गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्मार्ट यूजर बना, मात्र डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवा !!
पीएमएच्या आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा सल्ला !!
पुणे : आगामी काळ कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित तंत्रज्ञानाचा असेल, ही वस्तुस्थिती ओळखून, तंत्रस्नेही व्हा, स्मार्ट यूजर बना, मात्र स्वतःचा डिजिटल प्रेझेन्स मर्यादित ठेवा, असा सल्ला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ, लेखक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (पीएमए) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर सेंटर (आयएमसीसी) यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष
पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर सेंटर आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. दीपक शिकारपूर
व्याख्यानप्रसंगी डॉ. शिकारपूर बोलत होते. पीएमएचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यावेळी उपस्थित होते. आयएमसीसी, बालशिक्षण मंदिर आवार, मयूर कॉलनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. शिकारपूर यांनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागातील अधिकाऱ्यांशी कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित तंत्रसाधनांविषयी संवाद साधला. आगामी काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संबंधित विविध तंत्रसाधनांचा (टूल्स) असेल. मनुष्यबळ विकास विभागाशी (एच आर) निगडित अनेक बाबतीत एआय टूल्स यापुढे वापरली जातील.
त्यामुळे अनेक पारंपरिक रोजगारांवर गदा येईल, पण एआय क्षेत्रात नवे रोजगारही निर्माण होतील, असे सांगून डॉ. शिकारपूर म्हणाले, आगामी काळात अनेक ठिकाणी मानवी हस्तक्षेपाची गरज एआय साधने पूर्ण करतील. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची भीती वा असुरक्षितता न बाळगता, नव्या तंत्रांशी मैत्री करा, स्मार्ट यूजर व्हा आणि नव्या काळाच्या गरजांशी सुसंगती राखा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
या पुढील काळात कंपन्या, संस्थांनी वरिष्ठ पातळीवर स्वतःच्या व्यवसायाचे एआय धोरण ठरवणे गरजेचे आहे. ऑटोमेशन हाच परवलीचा शब्द राहणार आहे, हे ओळखून आभासी पद्धतीने काम करण्याची सवय लावून घ्या. कृत्रिम बुद्धिमत्तेचे विश्व आता मानवी भावनात्मक रूपही धारण करण्याच्या वाटेवर आहे.
इमोटिव्ह रोबोटिक्स ही विद्याशाखा वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे यापुढे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही विद्याशाखा महत्त्वाची ठरणार आहे. तंत्रस्नेही होताना, वैयक्तिक पातळीवर समाजमाध्यमांचा वापर विवेकी पद्धतीने करा, असे डॉ. शिकारपूर म्हणाले.
पीएमएचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे यांनी डॉ. दीपक शिकारपूर यांचे स्वागत केले. अविनाश आर्वीकर यांनी परिचय करून दिला. नितीन दांगल यांनी सूत्रसंचालन केले.