ध छायाचित्रकार सतीश पाकणीकर, मोहन रानडे, गिरीश देशपांडे उपस्थित होते.
जाहिरात, चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पंचज्ञानेद्रियांचा वापर करावा लागतो असे सांगून कुलकर्णी म्हणाले, ज्या कामाविषयी आवड असेल त्या विषयी आपल्या मनात 24 तास विचार होत राहणे आवश्यक असते. या क्षेत्रात कार्यरत असताना कल्पनाशक्तीला पूर्ण वाव देत नविन विचारांची कास धरावी लागते. 30 वर्षांत सिनेमॅटोग्राफी क्षेत्रात वावरत असताना आलेल्या अनुभवांची जंत्री खुली करून या क्षेत्रातील वाटचाल कशी असावी या विषयी सांगताना ते म्हणाले, तुम्ही आज केलेले काम ही उद्यासाठीची जाहिरात ठरते.
स्वत:शी प्रामाणिक राहून कार्य करताना काही चूक झाल्यास ती कबूल करून तिथल्या तिथे दुरुस्ती करणे आवश्यक असते.सतत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट, जाहिराती पहात रहा त्यातून स्वत:ची वेगळी शैली निर्माण करा. सुरुवातीस छोटी छोटी ध्येये डोळ्यासमार ठेवून कार्यरत रहा. सिनेमॅटोग्राफर म्हणजे दिग्दर्शकाचे डोळेच असतात. तुमच्या सर्जनशीलतेला वाव देत मेकॅनिकली चालणारा मॅन्युअल कॅमेरा वापरा, कारण ॲटोमॅटिक कॅमेरा वापरल्यास त्ुामच्यातील सर्जक वृत्ती वाढीस लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे अत्यंत गरजेचे असते, ज्या करिता कौटुंबिक व मित्रमंडळींचा भक्कम आधार असणे आवश्यक असतो.
व्याख्यानातील ठळक मुद्दे
करिअरकडे बघण्याची वृत्ती विकसित करणे
दिग्दर्शकाच्या सहाय्यकाच्या भूमिकेत रहाणे
ग्राहकांची मानसिकता ओळखून निर्णय घेणे
स्वयंशिस्त पाळणे
उत्तम शारीरिक क्षमत असणे
कामविषयी समर्पित भावना असणे
नविन विचार, कल्पना आत्मसात करणे
नव्या तंत्रज्ञानाची कास धरणे
करिअरविषयी अद्ययावत राहणे
व्यावसायिकता जपणे
कर्तव्यनिष्ठ असणे
सुरुवातीस प्रसाद मिरासदार म्हणाले, माध्यम क्षेत्रात वेगवेगळ्या संधींची उपलब्धता या विषयी मान्यवरांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे या करिता पुणे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे विविध उपक्रम राबविले जातात तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रात सध्या काय सुरू आहे, तंत्रज्ञानाचे महत्त्व काय या विषयीही मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातात.
मान्यवरांचा सत्कार संजय तांबट यांनी केला. सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी तर आभार तुषार रुपनवार यांनी मानले.
जाहिरात