गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दातृत्व, तपस्या आणि सेवा क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य
स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांचे गौरवोद्गार !!
जितो पुणे विभागाचा 18वा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात
श्रीमती प्रमिलाताई नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्कराने सन्मान !!
पुणे : समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. जितोच्या माध्यमातून जैन बंधू हे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत. दातृत्व, तपस्या आणि सेवा या क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य आहे, असे गौरवोद्गार स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांनी काढले. मातेची पूजा करणे हे आपल्या परंपरेत महत्त्वाचे आहे.
आदिशंकराचार्य हे देखील मातेचे महात्म्य जाणून होते. मातेने दिलेले संस्कार ही एक शक्ती आहे. तिचा यथोचित सन्मान करणे धर्मशास्त्रातही सांगितले आहे, असेही त्यांनी सूचित केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाच्या 18व्या वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा प्रमिलाताई नौपतलाल साकला यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना स्वामी श्री गोविंद देव गिरीजी. समवेत जितो पुणे चॅप्टरचे पदाधिकारी.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागाचा 18वा वर्धापन दिन आणि सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारांचे वितरण स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी श्रीमती प्रमिलाताई नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्कराने, औद्योगिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजय उदयबाबू शहा, सामाजिक सेवेसाठी विनोद शंकरलाल राठोड, व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सुजित सोहनलाल जैन, युवा उद्योजक सुधेंदू चैतन्य शहा, डॉ. पूजा अभिजित लोढा तसेच संस्थात्मक कार्यासाठी आणि माहिती क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रुतभवन श्रुतदीप रिसर्च फौंडेशन यांचा गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पूनावाला फिनकॉर्पचे कार्यकारी संचालक अभय भुतडा, पिनन्स कमर्शिअल्सचे संचालक सौरभ बोरा, जितो पुणे विभागाचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, मुख्य सचिव चेतन भंडारी, दिनेश ओसवाल, वर्धापन दिन सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. विशाल शिंगवी, जितो अपॅक्सचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, श्रमण आरोग्यम्चे उपाध्यक्ष विजय भंडारी, जितो ॲडव्हायझरीचे ॲड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, रवींद्र सांकला, जेएटीएफ अपॅक्सचे उपाध्यक्ष इंदर जैन, अपॅक्सचे संचालक अचल जैन, धीरज छाजेड, जितो महिला विभाग अध्यक्ष संगीता ललवाणी, जितो क्रीडा विभागाचे अध्यक्ष विशाल जोरडिया, जितो जे पॉईंट अपॅक्सचे अध्यक्ष अजय मेहता, जितो आर. ओ. एम. झोनचे अध्यक्ष अजित सेठिया, जेएटीएफ जितो आर. ओ. एम. झोन अध्यक्ष इंदरकुमार छाजेड, उद्योगपती प्रकाश धारिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामी श्री गोविंद देव गिरीजी पुढे म्हणाले, सध्याचा काळ हा भारताचा अमृतकाळ आहे. कायदे करून दबलेल्या समाजाचे, धर्माचे उत्थान होण्याची गरज भासते तेव्हा श्रेष्ठ संघटन होणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे सद्गुणांची पारख होऊन त्यांची पूजा होणेही आवश्यक असते. आपल्या समाजाच्या कल्याणासह आपल्या देशाचे कल्याण व्हावे याकरिता रात्रंदिवस देशाचा विचार करावा आणि देशात अनुकुलता टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत. संघटित होऊन कार्य केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
प्रत्येकाने आपला समाज जिवंत ठेवण्यासाठी समाजाच्या घटत्या लोकसंख्येवर विचार करणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीचे आचारण कसे असावे याकडेही लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले. चांगल्या सात्विक समाजाचे घटते प्रमाण आणि त्या विरुद्ध दहशतवादी, वाईट वृत्ती, हिंसा यांना प्रोत्साहन देणाऱ्या वाढत्या समाजाविषयी स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांनी चिंता व्यक्त केली.
राजेश सांकला यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. समाजातील हिरे शोधून त्यांचा गौरव करण्याचे काम जितो करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. विशाल शिंगवी, चेतन भंडारी, कांतिलाल ओसवाल यांनी जितोच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचा सत्कार राजेश सांकला, कांतिलाल ओसवाल, चेतन भंडारी, विजय भंडारी, ॲड. विशाल शिंगवी, ॲड. एस. के. जैन आदींनी केला. परिचय रवींद्र सांकला यांनी तर आभार संजय डागा यांनी मानले.
जाहिरात