गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुरस्कार घेण्यापेक्षा तो देण्याचा आनंद मोठा : आशा काळे
सुचित्रा खरवंडीकर, सोनाली वाजागे यांचा ‘आशा पुरस्कारा’ने सन्मान
संकटे आली तरी मनाने खंबीर राहणे महत्त्वाचे : आशा काळे
महिला दिनानिमित्त स्वानंद सोशल फेडरेशन आणि संवाद, पुणे आयोजित गौरव सोहळा
पुणे : “मी अभिनेत्री म्हणून अनेक पुरस्कार मिळवले आणि घेतले. पण पुरस्कार घेण्यापेक्षा तो देण्याचा आनंद अधिक मोठा असतो, हे आज उमगले” असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी काढले. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मनाने खंबीर राहणे महत्त्वाचे असतेही असेही त्यांनी नमूद केले.
स्वानंद सोशल फेडरेशन आणि संवाद, पुणे यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आशा सुमतीलाल शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘आशा पुरस्कार’ वितरण सोहळा आज (दि. 9) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग असूनही मेहंदी मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सुचित्रा खरवंडीकर आणि उत्तम ज्युडोपटू सोनाली वाजागे यांचा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते ‘आशा पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. त्या वेळी आशा काळे बोलत होत्या.
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. आशा सोशल फेडरेशनचे प्रमुख संजीव शहा, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, साधना शहा, सचिन शहा, निवेदिता शहा, केतकी महाजन-बोरकर उपस्थित होत्या.
आशा काळे पुढे म्हणाल्या, “माणसाने कोणत्याही परिस्थितीत मनाने खंबीर राहणे महत्त्वाचे आहे.
मग शारीरिक वा इतर प्रतिकूलता कितीही असोत, मनाने खचता कामा नये. सुचित्रा आणि सोनाली या दोघींना आज भेटून मी एक नवी ऊर्जा मिळवली आहे. मी त्यांना पुरस्कार दिला, यापेक्षा त्यांनीच या नव्या उर्जेचा पुरस्कार मला दिला आहे, अशी माझी भावना आहे. हा पुरस्कार आशा शहा यांच्या स्मृत्यर्थ आहे. त्यामुळे सारे आशादायी घडेल असा विश्वास वाटतो”.
खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सुचित्रा आणि सोनाली यांची पुरस्कारासाठी केलेली निवड अतिशय सुयोग्य आहे, अशा शब्दांत कौतुक केले.
या दोघींनी वाट्याला आलेल्या प्रतिकूलता स्वीकारून कर्तृत्वाची शिखरे गाठली आहेत. इतरांना त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा दिली आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप काही आहे.
मनोगत व्यक्त करताना सुचित्रा खरवंडीकर म्हणाल्या, “अपंगत्व शारीरिक असले तरी ते मुळात मनात, डोक्यात असते. ते तिथून काढून सकारात्मक राहणे, आपल्या स्वप्नांचा जिद्दीने पाठपुरावा करणे आवश्यक असते.
मी स्वतःला अपंग समजत नाही. मी प्रयत्न करत राहते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहण्यासाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे आणि गिजिन बुकमध्ये विक्रम नोंदवणे, हे माझे ध्येय आहे, असे त्यांनी सांगितले. ‘ऑलिंपिक प्रवेश हे माझे स्वप्न आहे, असे सोनाली म्हणाल्या. साधना शहा आणि निवेदिता शहा यांनी आशा शहा यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संजीव शहा यांनी स्वानंद फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. सुनील महाजन यांनी संवादच्या माध्यमातून गेली 30 वर्षे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे सांगितले.
रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. केतकी महाजन-बोरकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्त्रीच्या भावविश्वाचा प्रवास उलगडणारा ‘ती’ची गाणी हा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पाळण्याची दोरी हातात घेतलेल्या माऊलीपासून ते अन्यायाविरुद्ध लढताना सावली होऊन पाठीशी उभ्या राहणाऱ्या स्त्रीचे मोठेपण यातून अनेक गीतांमधून समोर आले. धनंजय पवार आणि चैत्राली अभ्यंकर यांनी गीते सादर केली. विवेक परांजपे (की-बोर्ड), दीप्ती कुलकर्णी (संवादिनी), राजू जावळकर (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्य) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती चैत्राली अभ्यंकर यांची होती. निवेदन स्नेहल दामले यांनी केले.