गोल्डन आय न्यूज नेटवर्क
तनुजा चव्हाण यांच्या काव्यातून स्त्रीवादाची उत्तम मांडणी : डॉ. राजा दीक्षित
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य प्रतिभा पुरस्काराने तनुजा चव्हाण यांचा गौरव
पुणे : भावना व्यक्त करणे हा कवितेचा आत्मा आहे. तनुजा चव्हाण यांनी काव्यातून व्यक्तीमधील कणखरपणा आणि स्त्रीवादही उत्तमरितीने मांडला आहे. त्यांच्या कवितांमधून विलक्षण प्रेमाचे दर्शन घडते; पण त्यावेळी सुद्धा स्वत:चे व्यक्तिमत्व, स्त्रीत्व जपण्याची भावना, सार्थ अभिमान जाणवतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी आज केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य प्रतिभा पुरस्काराने तनुजा चव्हाण यांचा गौरव
साहित्यात मांडलेल्या असुंदर, दु:खद गोष्टी मनाच्या गाभ्यातून मांडल्या गेल्या तर त्या देखील सुंदरच भासतात, असेही त्यांनी नमूद केले
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‘काव्य प्रतिभा पुरस्कार’ राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कवयित्री तनुजा चव्हाण यांना आज (दि. 10) डॉ. दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व ग्रंथ असे होतेे.
आपला मूळ पिंड कवीचा असल्याचे सांगून डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, तनुजा चव्हाण यांनी आपल्या काव्यातून भावना उत्तमरित्या प्रकट केल्या आहेत. चांगल्या कलाकृती व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब त्या कलाकृतीत असावे लागते आणि ते चव्हाण यांच्या कवितेतून पुरेपुरपणे दिसत आहे.
तनुजा यांच्या गद्य लेखनातही काव्यमयता जाणवते. चारोळी हा काव्यप्रकारही त्यांनी मोठ्या ताकदीने हाताळला आहे. आपले स्वत्व, आपली ओळख आपण कधीही विसरता कामा नये, असेही ते म्हणाले.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, तनुजा चव्हाण या विवेकी, विचारी, समंजस कवयित्री व उत्तम संयोजक आहेत. त्यांच्या कवितांमधून संवेदनशीलता, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, मूल्यात्मक भान टिकविण्याची वृत्ती जाणवते.
माणुसकीवर विश्वास, त्याचे आरस्पानी प्रतिबिंब दाखविणाऱ्या कवितांसह त्यांनी आपल्या कवितेतून सामाजिक विषमतेवरही उत्तम भाष्य केले आहे. त्यांना ललित लेखनाची लेखणीही लाभली आहे. कविसंमेलने, पुरस्कार हे कवयित्रींसाठी मोलाचे असतात कारण त्यातून त्यांच्यातील आत्मसन्मानाची भावना जागी होण्यास मदत होते, लेखन करण्यास एक सकारात्मक उर्जा मिळते.
पुरस्काराला उत्तर देताना तनुजा चव्हाण म्हणाल्या, सुखदु:खात आपण आपल्या जाणिवा जागृत ठेवल्या की कविता सुचतात. माझी कविता हे माझे प्रतिबिंब, साथ न सोडणारी प्रेरक सखी आहे. माझ्या भावनांना मी कवितेच्या माध्यमातून शब्दरूप दिले.
स्त्री रूपांच्या, नात्यांच्या पल्याड जाऊन जाणिवा व्यक्त करण्याचे कविता हे माध्यम आहे.
सूत्रसंचालन, सन्मापत्राचे लेखन व वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले. ॲड. प्रमोद आडकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात पुरस्कारामागील भूमिका विशद केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रमोद खराडे, सुनीती लिमये, मृणालिनी कानिटकर-जोशी, योगिनी जोशी, स्वाती यादव, सुजाता पवार, धनंजय तडवळकर, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, अंजली देसाई, आरुषी दाते, डॉ. ज्योती रहाळकर यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन मीरा शिंदे यांनी केले.
जाहिरात