गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘गाणी बहिणाईची’मधून खान्देशकन्येच्या साहित्याचे समग्र दर्शन !!
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित कार्यक्रमात !बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे सादरीकरण !
पुणे : खान्देशकन्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे समग्र दर्शन आज ‘गाणी बहिणाईची’ या कार्यक्रमातून रसिकांना घडले. जगण्यातील चिरंतन मूल्यांची शिकवण देणाऱ्या बहिणाबाईंच्या अनेक रचना या निमित्ताने ऐकावयास मिळाल्या.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘गाणी बहिणाईची’ कार्यक्रमात सहभागी कलाकार
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी पूना गेस्ट हाऊस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संहिता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांची तर संगीत राहुल घोरपडे यांचे आहे. काव्य वाचन आणि निवेदन डॉ. वृषाली पटवर्धन आणि डॉ. माधवी वैद्य यांनी तर काव्य गायन मीनल पोंक्षे, मंजिरी जोशी यांनी केले.
कुमार करंदीकर (संवादिनी), निलेश श्रीखंडे (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.
उद्योजिका शोभा धारिवाल, ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना लीला गांधी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, साहित्यिक मीना सासणे, गायक त्यागराज खाडिलकर, नंदकुमार काकिर्डे, ज्येष्ठ निवेदक जयंत जोशी, गायिका सीमा जोशी, पाककला तज्ज्ञ प्रगती आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
लौकिक अर्थाने अशिक्षित असणाऱ्या परंतु निसर्गाच्या माध्यमातून अचंबित करणारे ज्ञान प्राप्त करून त्याला काव्यरूपाने बोलीभाषेत व्यक्त रूप देणाऱ्या महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांच्या साहित्यिक मूल्यांची जडणघडण दर्शवित डॉ. माधवी वैद्य आणि डॉ. वृषाली पटवर्धन यांनी काव्यवाचन, विविध प्रसंगातून कार्यक्रमाची गुंफण केली.
बहिणाबाईंचे माहेराविषयी असलेले प्रेम, त्यांना भावलेले निसर्गाचे स्वाभाविक सौंदर्य, धरित्रीच्या कुशीतील काव्य, संसाराविषयीचे तत्त्वज्ञान, आयुष्यात येणाऱ्या सुख-दु:खांची मांडणी, जन्ममृत्यूविषयी त्यांनी जाणलेले तत्त्वज्ञान, देवरूपाचे वर्णन, संतमहात्म्यांची महती, कर्मयोगाची मांडणी, माणसाच्या स्वभावाची वैशिष्ट्ये, त्याचा अहंकार, जीवनाचे प्रतिबिंब अशा अनेक विषयांवर बहिणाबाईंनी बोलीभाषेत सहज शब्दात मांडलेले काव्य रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.
‘माझी माय सरसोती’, ‘देवा घरोटं घरोटं’, ‘आला पहिला पाऊस शिपडली भूई सारी’, ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’, ‘माझ्या माहेराच्या वाटे’, ‘बिना कपाशिनं उले, त्याला बोंड म्हनू नही’, ‘धरित्रीच्या कुशीमधी बिय बियानं पसरती’, ‘काया काया शेतामंदी घाम जिरवं जिरवं’, ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर’, ‘अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला’, ‘माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाचे लकरू’, ‘माय म्हनता म्हनता ओठ ओठाशी भिडे’ अशा विविध रचना कधी काव्यवाचनातून तर गायनातून सादर करण्यात आल्या.
कार्यक्रमाची सांगता बहिणाबाई रचित ‘अशी कशी येळी वो माये, अशी कशी येळी?’ या आदिमायेच्या आरतीने झाली. प्रभावी संहिता, कलाकारांचे उत्तम सादरीकरण आणि समर्पक साथसंगत याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि प्रत्येक रचनेला रसिकांची भरभरून दाद मिळाली.
पूना गेस्ट हाऊस या वास्तूमध्ये कार्यक्रम सादर करणे म्हणजे चारुकाका सरपोतदार यांचे आशीर्वाद लाभले अशी अनुभूती येते, अशा भावना डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केल्या.
किशोर सरपोतदार यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. संयोजन अजित कुमठेकर यांनी केले. कलाकारांचे स्वागत शोभा धारिवाल यांनी केले.
जाहिरात