Marathi FM Radio
Thursday, May 29, 2025

शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठान आयोजित सुवर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात.!!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

झगमगाटामागील तपश्चर्येचे विस्मरण होऊ नये : प्रकाश जावडेकर !!

शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठान आयोजित सुवर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात!!

पुणे – “प्रतिभेचा अंश दैवी असू शकतो, पण तो अंश फुलवण्यासाठी आवश्यक परिश्रम, संघर्ष आपल्याला दिसत नाहीत. झगमगाटामागे तपश्चर्या असते, हे आपण विसरता कामा नये”, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी येथे केले. ‘यशामागील अशा तपश्चर्येचा सन्मान सुवर्णरत्न पुरस्काराच्या निमित्ताने होतो, हे कौतुकास्पद आहे’, असेही जावडेकर म्हणाले.

Advertisement

शिक्षण, पर्यावरण रक्षण तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत ‘शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘सुवर्णरत्न पुरस्कार’ वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांना सुवर्णरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा पार पडला.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये मकरंद देशपांडे (अभिनय, दिग्दर्शन, लेखन) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Advertisement

पुरस्कार स्वीकारताना मकरंद देशपांडे

Advertisement

गश्मीर महाजनी (अभिनय), केतकी माटेगावकर (गायन), समिधा गुरू (अभिनय), शिव ठाकरे ( स्टाईल आयकान), वलय मुळगुंद (गीतलेखन), वनिता बोराडे (स्त्रीशक्ती पुरस्कार), सूरज खटावकर (सोशल मिडिया प्रभाव), शेफ संदीप सोनार (उद्योजक), सुयश जाधव (क्रीडा – भारतीय पॅरा जलतरणपटू), अशोक अष्टेकर (ज्वेलर्स) यांचा समावेश होता. शाल आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे सहावे वर्ष होते.

Advertisement

यावेळी सुवर्णरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. सागर पौलस्ते, उपाध्यक्ष समीर पौलस्ते, शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठानचे संस्थापक जयवंत पौलस्ते, संचालिका सोनाली सागर पौलस्ते, तसेच राज्याचे माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे, गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ, गायक आनंद भाटे, पं. नंदकिशोर कपोते, अभिनेत्री किशोरी शहाणे, आनंद माडगूळकर आदी मान्यवरही याप्रसंगी उपस्थित होते.

“यशामागे मेहनत, चिकाटी, जिद्द असते. पण सर्वसामान्यांना फक्त यशानंतरचा झगमगाट दिसतो. त्यासाठी त्या त्या व्यक्तीने केलेली तपश्चर्या नजरेआड राहते. सुवर्णरत्न पुरस्कारांच्या निमित्ताने अशा तपश्चर्येचा गौरव होतो, हे स्वागतार्ह आहे”, अशा शब्दांत जावडेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

पुरस्कार स्वीकारताना वलय मुळगुंद.

सुवर्णरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित मकरंद देशपांडे म्हणाले, “जीवनगौरव म्हणजे थांबलेले काम, पण मी हा कामाचा नसून जीवनाचा गौरव समजतो. माणूस जीवन जगतो विंगेत आणि सादरीकरण करतो व्यासपीठावर, असे अभिनेता म्हणून मला वाटते. जगताना जे अनुभव मिळाले, ते शिकवणारे ठरले.

अभिनय आपण सर्वजण करतो. आम्ही तो अधिक जाणीवपूर्वक करतो. आपल्याला जे प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे खरे तर जीवनच देत असते. ती समजून घेण्यासाठी भगवद्गीता उपयोगी पडते कारण गीता प्रत्येक वयात मार्गदर्शक आहे, असे मला वाटते”.

गश्मीर महाजनी म्हणाले, ‘माझे पदार्पण याच नाट्यगृहात झाले होते. तिथेच आज हा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद वाटतो. मी आता निर्मितीच्या क्षेत्रातही पदार्पण करत आहे’.

शिव ठाकरे म्हणाले, ‘एका टप्प्यावर मिळालेली शाबासकी म्हणून मी या पुरस्काराकडे पाहतो’. ज्वेलर्स अशोक अष्टेकर यांनी ज्वेलरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कलाकारांसाठी दागिने घडवता आले, याचा आनंद वाटतो, अशी भावना व्यक्त केली. अभिनेत्री समिधा गुरू यांनी हा भावनात्मक क्षण असून, एका कलाकाराची नागपूर – मुंबई वाटचालीची आठवण या निमित्ताने झाल्याचे सांगितले. केतकी माटेगावकरने चित्रपटगीत सादर केले. ‘प्रत्येकाला एक बीज मिळालेले असते. ते ओळखून फुलवणे आवश्यक आहे’, असे ती म्हणाली.

पुरस्कार स्वीकारताना वनिता बोराडे.

पॅरा जलतरणपटू सुयश जाधव यांनी एका अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतरची पॅरा आलिंपिकपटू होण्यापर्यंतची वाटचाल कथन केली. “माझ्या परिस्थितीतही मी एवढे करू शकलो, तुम्ही सारे धडधाकट आहात, तर कितीतरी करू शकता”, हे त्यांचे उद्गार उपस्थितांना अंतर्मुख करून गेले.

वलय मुळगुंद म्हणाले, ‘हा माझ्यासाठी मोलाचा व आनंदाचा क्षण आहे. मला पुढील कामासाठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे’. शेफ संदीप सोनार यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरचे काम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे सांगितले. आमच्या केटरिंग कंपनीला थेट इंग्लंडमधून मागणी आल्याचे ते म्हणाले. खाऊ घालण्याचे समाधान ही माझी पॅशन होती आणि मी पॅशन जगतो, असे ते म्हणाले.

पुरस्कार स्वीकारताना केतकी माटेगावकर

समाज माध्यमाच्या व्यासपीठावरून मला माणूस हा विलक्षण जगण्याचा प्रकार आहे, हे समजले, अशी भावना सूरज खटावकर यांनी व्यक्त केली. सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सर्पविषयक गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगजागृती आणि प्रबोधनाचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजक सागर तसेच समीर पौलस्ते यांनी आभार मानले. आपल्या कार्यक्रमाचा हेतू प्रेरणादायी असावा, असे मानून हा उपक्रम केल्याचे ते म्हणाले. प्राजक्ता मांडके यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular