गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेला सुरुवात !!
महिला स्पर्धकांसाठी रंगमंच खुले अवकाश : अमृता सातभाई !!
पुणे : महिला प्रत्येक गोष्ट मनापासून, कष्ट घेऊन करीत असते. श्यामल करंडक स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेला रंगमंच महिलांसाठी खुले अवकाश आहे. सर्वांगिण विकासासाठी नाटक हे प्रभावी माध्यम आहे. भविष्यात रंगभूमीवर पदार्पण करायचे असल्यास एकपात्री या कलाप्रकाराने करावी, असा सल्ला प्रसिद्ध एकपात्री कलाकार, नाट्य-सिने अभिनेत्री अमृता अजित सातभाई यांनी दिला.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी आयोजित श्यामल करंडक एकपात्री स्पर्धेचे उद्घाटन आज (दि. 17) अमृता सातभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अमृता सातभाई यांचे स्वागत करताना भाग्यश्री देशपांडे आणि अनुजा कोल्हटकर.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्र आणि निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने केवळ महिलांसाठी ज्येष्ठ एकपात्री कलाकार सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित श्यामल करंडक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ अमृता सातभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. 17) झाला. त्या वेळी त्यांनी स्पर्धकांशी संवाद साधला.
एकपात्री कलाकार परिषद, महाराष्ट्रच्या अध्यक्षा भाग्यश्री देशपांडे, सौ. श्यामल कुलकर्णी यांच्या कन्या अनुजा कोल्हटकर, स्पर्धेच्या परिक्षक अपर्णा डोळे, प्रिया नेर्लेकर, स्पर्धा प्रमुख पल्लवी परब-भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलनाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेत 40 महिलांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 17 व दि. 18 रोजी निळू फुले कला अकादमी, शास्त्री रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी भरत नाट्य संशोधन मंदिर येथे होणार आहे. अंतिम फेरीला दुपारी 4 वाजता सुरुवात होणार असून पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी 6 वाजता साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनाविषयी बोलताना अनुजा कोल्हटकर म्हणाल्या, महिला दिनापुरते महिलेचे महत्त्व नसते तर प्रत्येक दिवस महिलेचा असतो. आयुष्यात ती वेगवेगळ्या भूमिका अहोरात्र जगत असते. महिलांना व्यक्त होता यावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्वागतपर मनोगत व्यक्त करून चाकोरी मोडून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महिलांना भाग्यश्री देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या. अमृता साताभाई यांचा सत्कार आणि स्वागत अनुजा कोल्हटकर आणि भाग्यश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक खेडकर यांनी केले.
जाहिरात