Marathi FM Radio
Sunday, July 20, 2025

50 वर्षांनी पुन्हा भरला ‌‘हुजुरपागा‌’ शाळेचा दहावीचा वर्ग सुवर्ण महोत्सवी मेळ्यात रमल्या विद्यार्थिनी !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

50 वर्षांनी पुन्हा भरला ‌‘हुजुरपागा‌’ शाळेचा दहावीचा वर्ग सुवर्ण महोत्सवी मेळ्यात रमल्या विद्यार्थिनी !

पुणे : शाळा भरल्याची घंटा, वर्गात जाण्याची लगबग, नैमित्तिक प्रार्थना, ‌‘एकसाथ नमस्ते‌’ असे म्हणत शिक्षकांना केलेले अभिवादन, विद्यार्थिनी व शिक्षिकांच्या हस्ते झालेले सामूहिक दीपप्रज्वलन अशा भारावलेल्या वातावरणात सुमारे 50 वर्षांनंतर सुप्रसिद्ध हुजुरपागा शाळेतील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी अनुभवला इयत्ता दहावीचा वर्ग..!

Advertisement

1975 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी विनिता पिंपळखरे, हेमलता देशपांडे, विभावरी ठकार, संध्या देशपांडे, मीना साने यांच्या पुढाकारातून आज (दि. 29) हुजुरपागा शाळेतील अमृत महोत्सव सभागृहात सुवर्ण महोत्सवी मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

Advertisement

पुण्यातील नारायण पेठेत असलेली हुजुरपागा ही शाळा स्वातंत्र्यपूर्व भारतातील फक्त मुलींसाठी असलेली दुसरी शाळा आहे. 11वी मॅट्रिक परीक्षा पद्धती बंद झाल्यानंतर 1975 सालात एसएससी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा होता. 1975 सालच्या दहावीच्या बॅचला शिकविणाऱ्या डॉ. अपर्णा जोशी, सुलभा गोरे, जयश्री बापट, उमा वाळिंबे या ज्येष्ठ शिक्षिकांची विशेष उपस्थिती होती.

Advertisement

विद्यार्थिनींनी केलेले विविध गुणदर्शन पाहून जणू आपण स्नेहसंमेलन अनुभवतो आहे, असा अनुभव प्रत्येकास आला. चित्रपट, भावगीतांसह, नाट्यगीते भारती जोग, मंजुषा दाते, मोहिनी अत्रे, रसिका एकबोटे यांनी सादर केली. जयंत साने (संवादिनी), दीपक उपाध्ये (तबला) यांनी साथसंगत केली.सीमाशुल्क विभागातून निवृत्त झालेल्या मीना साने-करमकर तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या हेमलता देशपांडे यांनी आपआपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले.

हुजुरपागा शाळेतील विद्यार्थिनींचा सुवर्ण महोत्सवी मेळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित शाळेच्या विद्यार्थिनी आणि शिक्षिका.

जयश्री बापट यांनी विद्यार्थिनींना ‌‘नमस्ते‌’ असे संबोधन करून मनोगत व्यक्त केले. आज तुमच्या सारखेच मलाही लहान झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही विविध क्षेत्रात घेतलेल्या भराऱ्या पाहून आम्हा शिक्षकांना आनंद व कौतुकही आहे. स्वत:साठी वेळ द्या, छंद-आवडी जोपासा त्यातूनच प्रगती, उन्नती साधा आणि आम्ही आनंदी, उत्साही, सकारात्मक आहोत तशाच तुम्हीही रहा अशा शब्दात अनुभवाचे बोल सांगितले.

तुमची एसएससीची पहिली बॅच आम्हालाही हुरहुर लावणारी होती, असे सांगून जयश्री गोरे म्हणाल्या, 1975 सालच्या दहावीच्या परीक्षेत आम्हा नव्या शिक्षकांवर टाकलेला विश्वास तुम्ही विद्यार्थिनींनी सार्थ ठरवत हुजुरपागेच्या लौकिकात भरच घातली. तुम्हा विद्यार्थिनींचा हा विजय आम्हा शिक्षकांचाही विजय ठरला. आज वयाचा ठराविक टप्पा करून तुम्हाला आजीपण लाभले आहे. आपल्या नातवंडांच्या रुपाने तुमच्या हातात ओली माती आली आहे तिला छान आकार द्या आणि घडवा, अशा शुभेच्छा दिल्या.

कल्याणी केतकर, सुरेखा अण्णेगिरी यांनी शिक्षकांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनिता पिंपळखरे यांनी केले.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular