गोल्डन आय न्यूज नेटवर्क
उत्तमता, प्रतिभेच्या वाटचालीतून यशप्राप्ती हीच देशभक्ती : अविनाश धर्माधिकारी !
कलेच्या क्षेत्रातील खाडिलकर दाम्पत्य प्रतिभावंत आणि आदर्श : अविनाश धर्माधिकारी !
युवा पिढीला मानवी जीवनातील प्रतिभांचे व्यसन लागावे : अविनाश धर्माधिकारी
‘उत्तुंग’चा ३०वा वर्षपूर्ती आनंदोत्सव आणि ‘उत्तुंग’ वार्षिक सन्मान समारंभ उत्साहात !
पुणे : मानवी संस्कृतीच्या विकासासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभेचा आविष्कार असणे आवश्यक आहे. स्वत:ला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात मूलभूत अभ्यास, विचार करत त्या त्या क्षेत्रातील उत्तमता व प्रतिभेची वाटचाल करत यश प्राप्त करणे हीच आजची खऱ्या देशभक्तीची व्याख्या आहे. कला क्षेत्र हे भारतीय संस्कृतीचे वैभव आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडल परिवार संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट आयोजित उत्तुंग वार्षिक सन्मान प्रदान समारंभात आशा खाडिलकर, शुभांगी दामले, डॉ. आनंद नाडकर्णी, अविनाश धर्माधिकारी, विद्याधर निमकर, डॉ. श्रीरंग गोडबोले, ओंकार खाडिलकर.
आजच्या युवा पिढीला मानवी जीवनातील सर्व प्रतिभांचे व्यसन लागावे, अशी अपेक्षा व्यक्त करत माधवराव आणि आशाताई खाडिलकर यांच्याकडे कलेच्या क्षेत्रातील उत्तम, प्रतिभावंत आणि आदर्श दाम्पत्य म्हणून पाहिले जाते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधनाच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट या संस्थेचा ३०वा वर्षपूर्ती आनंदोत्सव आणि उत्तुंग वार्षिक सन्मान प्रदान समारंभ रविवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांना स्व. विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवनसाफल्य सन्मान (रु. पंचाहत्तर हजार), ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचे संस्थापक विद्याधर निमकर यांना उत्तुंग गुणगौरव सन्मान (रु. पंचवीस हजार), स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांना उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान (रु. पंचवीस हजार) आणि मराठी रंगभूमी तसेच ललित कलांच्या प्रसारासाठी कार्य केलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे या संस्थेला उत्तुंग आदर्श संस्था सन्मान (रु. पंचवीस हजार) देऊन गौरविण्यात आले.
मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश असे पुरस्कारांचे स्वरूप होते. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या आवारातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. उत्तुंग परिवार ट्रस्टच्या विश्वस्त विदुषी आशा खाडिलकर, सह विश्वस्त ओंकार खाडिलकर मंचावर होते.
अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले, मूळ भारतीय संस्कृतीत असणारी उदारता, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता आज कमी झाल्याचे दिसून येत आहे. माणसांच्या नात्यांमधील ताण-तणाव वाढताना जाणवत आहे. यातूनच युवा पिढीत व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा वेळी पुरस्कारप्राप्त असामान्य प्रतिभावान व्यक्तींचे कार्य समाजासाठी आदर्शवत ठरत आहे.
पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, चार वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्मानमूर्ती एकाच मंचावर आहेत याचे श्रेय माधवराव व आशाताई खाडिलकर यांनी स्थापन केलेल्या उत्तुंग संस्थेचे आहे. आम्ही सर्वजण आपआपल्या क्षेत्रात मनापासून कार्यरत आहोत. आमच्याकडे आलेले ध्येय आम्ही नम्रपणे स्वीकारत अविरतपणे कार्यरत आहोत यातून आम्हाला मनाचे उत्तम समाधान मिळत आहे तसेच अशा पुरस्कारांच्या माध्यमातून समाजाची पावतीही मिळत आहे, याचा आनंद आहे.
कार्यक्रमाची सुरुवातीस वेदश्री खाडिलकर-ओक आणि मानसी दीक्षित यांनी उत्तुंग गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
आनंदसोहळ्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मश्री कै. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्ष शुभारंभाच्या निमित्ताने माणिक स्वरशताब्दी (२०२५-२०२६) या उपक्रमाअंतर्गत माणिक वर्मा यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडिलकर यांच्या संकल्पनेवर आधारित ‘माणिकस्मृती’ हा सांगीतिक आदरांजली वाहणारा विशेष कार्यक्रम सादर झाला.
युवा गायिका केतकी चैतन्य, वेदश्री खाडिलकर-ओक, सावनी दातार-कुलकर्णी आणि मीनल माटेगावकर यांनी माणिक वर्मा यांच्या निवडक प्रचलित गीतांचे सादरीकरण केले. अभिजीत जायदे, सारंग भांडवलकर, उदय कुलकर्णी आणि तुषार दीक्षित साथसंगत केली. या अवीट गोडीच्या गाण्यांचा रसिकांनी भरभरून आनंद लुटला. ज्येष्ठ सुसंवादिका मंजिरी धामणकर यांनी कार्यक्रमाची गुंफण केली.