गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शरद पवार हे औचित्य गमावलेले नेते : भाऊ तोरसेकर यांचे मत !
पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनात राजकीय सद्यस्थितीवर केले भाष्य !
पुणे : व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असो, बदलत्या काळाची चाहूल आणि गरज तिने ओळखली पाहिजे. बदल स्वीकारले पाहिजेत. स्वतःमध्ये, वैचारिक मांडणीमध्ये आणि कार्यपद्धतीत काळानुरूप गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. सद्यकाळाशी निगडीत राहणे जमवले पाहिजे. विशेषतः राजकीय कारकीर्द करणाऱ्यांनी हे विशेष जपले पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हे बदल स्वीकारले नाहीत. नव्या पिढीला योग्य व्ोळी जागा दिली नाही, त्यामुळेच पवार आता औचित्य गमावलेले नेते वाटतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार, संपादक व राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.
पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ‘मनमोकळ्या गप्पा’ या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तोरसेकर यांचा सत्कार सहकार आणि नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे, प्रांतपाल शितल शहा, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजचे अध्यक्ष सूर्यकांत वझे, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजीव बर्वे उपस्थित होते.
पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात भाऊ तोरसेकर यांचा सत्कार करताना मुरलीधर मोहोळ. समवेत सूर्यकांत वझे, राजेश पांडे, शितल शहा, राजीव बर्वे.
तोरसेकर यांनी यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती, लोकसभा, विधानसभा निवडणुक, प्रमुख राजकीय पक्षांचे यशापयश आणि भावी दिशा, अशा मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार स्वतः युवक काँग्रेसचे नेते म्हणून 67 साली प्रथम आमदार झाले, त्याच काळात बाळासाहेब ठाकरे मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरत होते, ज्यातून नंतर शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना वाढली, फोफावली, सत्तेपर्यंत पोहोचली. पवार यांचे समकालीन म्हणावेत, असे लालूप्रसाद, जॉर्ज, मुलायमसिंग असे अनेक नेते राजकीयदृष्ट्या आणि केंद्रीय राजकारणाच्या दृष्टीने दीर्घकाळ महत्त्वपूर्ण ठरले, पण केंद्रीय मंत्रीपद वगळता पवार यांची कारकीर्द सर्वव्यापक होऊ शकली नाही.
खुद्द महाराष्ट्रातही ठराविक 5 जिल्हे वगळता त्यांचा प्रभाव दिसू शकला नाही. ताज्या निवडणुकीत तर त्यांचे वर्चस्व असणाऱ्या जिल्ह्यांतूनही मतदारांनी त्यांना पराभूत केले. ज्यांना स्वतःचे औचित्य राखता येत नाही, ते अस्तंगत होतात. ज्यांना स्वतःचा अस्त कळत नाही, त्यांना लोकशाहीत मतदार बाजूला सारतात. पवार यांचे सध्याचे वक्तव्य पाहिले तर ते केविलवाणे वाटतात आणि त्यांच्या या अस्ताला ते स्वतःच जबाबदार आहेत, असे तोरसेकर म्हणाले.
राजकारणात संयम ठेवावा लागतो, अभ्यास करावा लागतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वागण्यातून दाखवून दिले. सर्वाधिक आमदार असूनही विरोधी बाकावर बसलेल्या संयमी देवेंद्र यांनी पवारांचा पक्ष फोडून, आपला मुत्सद्दीपणा दाखवून दिला आणि राजकीय खेळाचे नियम बदलले आहेत, हेही सिद्ध केले.
पक्ष म्हणून लोकसभेतील चुका भाजपने दुरुस्त केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीही पक्षाने सर्व पातळ्यांवर तयारी केली, पण शांतपणे आणि संयम बाळगून. रोज पत्रकार परिषदा घेऊन उच्चरवात ते काहीही सांगत फिरत नाहीत, हा फरक पुरेसा बोलका आहे, असेही तोरसेकर म्हणाले.
कार्यकर्ता हा खरा पक्षाचा आधार असतो, हे भाजपने जाणले. निवडणुकीतील प्रचंड विजय हा चमत्कार नाही,
त्यामागे अतिशय नियोजनबद्ध परिश्रम आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजेत. तीन पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण, यावर वाद घालत बसलेली महाविकास आघाडी एका बाजूला आणि बटेंगे तो कटेंगे, हा मुद्दा प्रवचन, कीर्तनकारांकडून तळागाळापर्यंत पोहोचवणारे भाजप कार्यकर्ते दुसरीकडे, असे चित्र राज्यात होते. हा मुद्दा न ठेवता, भाजपने ती लोकचळवळ बनवली, हे लक्षात घेतले पाहिजे. तोच प्रकार जरांगे प्रकरणात भाजपने केला. निवडणुकीतच काय पण सरकार अस्तित्वात आल्यावरही जरांगे हा मुद्दा कुठेही चर्चेत नाही, हे भाजपचे राजकारण आहे, असे तोरसेकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसकडे उत्तम, जबाबदार नेतृत्व नाही, त्यामुळे मोदींना विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशातले राजकारण गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवले असून, ते स्वतः आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय चाणाक्षपणे खेळी खेळत आहेत, याची अनेक उदाहरणे तोरसेकर यांनी सांगितली.
मोदी यांचे प्रत्येक निर्णय एका विचारप्रक्रियेचे फलित आहेत, त्यामागे सुनियोजित डावपेच आहेत, हे समजून घेतले पाहिजे. चूक झाली तर ती लगेच दुरुस्त करून, नवे मार्ग स्वीकारायचे, हे मोदींचे तत्त्व आहे, तर दुसरीकडे सतत चुकाच करायच्या, त्या दुरुस्त करणे सोडाच, पुन्हा पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती करायची आणि नव्या चुका करतच राहायच्या, अशी काँग्रेसची आजची अवस्था आहे, अशा शब्दांत तोरसेकर यांनी राष्ट्रीय राजकीय वास्तवावर टिप्पणी केली.
रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष राजीव बर्वे यांनी आभार मानले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली वेर्णेकर, राहुल जोशी, माधवी मेहेंदळे, सुरेश नातू, अशोक इंदलकर, धनश्री जोग या रोटेरियन लेखकांचा सत्कार करण्यात आला. संमेलनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, रोटरीचे कार्य प्रामुख्याने सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहे. मी स्वतः रोटरीच्या दर्जेदार कार्याचा साक्षीदार आहे. पण या पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रोटरीने सांस्कृतिक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. या संमेलनाचे देखणे आयोजन आणि उदंड प्रतिसाद पाहून, हा नवा उपक्रमही यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.