गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’
पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन !!
पुणे : पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते. गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते.
त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला.
निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती.
शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.
श्रुती पंडित म्हणाल्या, पुस्तक लिहिताना संगीत क्षेत्रातील वंदनीय व्यक्तीला आपण न्याय देऊ शकू का याविषयी मी साशंक होते. परंतु पंडित सुहास व्यास यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मी लिहिती झाले. त्यांची संगीत कलेविषयी असलेली विलक्षण ओढ, राजबिंडे व्यक्तीमत्त्व, स्वभाववैशिष्ट्ये या पुस्तकाद्वारे उलगडली गेली आहेत.
या दिग्गज कलाकाराच्या जीवनप्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे माझ्यासाठी आनंददायक असले तरी ही एक धाडसी जबाबदारी होती, असे सांगून मोनिका गजेंद्रगडकर म्हणाल्या प्रस्तावना लिखाणातून मी माझाच शोध घेत गेले. पुस्तकाची रचना ललित अंगाने जाणारी असून चरित्ररूपात न बसणारे, संवाद स्वरूपातील वाचनिय पुस्तक संगीतप्रेमींसाठी उपलब्ध झाले आहे. पंडित सी. आर. व्यास यांची गायकी घराण्याच्या पलिकडे जाणारी आणि आध्यात्मिक अधिष्ठान असणारी होती.
पंडित सी. आर. व्यास यांच्या शिष्या, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर म्हणाल्या, पंडित सी. आर. व्यास यांनी साहित्य व रागाचे चलन यांच्या कल्पना आपल्या बंदिशींमधून मांडल्या आहेत. राग सादरीकरण सुरू झाल्यानंतर त्याचा चेहरा दिसला पाहिजे ही त्यांची शिकवण होती. मकरंद केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अपर्णा केळकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी राग स्वानंदीमधील गुणीदास रचित ‘जियरा मानत नाही तुम बिन’ ही बंदिश सादर केली.
त्याला जोडून पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी रचलेला ‘दिम तमदिम तन देरेना’ हा तराणा ऐकविला. गुरू पंडित सी. आर. व्यास रचित ‘चतुर तुम हो प्राणप्रिया’ या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुरेल, सुमधूर व संयत गायनाने रसिकांना अनोखी सांगीतिक पर्वणी मिळाली. त्यांना कौशिक केळकर (तबला), अमेय बिचू (संवादिन), श्रुती डोरले, श्रावणी अत्रे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र जयंत जोशी, डॉ. विकास कशाळकर, शीला देशपांडे, डॉ. शुभांगी बहुलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुश्री वझे यांनी केले.