गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सकाळच्या रागांची मैफल ठरली पर्वणी..!
विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित मिलिंद चित्ताल यांचे प्रभावी सादरीकरण !!
पुणे : किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित मिलिंद चित्ताल यांचे सुरेल, संयमी आणि पंडित फिरोज दस्तूर यांच्या गायकीचे घडविले दर्शन तर आग्रा तसेच ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या सादरीकरणरातील बंदिशींचे, राग-तालांमधील वैविध्य तसेच सौंदर्य रसिकांना आज अनुभवायला मिळाले.
निमित्त होते गानवर्धन, पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस्, मुंबई (एनसीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सकाळाच्या रागांच्या विशेष मैफलीचे. सकाळच्या रागांच्या मैफलीचे अभावानेच आयोजन होत असल्याने रसिकांसाठी ही मैफल पर्वणी ठरली. युवा वर्गापासून ज्येष्ठ अशा सर्व वयोगटातील रसिकांनी मैफलीला हजेरी लावली. एस. एम. जोशी सभागृहात आज (दि. 10) या विशेष मैफलीचे आयोजन करण्यात आंले होते.
गानवर्धन, पुणे आणि नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्टस्, मुंबई (एनसीपीए) आयोजित मैफलीत सहभागी (डावीकडून) भरत कामत, पंडित मिलिंद चित्ताल, उमेश पुरोहित.
मैफलीची सुरुवात उस्ताद फिरोज दस्तुर यांचे शिष्य पंडित मिलिंद चित्ताल यांनी राग ललतमधील ‘अरे मन तू’ या विलंबित एकतालातील रचनेने केली. त्याला जोडून ‘तुम बिछरत मोहे’ ही दृत तीन तालातील रचना सादर केली. मैफलीची सांगता राग जोगियामधील ‘हरिका..’ या भक्तीसंगीताने केली.
त्यांना भरत कामत (तबला) आणि उमेश पुरोहित (संवादिनी) यांनी समर्पक साथ केली.
मैफलीच्या उत्तरार्धात विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांचे प्रभावी गायन झाले. त्यांनी गायनाची सुरुवात राग जौनपुरीमध्ये विलंबित त्रितालात ‘बाजे झन्न..’ या रचनेने केली. या रचनेला जोडूनच दीपचंदी तालात जोगिया रागामध्ये ‘मन मत मान’ ही फारशी परिचित नसलेली रचना रसिकांना ऐकविली.
त्यानंतर विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची रूपकमधील ‘मै न जाणू’ ही बंदिश आणि त्याला जाडून दृत एकतालात ‘भनक सूनी’ ही बंदिश सादर केली. राग वृंदावनी सारंगमधील आग्रा घराण्याची आध्यातीन तालातील ‘रोको ना चे छैल’ ही बंदिश सादर केल्यानंतर ‘रंग डारूंगी’ ही होरी आणि शेवटी भैरवीतील अभंग ‘अवघा रंग एक झाला’ सादर केला.
बुद्धिप्रधान गायकीबरोबच आकर्षकता आणि होरीमधील सौंदर्य त्यांनी आपल्या सादरीकरणातून प्रकर्षाने दर्शविले. त्यांना विभव खांडोळकर (तबला), चैतन्य कुंटे (संवादिनी) तसेच जान्हवी गद्रे, श्रद्धा गद्रे, स्वरूपा बर्वे आणि अनुराधा मंडलिक (सहगायन आणि तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
गानवर्धनतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेत्या जी. सुरभी सुरेश, ऋतुराज कोळपे, वैष्णवी जोशी, सानिका फडके, सुरंजन जायभाय, हिमांशू तांबे, पार्थ घासकडबी, गौरी गंगाजळीवाले यांचा विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
गानवर्धन ही संस्था गेल्या 43 वर्षांपासून अभिजात संगीताचे जतन, संवर्धन करण्याबरोबरच नवोदित कलाकारांचा स्वरमंच उपलब्ध करून देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी सुरुवातीस प्रास्ताविकात सांगितले. कलकारांचा सत्कार दयानंद घोटकर, संस्थेचे सचिव रवींद्र दुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन संस्थेच्या कार्यध्यक्षा वासंती ब्रह्मे यांनी केले. मैफलीचे संयोजन संस्थेच्या विश्वस्त सानिया पाटणकर यांनी केले होते.
——————-^^^^———-^^^^^————–
जाहिरात