गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते अनंतराव जोशी यांच्या ‘नाटकवाला’ आत्मकथनाचे प्रकाशन !
पुणे : रंगकर्मी अनंतराव जोशी यांचे आत्मकथन केवळ वैयक्तिक नाही. त्यांच्या अनुभवांतून त्या काळाचे, त्या काळातील रंगभूमीचे, कलावंतांचे, समाजाचे, रसिकांचे, तेव्हाच्या रंगभूमीच्या इतिहासाचे उत्तम दस्तऐवजीकरण झाले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार व रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी शुक्रवारी येथे केले. जोशी यांनी प्रमुख भूमिकाच हवी, असे न मानता जी भूमिका मिळेल, तिचे सोने केले. अभिनयासह मेकअप, नाट्य व्यवस्थापन, निर्मिती या बाजूंवर प्रभुत्व मिळवले.
भरत नाट्य मंदिर : ‘नाटकवाला’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) प्रवीण जोशी, प्रसाद वनारसे, डॉ संपदा जोशी, अंजली धारू, अभिराम भडकमकर, नीलम शिर्के-सामंत, शैलेश नांदुरकर, अक्षय वाटवे.
रंगभूमीसोबतच त्यांनी आयुष्यभर केलेले सामाजिक कार्य, पक्षकार्य, शैक्षणिक कार्य आणि त्यांनी जपलेले माणूसपण यांचे योगदान विसरता कामा नये. नाटकवाला हे पुस्तक म्हणजे जोशी यांच्या योगदानाला केलेले अभिवादन आहे, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ रंगकर्मी कै. अनंतराव जोशी यांच्या ‘नाटकवाला’ या शीर्षकाच्या आत्मकथनाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या आत्मकथनाचे प्रकाशन अभिराम भडकमकर आणि अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते झाले. अनंतराव जोशी यांच्या कन्या अभिनेत्री अंजली धारू, रंगकर्मी प्रसाद वनारसे तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संपदा जोशी, शब्दांकन करणारे प्रवीण जोशी, तसेच प्रकाशक शैलेश नांदुरकर यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभली होती.
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ येथे हा सोहळा आज (दि. १३) रसिकांच्या आणि सुहृदुंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. हे आत्मकथन अनंतराव जोशी यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले आहे. अनंतराव जोशी यांनी लिहून ठेवलेल्या काही आठवणी, नोंदी, टिपणे यांच्या आधारे प्रसिद्ध संहितालेखक प्रवीण जोशी यांनी या आत्मकथेचे पुनर्लेखन एका वेगळ्या शैलीत केले आहे. रसिक आंतरभारतीतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
अनंतरावांच्या कन्या अभिनेत्री अंजली धारू यांनी मनोगतातून आपल्या पित्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. बाबांचे खरे मोठेपण आणि कर्तृत्व फार उशिरा लक्षात आले. लहानपणापासून बाबा नाटक करतात, हे माहिती होते. पण ते नेमके काय करत होते, त्याची लख्ख जाणीव स्वतः रंगभूमीवर काम करताना येत गेली आणि बाबांची नव्याने ओळख झाली. माणसाची किंमत पैसा, पद, प्रतिष्ठेने नसून माणूसपणावर असते, ही शिकवण बाबांनी दिली, असे त्या म्हणाल्या.
अभिराम भडकमकर म्हणाले, या आत्मकथनाच्या निमित्ताने रंगभूमीवर हयात वेचलेल्या रंगकर्मीला साजेसा असा ‘सेट’ उभारून आयोजकांनी कल्पकता दाखवली आहे. अनंतराव जोशी यांच्या या लेखनातून आपल्या पूर्वसुरींनी नेमके काय केले, आपण कुणाच्या खांद्यावर उभे आहोत, याची कल्पना आजच्या पिढीला आणि वाचकांनाही येईल. जोशी यांच्या टिपणांना, आठवणींना प्रवीण जोशी यांनी दिलेला एखाद्या नाटकाच्या संहितेचा आकृतीबंध आगळावेगळा आहे.
तीन अंक आणि अनेक प्रवेशांचे हे नाटक, जोशी नामक नाटकवाल्यासोबतच त्यांच्या आयुष्यातील इतर अनेक योगदानाविषयी सांगते. त्यांचे अश्रू, घाम, रक्त यातून व्यक्त झाले आहे. हा अतिशय महत्त्वाचा असा सोहळा आहे.
प्रसाद वनारसे यांनी स्वतःचे आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचे धाडस असणाऱ्या आणि ज्यांच्या शांतपणाचाही दरारा वाटावा, ज्याचे समाजभान विलक्षण होते, अशा रंगकर्मींच्या जीवनप्रवासाचे हे कथन, मराठी संस्कृतीच्या, समाजाच्या, राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाविषयी भाष्य करणारे आहे, असे मत मांडले. त्यांनी जे सोसले, अनुभवले त्याचा परिणाम कलेवर आणि स्वतःमधील माणुसकीवर त्यांनी होऊ दिला नाही, असेही ते म्हणाले.
शब्दांकन करणारे प्रवीण जोशी म्हणाले, अनंतरावांना मी प्रत्यक्ष भेटलो नाही. पण ‘मी’पणा गळून पडलेल्या त्यांच्या आठवणी, नोंदी माझ्यासमोर आल्या. काही आठवणींचे निर्माल्य होत नाही, तशा त्या आठवणी वाटल्या. त्यातून न लिहिलेलेदेखिल दिसू लागले आणि पुस्तकाचा हा नाट्यरूप आकृतीबंध गवसला. त्यांच्या जगण्याच्या संवेदनेने हा फॉर्म दिला आणि मी यथाशक्ती त्या आठवणींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला.
नीलम शिर्के-सामंत म्हणाल्या, रंगभूमी, समाज, शिक्षणक्षेत्र यासाठी अनंतरावांनी जे कार्य उभारले, ते एका पुस्तकात मावणारे नाही. पण या पुस्तकाच्या निमित्ताने ते सर्वांसमोर येत आहे, हे महत्त्वाचे आहे.
डॉ. संपदा जोशी यांनी अनंतराव जोशी यांच्यातील नेतृत्वगुणांचा उल्लेख केला. शैक्षणिक क्षेत्रातील कार्य हा आमच्यातील समान धागा आहे. त्यांनी आयुष्याकडे पाहण्याचा अनुकरणीय दृष्टीकोन दिला, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘नाटकवाला’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन प्रवीण जोशी, मंजिरी जोशी, अंजली धारू यांनी सादर केले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश नांदूरकर यांनी आभार मानले.